सुंदर आणि बोलके डोळे, काही बोलण्याआधीच समोरच्याला तुमची ओळख करून देतात. अशी ही नयनांची भाषा प्रथमदर्शनीच तुमची छाप सोडून जाते. म्हणूनच घायाळ करणार्या सुंदर डोळ्यांना जपण्यासाठी योग्य प्रसाधनं वापरणं आवश्यक आहे. तुमच्या सुंदर आणि बोलक्या डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी काजळ, आय लायनर तुम्ही वापरत असालच. पण पापण्यांना सुंदर बनविणार्या मस्कराची निवड कशी करावी, याबाबत जाणून घेऊया. योग्य मस्करा निवडून त्याप्रमाणे डोळ्यांच्या मेकअपला उठाव द्या. प्रत्येक कार्यक्रम वा वेळेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे मेकअप केला जातो. म्हणूनच मस्कराची शेड निवडणंही तितकंच महत्त्वाचं आहे. डे लूक आणि कॅज्युअल लूकसाठी ब्लॅक, ब्राउन किंवा फक्त ब्राउन मस्करा योग्य असतो. प्लम, गोल्ड आणि ऑलिव्ह आयशॅडोसाठी या शेड चांगल्या दिसतात. ड्रॅमेटिक लूूकसाठी डार्क ब्लॅक किंवा ब्लॅक मस्करा योग्य असतो. तसेच नाइट लूकसाठीही हा मस्करा चांगला दिसतो. तसेच ब्लॅक मस्करा इतर आयशॅडोशी मॅच करतो. तुम्हाला नॅचरल लूक आवडत असल्यास ट्रान्सपरण्ट मस्करा चांगला. डोळ्यांचं सौंदर्य द्विगुणित करण्यासाठी हा मस्करा योग्य आहे. तुमचा वर्ण गोरा असल्यास, ब्लॅक मस्कराऐवजी ब्राउन मस्कराही वापरू शकता. यामुळे तुम्हाला सॉफ्ट लूक मिळेल. तुमचे डोळे आकाराने छोटे असल्यास ब्लॅक मस्कराऐवजी ब्ल्यू मस्करा लावा. ब्ल्यू शेड सुंदर दिसते व नेहमीपेक्षा जरा हटके वाटते. तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असल्यास खालच्या पापण्यांना मस्करा लावू नका.
मस्करा कसा लावावा?
मस्करा नेहमी मुळापासून टोकापर्यंत लावावा.
मस्करा लावताना, त्याचे दोन वेळा थर झाले पाहिजेत. परंतु प्रत्येक वेळी लावताना ब्रशवर कमी प्रमाणात मस्करा घ्यावा. अन्यथा यामुळे पापण्यांचे केस एकमेकांना चिकटू शकतात.
मस्करा लावताना, पहिल्यांदा लावलेला मस्करा सुकल्यावरच दुसरा थर लावावा.
ब्रशमध्ये जास्त प्रमाणात मस्करा आल्यास तो टिश्यू पेपरने पुसावा.
मस्कराचा जाड थर लावू नये. अन्यथा पापण्यांचे केस कडक होतात आणि केस तुटू शकतात.
मस्करा लावताना डोळ्यांभोवती मस्करा लावू नका. चुकून मस्करा लागल्यास घाईघाईने पुसू नका. सुकल्यानंतरच मस्करा पुसा. अन्यथा सगळा मेकअप बिघडण्याची शक्यता असते.
डोळ्यांच्या वरच्या पापणीला वरच्या दिशेने आणि खालील पापणीला खालील दिशेनेच मस्कराचा ब्रश फिरवावा.
रोज मस्करा लावत असाल तर वॉटरप्रूफ मस्करा वापरू नये. हा मस्करा काढणं जरा कठीण असते. तसेच यामुळे पापण्यांची त्वचा खेचली जाऊन केस तुटण्याची भीती असते.
मस्करा काढण्यासाठी अल्कोहोल फ्री क्लिन्झर वापरावे.
मस्करा वापरण्यासाठीचा कालावधी संपल्यानंतर मस्करा वापरू नये. मस्करामधील काही घटक त्यांचा वापर कालावधी संपल्यानंतर वापरले गेल्यास डोळ्यांना हानी होण्याची शक्यता असते.
मस्करा सुकला असल्यास त्यात पाणी अथवा अॅसिटोन टाकून वापरू नये. असा मस्करा न वापरल्यास उत्तम. अन्यथा डोळ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.