थ्री इडियट्स या ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपटातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना ओमी वैद्य केरळी, केन्यन, मल्याळी, आफ्रिकन आहे असे वाटे पण तो तर आपला मराठी मुलगा ! आणखीन आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओमीने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती ! मग पहिला सिनेमा दिग्दर्शित करायचा तर तो मायभाषेतच या ओमीच्या निर्णयाबद्दल कुणाला नवल वाटायचं कारण नाही. तर मग आता ओमीची प्रमुख भूमिका असलेला, टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेला, 'आईच्या गावात मराठीत बोल' हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
चित्रपटाचा नायक समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा, धेडगुजरी बोलणाऱ्या समरचा कायापालट होऊ शकतो का? साता समुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक "मराठीपण" जोपासू शकतील काय? ह्या सगळ्या प्रश्ननांची उत्तरं समरला गवसतातच, पण प्रेम, कुटुंब, स्वतःची पाळंमुळं ह्याचा खरा अर्थही जसा समरला सापडतो तसाच त्याचा हा प्रवास प्रेक्षकांनाही भावेल.
या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, राजन वासुदेवन, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे.
अमेरिकेत जन्मलेला पण महाराष्ट्रबद्दल उर्मी असणारा ओमी वैद्य आणि अमेरिकेत राहत असून मराठीचा वसा जोपासणारी अमृता हर्डीकर ह्यांनी अमेरिकेतच ह्या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत - अविनाश विश्वजीत यांनी दिलेले आहे तसेच या चित्रपटाचे संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी केले आहे.
'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगळेकर असे कसलेले कलाकार आहेत.
ओमी वैद्य पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असल्याने रसिक प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.