Close

कवचकुंडले (Short Story: Kavachkundale)

  • मोहना मार्डीकर

शिरीष तयार होऊन बाहेर जायला निघाला नि तेवढ्यात आईने त्याला बजावलेच, “शिरीष, येताना तेवढे पार्लेचे पुडे घेऊन यायला विसरू नकोस. संध्याकाळी
काणे मंडळी मुलीला दाखवायला घेऊन येणार आहेत. लक्षात आहे ना तुझ्या?”
“हं” म्हणत शिरीष बाहेर पडला. आज त्याने निश्‍चयच केला होता. काही झालं तरी आज कांचनशी बोलून पक्का निर्णय करायचाच.
त्याला हे औपचारिक मुली पाहणं अजिबात पटत नव्हतं. तसं त्याने कांचनला मागच्या भेटीत बजावलंही होतं. तिने आपल्या आईवडिलांना सांगून त्यांचा होकार मिळवला होता, पण सध्या तू तुझ्या घरी सांगू नकोस, असं सांगून तिने त्याला पेचात आणलं होतं.
“आधीच तुझ्या आईला कोकणस्थ ब्राह्मण, गोरी मुलगी हवी आहे. त्यात आम्ही पडलो मराठा. त्या इतक्या मुली तुला दाखवण्यापूर्वीच नाकारताहेत. त्यांच्या तुझ्याविषयी खूप अपेक्षा आहेत. त्यातून तू त्यांचा एकुलता एक मुलगा. माझं स्थळ त्या ऐकताच क्षणीच नाकारतील. यातून आपण काहीतरी मार्ग शोधू या”, असं म्हणून कांचनने त्याला थोपवून धरलं होतं. पण शिरीषला हा ताण आता असह्य झाला होता.
आज ऑफिसला सुट्टी घेऊन तो आणि कांचन अंबाझरीच्या उद्यानात भेटणार होते. शिरीष ठरलेल्या जागी पोहचला, तरी कांचन अजून आली नव्हती. कांचनशी काय काय बोलायचं नि काय करायचं याचे विचार त्याच्या मनात घोळत होते. तेवढ्यात एक आंधळा भिकारी त्याच्यापाशी आला. त्याला पैसे देत असताना कांचन तेथे आली.
“शिरीष आपल्या भारतात इतके जास्त अंध लोक आहेत. आपण सर्वांनी खरं तर नेत्रदानाचा संकल्प करायला पाहिजे.” कांचनला थांबवीत शिरीष म्हणाला, “ए, हा विषय इथे काढायची ही वेळ आहे का? किती महत्त्वाच्या विषयावर बोलायला आज आपण इथे भेटतो आहोत. आपल्या जीवनातल्या एवढ्या मोठ्या गंभीर आणि महत्त्वाच्या समस्येला आधी सोडवू मग जगाची काळजी करू.”
“बरं बरं, बोल कशाला एवढ्या तातडीने मला इथे बोलावून घेतलंस ते सांग.”
“अग, आईने खूपच घाई चालवली आहे. स्थळांची माहिती आणि फोटो पाहून अर्ध्या मुली तीच नाकारत होती, तोपर्यंत ठीक होतं. पण आता जी पाच-सहा स्थळं तिला थोडी फार पटली आहेत, त्यात जी मुलगी तिला आवडली, तिला आज पाहायला बोलावलं आहे. खरं तर, नाकारण्यासारखं तिच्यात काहीच नाही, पण…” शिरीषचं बोलणं थांबवीत कांचन हसत म्हणाली, “अरे मग त्यात काय? पाहा आणि हो म्हणून टाक.”
शिरीष चिडला आणि म्हणाला, “आता मात्र अतीच झालं हं कांचन. तुझी ही मस्करी पुरे आणि आता मी मनाशी काय ठरवलं आहे, ते ऐकून घे.” असं म्हणत शिरीषने त्याच्या मनातला सर्व बेत कांचनला सांगितला.
