- रेणू मंडल
- राहुल आणि नेहा एअरपोर्टवर मला घ्यायला आले होते. मोटारीच्या प्रवासात ते दोघे मला न्यूयॉर्कच्या झकपक आणि सुखसोयींनी युक्त जीवनाबद्दल प्रश्न करीत होते. पण मी मात्र पप्पांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. मम्मीच्या पश्चात ते कसं जीवन जगत असतील?
मी भारतामधून इथे न्यूयॉर्कला दोन महिन्यांपूर्वी परत आले होते. मनात पुष्कळ असूनही, या ना त्या कारणाने माहेरी फोन करणे राहूनच गेले होते. नाही म्हणायला,
मी सुखरूप पोहोचले एवढा औपचारिक फोन मी केला होता. पप्पांची ख्यालीखुशाली जाणून घेण्याची इच्छा, मधूनच उचंबळून येत होती. परंतु ही लाट आवरणं मला भाग होतं. कोणत्या तोंडानं मी माझ्या लहान भावाला राहुलला फोन करणार होते. नाही, नाही ते त्याला बोलून आले होते. आपल्या संसारात ही बाई नको इतकी ढवळाढवळ करते आहे, असं राहुलची बायको नेहाला वाटलंही असेल. कदाचित माझ्याविरुद्ध काहीबाही राहुलच्या मनात भरवलंही असेल. परिणामी त्यानं देखील मला या दोन महिन्यात अजिबात फोन केला नव्हता. म्हणूनच आज ऑफिसातून घरी येताच, लॅपटॉप उघडून मी आलेले मेल्स चेक करायला बसले; तेव्हा राहुलचा मेल बघून मला धक्काच बसला. धडधडत्या छातीने मी त्याचा मेल वाचू लागले…
‘प्रिय ताईस,
न्यूयॉर्कला गेल्यापासून तू फोन करायचं विसरून गेली आहेस. नक्कीच तू माझ्यावर नाराज झाली असणार. माझ्या हातून कृत्यच असं घडलंय की, मला कोणी क्षमाच करणार नाही. पप्पांना मी फार दुःख दिलंय, त्यांची अतिशय उपेक्षा केली आहे. हा माझा अक्षम्य अपराध आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण तुझं मन विशाल आहे, याचीही मला कल्पना आहे. ताई, मी आणि नेहा तुझी हात जोडून क्षमा मागत आहोत. झालं गेलं विसरून तू आम्हाला क्षमा करशील अशी आशा आहे. ताई, नेहमीप्रमाणे तू मला योग्य मार्ग दाखविलास, याबद्दल मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन. तुला आठवतंय लहानपणी माझ्या चुका तू नेहमीच पोटात घालायचीस. कधी रागावून तर कधी समजावून तू मला योग्य दिशा दाखवली आहेस. या खेपेस सुद्धा भारतात येऊन तू माझा अंतरात्मा जागवलास. बाकी सर्व क्षेम.’
- तुझा, राहुल.
माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. लॅपटॉप बंद करून, मी डोळे मिटून सोफ्यावर पाठीमागे टेकले. मनात विचारांनी फेर धरला होता. पप्पांचा शांत चेहरा एकसारखा डोळ्यासमोर दिसत होता. गेल्या दोन महिन्यांपासून मी किती बैचेन होते, ते माझं मलाच ठाऊक. न्यूयॉर्कला आले तरी मनानं इथे पोहोचलेच नव्हते. माझं मन पप्पांजवळ घुटमळत राहिलं होतं. मम्मीच्या वर्षश्राद्धाला मी भारतात गेले होते. आयुष्यात काही काही आठवणी अशा रम्य असतात ना, की त्या वारंवार जागवत राहाव्याशा वाटतात. आईच्या आठवणी ह्या अशाच आहेत. पण आता तिच्याशिवाय घर म्हणजे आत्मा नसलेलं शरीर… पप्पांचं जीवन किती वैराण झालं असेल. भारतात जाताना अशा विचारांनी माझं मन चिंब झालं होतं.
राहुल आणि नेहा एअरपोर्टवर मला घ्यायला आले होते. मोटारीच्या प्रवासात ते दोघे मला न्यूयॉर्कच्या झकपक आणि सुखसोयींनी युक्त जीवनाबद्दल प्रश्न करीत होते. पण मी मात्र पप्पांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. मम्मीच्या पश्चात ते कसं जीवन जगत असतील? मला त्यांच्या जीवनाबाबत उत्सुकता होती, पण पप्पा आपल्याच तालात असतात, असं त्या दोघांचं म्हणणं होतं. आम्ही देखील त्यांना डिस्टर्ब करत नाही, असं ते बोलले. ते ऐकून माझ्या जिवाला बरं वाटलं. मग मी पण विषय बदलला. घरासमोर कार थांबताच, मी आत धाव घेतली.
