यंदाच्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 'मॅन ऑफ दि टूर्नामेंट' ठरलेल्या विराट कोहलीला त्याचे चाहते 'किंग कोहली' म्हणून ओळखतात. क्रिकेटच्या मैदानावरचा राजा असणारा कोहली हा इंटरनेटवर देखील 'किंग' असल्याचं स्पष्ट झालं आहे. या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटर म्हणून विराट कोहलीचं नाव समोर आलं आहे.
'रन मशीन', 'चेज मास्टर' अशा नावांनी ओळखला जाणारा कोहली हा सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर आहे यात शंका नाही. गुगल सर्चच्या अहवालामुळे तर हे स्पष्टच झालं आहे. इन्स्टाग्रामवर देखील कोहलीच सर्वाधिक फॉलोवर्स असणारा आशियाई व्यक्ती आहे. त्याचे याठिकाणी तब्बल २५९ मिलियन फॉलोवर्स आहेत.
आशियामध्येही कोहलीच टॉप
यासोबतच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला आशियाई व्यक्ती देखील विराट कोहलीच ठरला आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध के-पॉप सिंगर व्ही (BTS V) आणि जुंग कुक (Jungkook) यांनाही विराट कोहलीने मागे टाकलं आहे. हे सिंगर्स BTS या साऊथ-कोरियन ग्रुपचे मेंबर्स आहेत. जगभरात यांचे कोट्यवधी फॅन्स आहेत. मात्र, कोहलीने त्यांनाही मागे टाकलं आहे.