“मी आईला तुझ्याबद्दल सर्व काही आज रात्री सांगेन. बाबांना फारसं समजवावं लागणार नाही, कारण एकतर ते खूप पुढारलेल्या विचारांचे आहेत आणि त्यांच्या पुरोगामी विचारसरणीमुळे ते आपल्या लग्नाला विरोध करणार नाहीत. शिवाय त्यांच्या माझ्याबद्दल आईसारख्या फारशा अपेक्षाही नाहीत. मुलगा हुशार, निर्व्यसनी व कर्तबगार असावा, नोकरीत चांगल्या पोझिशनवर असावा, हीच त्यांची इच्छा होती. पण अती प्रेमापोटी नि अती महत्त्वाकांक्षेपोटी आईच्या केवळ माझ्याबद्दलच नाही, तर सुनेबद्दलही खूप अपेक्षा आहेत. ती ऑर्थडॉक्स असल्याने सुनेनेही तिच्याप्रमाणेच परंपरावादी असावं, असं तिला वाटतं. पण सगळंच मनासारखं कसं मिळणार? काहीतरी सोडावं लागतं.” शिरीष बोलता बोलता थांबला.
कांचन म्हणाली, “त्यांच्या अपेक्षेप्रमाणे
मी रंगरूपाने नसले तरी त्यांच्या विचारांना, मतांना मी विरोध करेन असं तुला वाटतं का? मी त्यांना समजून घेण्याचा
प्रयत्न करीन.”
“तसं नव्हे गं कांचन. तशी ती खूप प्रेमळ आहे. पण तिची जी पुराणमतवादी विचारसरणी आहे ना ती तुझ्याच काय, पण आजकालच्या कुठल्याही मुलीला पटणं आणि आचरणात आणणं कठीण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विरोध, तिचा जातीला असणार. आजकालच्या काळात जातीला इतका विरोध बरोबर नाही ना! आंतरजातीय
विवाहाकडे समाज झुकतो आहे. पण मी
मात्र ठामपणे तिला सांगणार आहे की,
तू या लग्नाला विरोध केलास तर मी दुसर्‍या कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही. आता माझा विचार पक्का बरं का?”
शिरीषच्या बोलण्यावर कांचन गप्प बसली नाही. तिने आपलं मन मोकळं केलं. “शिरीष, मीसुद्धा तुझ्याशिवाय दुसर्‍या कुणाशी लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही. तू जे काही करशील त्याला मी
पाठिंबा देणारच.”
दोघंही हातात हात धरून उठली. ते हात असेच जन्मभर राहावेत, असे विचार एकाच वेळी दोघांच्याही मनात आले आणि ते ओळखून त्यांनी हात जास्तच घट्ट धरून ठेवले. एकमेकांकडे नजरेत नजर मिळवीत हसत राहिले. ‘तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्याच्या माळा’, कांचन गुणगुणत होती.
शिरीषने घरी आल्याबरोबर आईला सांगितले, “आई आजचा प्रोग्राम कॅन्सल कर. काण्यांकडे तसं ताबडतोब कळव.”
“अरे पण का? काय झालं?” आईने विचारलं.
“कळव तर आधी, मग सांगेन सगळं.” शिरीष म्हणाला.
नाराजीने बर्‍याच बोलाचालीनंतर त्यांनी काण्यांकडे फोन केला. शिरीषने आईबाबा दोघांनाही समोर बसवून, मन जरा पक्कं करून कांचनविषयी सांगायचं ठरवलं. हे सांगितल्यावर होणार्‍या वादळाची त्याला कल्पना होती, पण त्याला त्याच्या बाबांविषयी खात्री होती की, ते आईला पटवून देतील. त्यानंतर दोन दिवस घरात शांतता होती… ती वादळापूर्वीची शांतता होती. शिरीषने त्या वादळाला तोंड देण्याची तयारी केली होती. सुरुवात कोण आणि कशी करणार, हाच फक्त प्रश्‍न होता.
शिरीषच्या आई वसुधाताई तशा मनाने फार प्रेमळ, समंजस आणि दिलदार होत्या. शिरीष त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यामुळे त्यांच्या सर्व आकांक्षा शिरीषवर केंद्रित असणं अगदी स्वाभाविक होतं. शिरीषचे वडील वसंतराव लेले शांत, सज्जन मोठ्या पदावर असूनही निगर्वी आणि दिलदार. एकूण हे त्रिकोणी कुटुंब तसं सुखी, समाधानी होतं. शिरीष इंजिनिअरिंग उत्तम रीतीने पास झाला. आणि मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला लागला, तेव्हा त्याला कितीतरी चांगल्या, हुशार, सुंदर, सुशिक्षित आणि संपन्न घरातल्या मुली सांगून येऊ लागल्या. वसुधाताईंची पहिली अट होती की, मुलगी कोकणस्थ आणि गोरी-घारीच हवी. त्यामुळे त्यांनी न पाहताच फोटो आणि माहितीवरून बर्‍याच मुली नाकारल्या होत्या. आता हे काण्यांचं पहिलं वहिलं स्थळ त्यांच्या अपेक्षेत बसत होतं. फक्त शिरीषला ती मुलगी आवडली पाहिजे, एवढंच काय ते महत्त्वाचं होतं. असं असताना, शिरीषने ते मुलगी पाहण्यापूर्वीच झिडकारून लावलं. काय बरं कारण असेल? विचार करून करून त्या त्रासून गेल्या होत्या. शेवटी आज, तो कंपनीतून आल्यावर त्याला सर्व विचारायचंच, असं त्यांनी ठरवलं. वसंतरावही लवकर आले होते.
