अमिताभ बच्चन हे भारतीय मनोरंजन विश्वातील महानायक म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांना आपण गेली अनेक वर्षे विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अमिताभ यांचे सिनेमे पाहणं रसिकांसाठी पर्वणी असते.
सध्या बिग बी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत ते म्हणजे क्रिकेट वर्ल्डकपमुळे. येत्या रविवारी क्रिकेट वर्ल्डकप २०२३ ची फायनल रंगणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानिमित्ताने अमिताभ यांनी एक पोस्ट लिहीलीय ती चर्चेत आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या X हँडलवर एक ट्विट केलंय ज्यात त्यांनी, मी आता विचार करतोय जाऊ की नको? असा प्रश्न विचारलाय.
अमिताभ असं का म्हणाले यामागे एक खास कारण आहे ते म्हणजे, काही दिवसांपुर्वी अमिताभ यांनी ट्विट केलं होतं की, जेव्हा ते सामना पाहत नाही तेव्हा भारतीय क्रिकेट संघ नेहमीच जिंकतो.
त्यामुळे या ट्विटखाली बिग बींना लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी अमिताभ यांना चक्क सामना न पाहण्याचा सल्ला दिला आहे. अमिताभ यांनी ट्विट केल्यावर नेटिझन्सनी त्यांना रविवारी आगामी ICC विश्वचषक अंतिम सामना न पाहण्याचा इशारा दिला.
एका यूजरने लिहिले की, 'सर फायनल मॅच पाहू नका.' दुसऱ्याने लिहिले, 'बच्चन सर, घरातच राहा.' दुसऱ्या युजरने हिंदीत कमेंट केली की, 'वर्ल्ड कप फायनलच्या वेळी अमिताभ यांना एका दुर्गम बेटावर लॉक करण्याची काहीतरी व्यवस्था करूया.'
युजर्सनी गंमतीशीर कमेंट करत अमिताभ यांना वर्ल्डकप फायनल न पाहण्याचा सल्ला दिलाय. अशाप्रकारे आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता अमिताभजी वर्ल्डकप पाहायला जावं की जाऊ नये या संभ्रमात आहेत.
भारताने न्युझीलंडला सेमीफायनलमध्ये हरवून वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मजल मारली. तर काल साऊथ आफ्रिकेला हरवत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये आलीय. त्यामुळे रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्डकपचा फायनल मुकाबला रंगणार आहे. १९८३, २०११ नंतर भारत यंदा तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.