हिस्ट्री टीव्ही 18, सीबीएसई हेरीटेज इंडिया क्विझ २०२३ च्या चुरशीच्या मुकाबल्यात पुण्याच्या एस.ई.एस गुरुकुलने बाजी मारली. एस.ई.एस गुरुकुलने फक्त ज्ञानच नाही तर सांघिक प्रयत्न, योग्य नियोजन अशा सगळ्यांच क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत उपांत्य फेरी गाठली. नवी मुंबईतील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये स्पर्धेची ही फेरी पार पडली. सीबीएसईने २००१ साली ही स्पर्धा सुरू केली होती, भारतातील ही आंतरशालेय स्पर्धा असून, ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.
देशभरातील सीबीएसई शाळांमध्ये शिकणारे गुणवान, हुशार, प्रतिभावंत विद्यार्थी या स्पर्धेत सामील होत असतात. २३०० शाळांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. या वर्षी स्पर्धेची थीम ही 'इंडिया-द मदर ऑफ डेमोक्रसी' अशी ठेवण्यात आली होती. यंदाच्या जी20 परिषदेचे आयोजन करण्याचा मान भारताला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ही थीम निवडण्यात आली होती. संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना भारताचा उज्ज्वल इतिहास, वैविध्यता, संस्कृती आणि भारताने केलेली प्रगती याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाहीबद्दल अभिमान जागृत करणे हा यंदाच्या वर्षी 'इंडिया-द मदर ऑफ डेमोक्रसी' ही थीम निवडण्यामागचा उद्देश होता.