ड्रॉईंगरूमला लगटून असलेली खोली म्हणजे पप्पा-मम्मी यांची बेडरूम होती. बेडरूमचा पडदा मी बाजूला सारला नि मला धक्काच बसला. त्या खोलीचं रूपडं बदललं होतं.
दोन वर्षांचा रिंकू बेडवर झोपला होता. “ताई ही माझी व राहुलची बेडरूम आहे. पप्पा मागच्या खोलीत आहेत,” मागून नेहा बोलली. मागची खोली म्हणजे तर अडगळीची खोली होती. मी स्तंभितच झाले.
“श्रुती बेटा, आलीस तू? ये…” हात पसरून पप्पा गॅलरीतून येताना दिसले. चालताना ते थरथरत होते. धावत जाऊन मी त्यांना मिठी मारली. “पप्पा, ही काय अवस्था तुमची? किती अशक्त झालात तुम्ही?” माझ्या डोळ्यात पाणी आलं.
“अग, खूप दिवसांनी पाहते आहेस नं मला, म्हणून तुला तसं वाटतंय. मी तर चांगला धडधाकट आहे.” माझ्या डोक्यावर थोपटत पप्पा जड आवाजात बोलले. “ताई, बॅगा तुझ्या खोलीत ठेवतोय ग,” कारमधून काढलेल्या बॅगा राहुल घेऊन आला होता.
“थांब राहुल, माझ्या खोलीत नको. पप्पांच्या खोलीतच ठेव. मी तिथेच झोपेन.” मी सांगितलं. “अग, पण ताई-” राहुल गडबडला. मी मनात म्हटलं, या घराच्या मालकाला तू अडगळीच्या खोलीत झोपवू शकतो, तर माझी काय पत्रास? उघडपणे मात्र मी गप्प राहणंच पसंत केलं. जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले. पप्पांनी थोडा वेळ माझ्या नवर्याची, समीरची विचारपूस केली नि ते पण झोपी गेले. परंतु पंधरा तासांच्या विमानप्रवासाने थकवा येऊन देखील माझा डोळ्यास डोळा लागत नव्हता.
दहा वर्षांपूर्वीचा काळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला… शहराच्या गजबजाटापासून दूर राहून शांत जीवन जगण्यासाठी पप्पांनी या पॉश कॉलनीत हे घर बांधून घेतलं होतं. ड्रॉइंग रूमला लागूनच पप्पा-मम्मीची बेडरूम होती. बेडरूमच्या बाल्कनीमध्ये बोगनवेल लावण्यात आली होती. सभोवती बागेतील आंबा आणि गुलमोहोराच्या झाडांनी बाल्कनीची शोभा आणखीनच वाढली होती. गुलमोहोराची प्रसन्न, रंगीत फुले मम्मी-पप्पांना खूप आवडायची. मोकळ्या, स्वच्छ हवेचा आस्वाद घेत ते दोघेही सकाळ-संध्याकाळ चहाचे घोट घेत बाल्कनीतून गुलमोहोरांच्या फुलांकडे पाहत बसायचे… गेल्याच वर्षी मम्मी स्वर्गवासी झाल्यावर पप्पांनी आपल्या खोलीत तिचा मोठा फोटो लावला होता. बरेच दिवस पप्पा त्या खोलीतून बाहेर आलेच नव्हते. मम्मीचे श्वास त्या खोलीत दरवळत होते. ही खोली सोडताना पप्पांच्या मनाला कसे वाटले असेल?… रात्रभर मी झोपले नाही.
सकाळ झाली. मी खोलीत नजर टाकली. आई होती तेव्हा घरातील टाकाऊ वस्तू इथे ठेवण्यात येत होत्या. म्हणजे आता पप्पादेखील घरातील टाकाऊ सामान झाले होते की काय? पप्पांच्या सगळ्या चीज वस्तू या खोलीत ठेवल्या गेल्या होत्या. आवश्यक त्या सामानाबरोबरच त्यांचं बुकशेल्फ, टेबल सर्व काही तिथे दडपलं होतं. हे सर्व बघूनच मन खिन्न झालं… सकाळच्या नाश्त्याला रामूकाकांनी माझ्या आवडीचे शेंगदाणे घातलेले कांदेपोहे केले होते. सर्व लोक, नाश्त्याला आले. त्यात पप्पा नव्हते. “रामूकाका पप्पांना बोलवा,” या माझ्या वाक्यावर काका काही बोलण्याच्या आतच नेहा उत्तरली, “ताई, पप्पांचा नाश्ता-जेवण त्यांच्या खोलीतच पाठवलं जातं.” मला वाईट वाटलं.