दोघांची खाणी उरकून शांतपणे सोफ्यावर बसत त्या म्हणाल्या, “शिरीष आता मला सांग, तू काण्यांची मुलगी पाहायला नकार का दिलास? कुणी दुसरी मुलगी आवडली आहे का तुला?”


“आई सर्व सांगतो. फक्त तू नीट शांतपणे ऐकून घे. आमच्या कंपनीत एक स्मार्ट, हुशार आणि सुस्वभावी मुलगी आहे. तिचं नाव कांचन भोसले. तिचे वडील आर्मीत होते, रिटायर्ड झालेत. आई शिक्षिका आहे. तिला एक भाऊ आहे, तो पण मिलिटरीतच कर्नल आहे. सगळे सुशिक्षित, सुस्वभावी आहेत. फक्त ते कोकणस्थ ब्राह्मण नाहीत, म्हणून मी तुला कसं सांगावं याच विचारात होतो.” शिरीष म्हणाला.
“फार छान केलंस हो! माझी तुझ्याबद्दलची सगळी स्वप्नं धुळीला मिळवलीस. समाजात आमची मान खाली घालायला लावलीस. मला हे स्थळ बिलकूलच पसंत नाही.” चिडून, वैतागून वसुधाताई म्हणाल्या. पण वसंतरावांनी त्यांची खूप समजूत घातली. शिरीषही त्यांना कांचनबद्दल खात्री देऊ लागला.
“अगं वसुधा, तू कोणत्या काळात वावरते आहेस? जग किती जवळ येत चाललं आहे. जातीपातीची बंधन आता ठेवता कामा नयेत. आणि शेवटी ती कुणी मुस्लीम किंवा ख्रिश्‍चन नाही. आपला त्यांचा धर्म हिंदू हा एकच आहे. चालीरीतींत असा कितीसा फरक पडणार? आणि आता ही पुढची पिढी तुमच्यासारखी सणवार नि व्रतवैकल्यात गुंतून पडणार नाही. तू एवढी ग्रॅज्युएट
असून इतकी कशी परंपरावादी राहतेस? बदल हे विचार आता, शिरीषला ती आवडली आहे. त्याला तिच्याबरोबर संसार करायचा आहे. आपण फक्त प्रेमाने आशीर्वाद देऊन त्यांचं हितचिंतक राहायचं.” वसंतरावांच्या
या बोलण्याने वसुधाताई थोड्या नरमल्या
व विचारात पडल्या.
शेवटी आईवडिलांची परवानगी मिळताच शिरीष त्यांना घेऊन कांचनच्या घरी
गेला. कांचनच्या आईवडिलांनी त्यांना रीतसर निमंत्रण देऊन जेवायलाच
बोलावलं होतं. सर्व मंडळी सुस्वभावी पाहून शिरीषच्या आईबाबांना समाधान वाटलं. दोघांचेही लग्न थाटामाटात पार पडले.
शिरीष आणि कांचनचा संसार सुखासमाधानाने सुरू होता. सोहम आणि आश्‍लेषा ही दोन गोजिरवाणी मुलं त्यांना झाली. आजीआजोबा नातवंडे खेळवण्यात आनंदात असताना लेल्यांच्या सुखी कुटुंबात एक मोठं वादळ आलं.
एक दिवस संध्याकाळी कांचन
ऑफिसमधून आल्या आल्या तिचं पोट दुखू लागलं. घरगुती उपायांनी बरं वाटेना, म्हणून शिरीष कंपनीतून आल्यावर तिला दवाखान्यात घेऊन गेला. कांचनला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावं लागलं. सगळ्या टेस्ट झाल्या आणि जे निदान हाती आलं, ते सांगायला डॉक्टर देशपांडे बाहेर आले. ते ऐकून शिरीष थिजून गेला. कांचनच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. तिला ताबडतोब डायलेसिस सुरू करावं लागणार होतं.
