भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलझार यांनी आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. राखी गेल्या काही वर्षांपासून त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नाहीत. परंतु राखी यांच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. राखी तब्बल १० वर्षानंतर पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात कमबॅक करत आहेत.
बॉलिवूडची दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी गुलजार बंगाली चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. राखी लवकरच 'अमर बॉस' या चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमात नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी हे लोकप्रिय कलाकार देखील दिसणार आहेत. राखीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
बंगाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये राखीचा शेवटचा चित्रपट २००३ मध्ये रिलीज झाला होता. राखीने रितुपर्णो घोषच्या 'शुभो मुहूर्त' नंतर कोणत्याही बंगाली चित्रपटात काम केले नाही.
काही काळापूर्वी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान राखीने तिच्या अभिनयाच्या निवडीबद्दल चर्चा केली होती. राखी म्हणाली होती की, "मी चित्रपटांमध्ये काम करायचे तेव्हा ते खूप वेगळे होते. मला सध्या काम मिळत नाही याबद्दल वाईट वाटत नाही. ज्या दिग्दर्शकांसोबत मी काम केले नाही त्यांच्यासोबत काम न केल्याची मला कसलीही खंत नाही. तपन सिन्हा हा माझा आवडता दिग्दर्शक आहे, तो ज्या पद्धतीने सर्वांसाठी चित्रपट बनवतो ते मला आवडते. एक अभिनेत्री म्हणून माझाही असाच विश्वास आहे."