नीना गुप्ता या मनोरंजन जगतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहेत. त्यांच्या अभिनयासाठी आणि भूमिकांसाठी त्यांचे नेहमीच कौतुक झाले आहे, याशिवाय नीना गुप्ता त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि धाडसी विधानासाठी देखील ओळखली जातात. मग ते प्रेम असो, वासना असो, सेक्स असो, नाती असो किंवा आणखी कोणताही मुद्दा असो, नीना गुप्ता आपली मते मोकळेपणाने आणि चांगल्या पद्धतीने मांडतात . त्यामुळे पूर्वीच्या आणि आताच्या दोन्ही पिढ्यांना त्यांचे शब्द आपलेसे वाटतात. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये, नीना गुप्ता पुन्हा अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने बोलल्या.
या पॉडकास्टमध्ये नीना यांनी सांगितले की, लहान वयात प्रत्येकजण चुका करतो, मीही त्या केल्या. विशेषतः मी चुकीच्या लोकांच्या प्रेमात पडले. त्या म्हणाल्या, "मी लहान असताना, जर एखाद्या मुलाने मला थोडे प्रेम दाखवले तर मी त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. मला वाटायचे की त्याचे माझ्यावर प्रेम आहे. बहुतेक मुली हे लहान वयात करतात. मी सुद्धा अशा चुका अनेकवेळा केल्या,पण स्वतःला सुधारण्याचा विचार कधीच केला नाही.मी हे केले कारण माझा स्वाभिमान खूप कमी झाला होता,मला वाटायचे की मला पसंत करून तो मुलगा माझ्यावर उपकार करतोय.म्हणूनच मी स्वतःला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. यावरुन सांगते तुमचा सन्मान कधीही कमी होऊ देऊ नका."
नीना गुप्ता यांनीही स्त्रीवादावर भाष्य केले. त्यांनी ही गोष्ट निरुपयोगी म्हटली. "या निरुपयोगी स्त्रीवादाचा विचार करण्याची गरज नाही, स्त्री-पुरुष समान आहेत. मला असे म्हणायचे आहे की स्वतःला लहान समजण्यापेक्षा स्वतःची किंमत समजून घेणे चांगले आहे. जर तुम्ही गृहिणी असाल तर स्वतःला कमी लेखू नका, समजून घ्या. ही एक महत्त्वाची भूमिका आहे. स्त्री आणि पुरुष सारखे असू शकत नाहीत. ज्या दिवशी पुरुषाला मुले होऊ लागतील, त्या दिवशी दोघांना समान म्हटले जाईल."
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या की, स्त्रियांना नेहमी पुरुषांची गरज असते, "स्त्रियांना पुरुषांची जास्त गरज असते. मला आठवते की मी तरुण आणि अविवाहित असताना मला 6 वाजताची फ्लाईट पकडायची होती. जेव्हा मी पहाटे 4 वाजता उठले आणि घरुन निघाले. तेव्हा एक मुलगा माझा पाठलाग करु लागला. त्यावेळी मी खूप घाबरले आणि घरी परतले. मग मी दुसऱ्या दिवसासाठी फ्लाइट बुक केली आणि माझ्या मित्राच्या घरी थांबले जेणेकरून तो मला विमानतळावर सोडू शकेलअशा प्रकारे आम्हाला त्यांची अधिक गरज आहे."
जेव्हा नीना गुप्ता यांना चाहत्यांना नातेसंबंधांचा सल्ला देण्यास विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, ती स्वत: नेहमीच नातेसंबंधांमध्ये संघर्ष करत आलीय. "मी नात्याचा कोणता सल्ला देऊ? मी स्वतः नेहमी चुकीच्या लोकांवर प्रेम केले आहे. नात्याचा सल्ला देण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. कारण मी काही मूर्खपणाचा सल्ला देईन."