वसुधाताई घरी मुलांजवळ होत्या. वसंतराव शिरीषबरोबर हॉस्पिटलमध्ये होते. ते ताबडतोब घरी गेले आणि त्यांनी वसुधाताईंना ही अशुभ वार्ता सांगितली. एक क्षणभर त्याही घाबरून गेल्या.
सोहम चार वर्षांचा आणि आश्‍लेषा दोन वर्षांची. दोघंही लहान मुलं!
आई कंपनीमध्ये कामाला जाते, एवढंच त्यांना कळलं होतं. जेव्हा कांचन पोट दुखतंय म्हणून तळमळत होती, तेव्हा ती दोघंही कांचनबरोबर होती आणि घाबरून रडायला लागली होती. त्यांनी कांचनच्या आईवडिलांना फोन करून बोलावून घेतलं. ती दोघं कांचनबरोबर हॉस्पिटलमध्ये होती. शिरीष इतका नर्व्हस झालेला पाहून त्या दोघांनी तिथे थांबून त्याला धीर दिला आणि स्वतःचं दुःख, काळजी बाजूला ठेवून ते कांचनजवळ थांबत होते.
आता पुढे काय, हा प्रश्‍न आणि त्याचं उत्तर याची सर्वांना कल्पना होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, आधी तुम्हा घरातल्या मंडळींपैकी कुणी आपली एक किडनी द्यायला तयार आहे का पाहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ती किडनी कांचनला चालली पाहिजे. त्यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील. घरातल्या कुणाचीही किडनी जुळली नाही, तर कुणी दाता मिळेल तर बघू या. आजकाल मृत व्यक्तीची किडनी मिळू शकते किंवा किडनी विकणे हा गरीबांचा सर्रास व्यवसाय सुरू झाला आहे. ज्या व्यक्तीची किडनी मिळते, ती व्यक्ती निरोगी असणे हे महत्त्वाचे आणि ज्या व्यक्तीला ती लावली जाते तिच्या प्रकृतीशी ती जुळली पाहिजे. एकूण या सर्व गोष्टी सोप्या नाहीत, पण तोपर्यंत पेशंटला डायलेसिसवर ठेवणे महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे. हे डॉक्टरांचे सांगणे ऐकल्यावर स्वतः शिरीष आणि कांचनचे आईबाबा पुढे सरसावले. सर्वांच्या चाचण्या व तपासण्या झाल्या. कुणाचीही किडनी जुळत नव्हती. कुणीही कांचनला काही सांगत नव्हते, तरी एकूण संभाषणावरून, कुजबुजीवरून आणि काळजीग्रस्त चेहरे पाहून कांचनला थोडेफार लक्षात आले होते.
कांचन शिरीष म्हणाली. “शिरीष, लग्नापूर्वी आपण अंबाझरीच्या बागेत भेटलो होतो, तेव्हा तो आंधळा भिकारी भीक मागत तुझ्यापाशी आला होता… तू त्याला पैसे दिलेस तेवढ्यात मी तिथे आले आणि तुला म्हटलं होतं की, आपण सर्वांनी मृत्यूनंतर नेत्रदानाचा संकल्प आधीच करून ठेवला पाहिजे. तसे नेत्रपेढीत फॉर्म्स भरून ठेवले पाहिजेत. तेव्हा तू आपल्या लग्नाच्या काळजीत होतास म्हणून हा विषय तेवढ्यावरच राहिला, पण आता तुला दानाची महती कळली ना? देहदान, नेत्रदानाच्या संकल्पाच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो आणि देहदानामुळे मृत्यूच्या पश्‍चात सर्वच अवयव इतरांच्या म्हणजे गरजूंच्या कामी येत असतात. पण जेव्हा आपल्या स्वतःवर ती वेळ येते, तेव्हा गरजू व्यक्ती अगदी हतबल होतात. अरे, कवचकुंडलं दान करणार्‍या कर्णासारख्या औदार्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या पुराणातून आपल्याला माहीत आहे, पण प्रत्यक्षात आपले अवयव जिवंतपणी कुणाला दान करणं सोपं नाही. आपल्या प्रेमाच्या, रक्ताच्या नात्यातसुद्धा कठीण आहे. तेव्हा तू आता फार आशा ठेवू नकोस. आल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याची आपण तयारी करूया.”