“पप्पांना आपल्या सोबत बसवून जेवणखाण दिलं पाहिजे. मम्मी गेल्यापासून ते एकटे पडले आहेत. तेव्हा आपण त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे-” माझं बोलणं मधेच तोडत नेहा ताडकन म्हणाली, “त्यांच्याकडे लक्ष देतो म्हणूनच त्यांच्या खोलीत वेळेवर जेवणखाण पाठवलं जातं. तुम्ही बघितलंय नं, चालताना त्यांचे पाय कसे थरथर कापतात.”
नेहाचं हे ताडकन बोलणं माझ्या मनाला लागलं. कारण ह्याच नेहाला आपल्या घरची सून करून घेण्यासाठी पप्पांनी खूप प्रयत्न केले होते. अगदी तिच्या वडिलांची मनधरणी देखील केली होती. कोणाचं असं लांगूलचालन करणं हे त्यांच्या स्वभावात बसत नव्हतं. तरी देखील आपल्या मनाविरुद्ध त्यांनी हे सगळं राहुलसाठी केलं. त्याचं नेहावर प्रेम होतं. राहुलपेक्षा मी दोन वर्षांनी मोठी असूनसुद्धा पप्पांनी त्याचं लग्न आधी करून दिलं होतं. असं असून देखील नेहाची त्यांच्याशी भावनाशून्य वर्तणूक पाहून माझ्या मनास यातना झाल्या होत्या. त्यांचा हा परकेपणाचा व्यवहार मी बरेच दिवस सोसला. राहुल-नेहाची चांगली कानउघाडणी करावी, असं खूप वाटत होतं. अगदी त्यांचा जीव नकोसा करावा, असंही वाटत होतं. पण अशानं ते दुखावतील, माझ्यावर नाराज होतील अन् न जाणो माझी माहेरची वाट कायमची बंद होईल, या भीतीपोटी मी गप्प राहिले.
एके दिवशी रामूकाका माझ्याकडे आले. गहिवरल्या स्वरात म्हणाले, “बेटा, वीस वर्षांपासून मी या घरातला नोकर आहे. राहुल आणि तू माझ्यासमोरच मोठे झाला आहात. त्या नात्यानं सांगतो की, तू जरा राहुलला समजाव. साहेबांकडे लक्ष दे म्हणावं. अग, तुझी आई गेल्यापासून ते एकटे पडले आहेत. दिवस दिवस खोलीबाहेर पडत नाहीत. अंथरुणावर पडून छताकडे पाहत राहतात, नाहीतर पुस्तकात डोकं खुपसून बसतात. अशानं त्यांची जगण्याची इच्छा कमी होईल ग.” रामूकाका कसं मुद्याचं बोलले होते. त्यांचा हा धागा पकडून मी एके दिवशी पप्पांबरोबर बाहेरच्या हिरवळीवर फिरताना विषय काढत म्हटलं, “पप्पा, देवाच्या कृपेनं तुमच्यापाशी सगळं काही आहे. पैसाअडका, घर मग तुम्ही असं
एकाकी, नीरस, लाचारीचं जीवन का जगताय? ज्या खोलीत मम्मीच्या आठवणी वास करत होत्या, ती खोली तुम्ही कशाला सोडलीत?”
मोठा सुस्कारा टाकून पप्पा बोलले, “श्रुती बेटा, एक ना एक दिवशी हे सगळं मागेच राहणार आहे नं. त्या खोलीचा वापर करण्याची राहुलची इच्छा होती. तुझी मम्मी तर सगळं काही मागे सोडूनच निघून गेली. तेव्हा जे काही चाललंय ते ठीक आहे. आता तुझ्या आईच्या भेटीला जावंसं वाटू लागलंय. जगायचं ते कोणासाठी अन् कशासाठी? कोणाला माझी गरज आहे?” पप्पांच्या या व्यथित प्रश्नांनी माझ्या काळजात कालवाकालव झाली. माझ्या अश्रूंचा बांध फुटला. मी मनात बोलले, असं बोलू नका हो पप्पा. मला तुम्ही हवे आहात. तुमच्या शिवाय मी जगू शकणार नाही.
मम्मीच्या वर्षश्राद्धाचा दिवस जवळ आला होता. पप्पांची अशी इच्छा होती की, त्या दिवशी काहीही तामझाम न करता फक्त अनाथश्रमातल्या मुलांना जेवू घालावं. पण राहुलला ते पटलं नाही. त्यानं पप्पांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, असा सूर लावून सकाळपासून होमहवन आणि दुपारी प्रीतिभोजन असा सोहळा ठरवला. पप्पा शांतपणे जे घडतंय ते पाहत राहिले. दुसर्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी राहुल म्हणाला, “ताई, मम्मीचं श्राद्ध मी कसं साग्रसंगीत केलं बघ. सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं माझं… तू खूश आहेस नं?”
