मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबेला नुकताच स्टार्स आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. लॉस एंजेलिसमधल्या डाऊनटाऊनमध्ये झालेल्या या सोहळ्यात स्मिता तांबेला 'जोरम' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार एका कोरियन अभिनेत्रीसोबत स्मिताला विभागून देण्यात आला.
हा पुरस्कार पटकल्यानंतर स्मिताने, 'एका कोरिअन चित्रपटातील अभिनेत्रीला आणि मला असा विभागून 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देण्यात आला. सुंदर हिऱ्यांनी सजलेलं ते मानचिन्ह स्वीकारताना खूप खास वाटत होतं. जागतिक स्तरावर आमचा सिनेमा दाखवणं ही अभिमानाची बाब आहे.' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
स्मिताचं सध्या चाहत्यांकडून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. 'जोरम' हा चित्रपट ८ डिसेंबरला जगभर प्रदर्शित होणार आहे.
अभिनंदन स्मिता! आम्हाला तुझा अभिमान आहे…