शिरीष कांचनला थांबवीत म्हणाला, “कांचन, जास्त बोलून तू थकून जाशील. शांत पडून राहा. तुझ्या इतका मी निराश नाही. आपला भरला संसार असा मोडू देणार नाही. आपण प्रयत्न करू. माझा देवावर भरवसा आहे.” कांचनने मंद स्मित करीत डोळे मिटले.
तिच्या मिटल्या डोळ्यांसमोर तिला तिची गोजिरवाणी मुलं दिसत होती.
इकडे घरी शिरीषचे बाबा वसंतराव आपल्या लहान नातवंडांशी खेळत बसले होते.
कांचनचे आईबाबा नातवंडांना आपल्या घरी घेऊन जायला आले तेव्हा वसुधाताई घरी नव्हत्या, याचे त्यांना जरा आश्‍चर्यच वाटले. वसंतराव म्हणाले, “काहीतरी महत्त्वाचं काम आहे, म्हणून ती बाहेर गेली आहे. येईलच थोड्या वेळाने. बसा ना तुम्ही. कशी आहे कांचन आता?”
“ठीक आहे. आपणा सर्वांनाच तिच्या
या दुखण्याचा मोठा धक्का बसला आहे,
पण आता ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आहे. मिळेल आपल्याला कुणाची तरी मदत. पण तोपर्यंत हा डायलेसिसचा त्रास सहन करायलाच हवा.” कांचनचे बाबा उदासवाण्या सुरात बोलत होते. मुले आजीला बिलगली होती.
दोन-चार चकरा केल्यानंतर वसुधाताईंना दवाखान्यातून रिपोर्टस् मिळाले. त्यांची किडनी कांचनच्या किडनीला मॅच होत होती. तेव्हा आता सगळ्यांना ही आनंदाची बातमी सांगायला त्या अधीर झाल्या होत्या. शिरीष कांचनचं दवाखान्यातून डायलेसिस करून घरी घेऊन आला होता. कांचनचे आईबाबा नातवंडांशी बोलत बसले होते. वसुधाताईंनी घाईघाईने बेल वाजवली. दार उघडत वसंतराव म्हणाले, “का गं? बराच वेळ लागला. झालं का तुझं काम?”
“हो तर. खूप आनंदाची बातमी आहे. आलेच. आधी हातपाय धुऊन देवासमोर साखर ठेवून येते नि मग सांगते.” चपला काढीत वसुधाताई म्हणाल्या. त्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला होता. सर्व जण पाहतच राहिले. घरात जाऊन पाच मिनिटातच त्या परत बाहेर हॉलमध्ये आल्या नि आपल्या दोन्ही नातवंडांना जवळ घेऊन त्यांना कुरवाळत म्हणाल्या. “तुमची आई आता लवकर बरी होणार. माझ्या शिरीषचा संसार आता पुन्हा पूर्वीसारखा सुरळीतपणे चालेल. त्याचा सुखी संसार आणि ही गोजिरवाणी मुलं यांच्यातच आमचं सुख नाही कां?”
“अगं पण आई, नीट सांगशील का? कुणाची किडनी मिळाली? ती मॅच होतेय का हे पाहायला सगळ्या टेस्ट करायला हव्यात.” शिरीष म्हणाला.
“अरे हो हो, किती प्रश्‍न विचारशील? बरं झालं पुराणात, महाभारतात त्या वेळी अशा टेस्ट नसाव्यात नाहीतर कर्णाची कवचकुंडलं कशी जुळली असती? अरे, माझ्या सर्व टेस्ट डॉक्टरांनी केल्या आहेत. त्याचे रिपोर्टही आले. माझी किडनी कांचनला बरोबर मॅच होते आहे. तेव्हा आता आधी मला कांचनची दृष्ट काढू दे. खूप सोसलंय बिचारीने.” वसुधाताईंचा आनंद गगनात मावत नव्हता.
“यावरून एक गोष्ट सिद्ध होतेय.” वसंतराव म्हणाले, “माणूस हा सर्व बाजूंनी एकच आहे. ही जातीपातीची बंधनं माणसानेच घालून आपसात दुरावा निर्माण केला आहे आणि रक्तगट कुठलाही असो, पण रक्ताचा रंग लालच राहणार. तेव्हा वसुधा, आता तूच इतक्या दिलदार, प्रेमळ आणि समंजस स्वभावाची ओळख सर्वांना आपल्या कृतीने करून दिली आहेस, ही सर्वात जास्त समाधानाची गोष्ट!”

Share this article