खाली मान घालून चहा चमच्याने ढवळत मी उत्तरले, “होय राहुल, मी खूप खूष आहे. जिवंतपणी आईबापांना विचारलं नाही तरी चालेल. पण ते मेल्यानंतर, समाजात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांचं श्राद्ध धूमधडाक्यात केलं पाहिजे. पप्पांचं पण- ” मला अर्धवट तोडत, राहुल उसळून बोलला, “हे काय बोलतेस ताई तू?”
“ताई नं, कधी कधी ओव्हर इमोशनल होतात” नेहा म्हणाली.
राहुलच्या नजरेला नजर भिडवत मी म्हणाले, “योग्य तेच बोलतेय मी राहुल. काबाडकष्ट करून आईबाप मुलांना वाढवतात. त्यांना जगण्यालायक बनवतात. पण हीच मुले त्यांचा तिटकारा करतात, उपेक्षा करतात. आता तुझंच बघ ना, पप्पांची किती काळजी घेतो आहेस रे तू? ज्या खोलीशी त्यांच्या भावना निगडीत होत्या, त्यातून बाहेर काढून तू त्यांना अडगळीच्या खोलीत टाकलंस… दिवसभर पप्पा तिथे एकटे पडून असतात. तुम्ही दोघे त्यांच्यासाठी किती वेळ काढता रे? खरं सांगायचं तर, आम्हाला तुमची गरज राहिलेली नाही, अशी जाणीव तुम्ही त्यांना करून देताय. आज तुम्हाला त्यांचं ओझं वाटू लागलंय. पण तुम्ही हे विसरताय की, खूप वर्षांपूर्वी याच पित्यानं आपल्या खांद्यावर तुमचं ओझं पेललंय. हेच तुमचे संस्कार आहेत का? आईबाप मेल्यावर त्यांच्याबद्दल कळवळा दाखवणं, त्यांच्या श्राद्धाचा दिमाख दाखवणं असे उद्योग करण्यापेक्षा जिवंतपणी त्यांची सेवा केली पाहिजे. जेव्हा कधी तुला फुरसत होईल ना, तेव्हा मनाला विचार की, तू तुझ्या मुलावर काय संस्कार करतो आहेस. आज तूू आपल्या पित्याची उपेक्षा करतो आहेस, उद्या तुझा मुलगा तुझ्याशी असाच वागला तर? निसर्गाचा हा नियमच आहे. पेराल तसे उगवते. एवढं लक्षात असू दे म्हणजे झालं…” माझा गळा दाटून आला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समोरचं खाणं तसंच टाकून मी उठले आणि बाहेर हिरवळीवर आले. बागेत नजर टाकली. गुलमोहोराची फुलं सुकून गेलेली मला दिसली.
न्यूयॉर्कला परत जाण्याचा दिवस उजाडला. सकाळपासून माझं मन हळवं झालं होतं. या घरात मी परत येऊ शकेन की नाही, पप्पांची पुन्हा भेट होईल की नाही, असे प्रश्न मला पडले होते. राहुल आणि नेहा पण गप्प गप्पच होते. त्याचंही मनावर दडपण आलं होतं. निघताना
मी पप्पांच्या गळ्यात पडून खूप रडले…
राहुलचा मेल वाचून मी गतकाळात गुंगले होते. फोनची बेल वाजली नि मी ताळ्यावर आले. मी फोन उचलला, “हॅलो श्रुती बेटा, कशी आहेस तू? आपल्या पप्पांना अजिबात विसरलेली दिसतेस-” कितीतरी दिवसांनी पप्पांचा आवाज ऐकून मी भावुक झाले. “मी तुम्हाला कधी विसरेन तरी
का हो पप्पा.”
“आयुष्यमान भव! मी फोन अशासाठी केला की, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. राहुल आणि नेहा आता माझी नीट काळजी घेत आहेत. अन् हा उनाड रिंकू, दिवसभर माझ्या मागे असतो. एकसारखा पार्कात जाऊया म्हणून हट्ट करतो,” पप्पा मनापासून हसले.
“ताई, ज्या दिवशी पप्पा, माझ्या आणि नेहाच्या वागण्यानं आनंदित होतील, त्या दिवशी मी तुला फोन लावीन, असं ठरवलं होतं. पण बघ नं, पप्पांनी स्वतःहूनच तुला फोन लावलाय. ताई, आता तू लवकरच इंडियात ये हं. तसं मला वचन दे. तरच मी समजेन की तू मला क्षमा केलीस.”
आनंदाश्रूने माझे डोळे डबडबले. पप्पांच्या बागेतील सुकलेला गुलमोहोर फुलाने डवरलाय असा मला भास झाला.
Link Copied