अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे काही दिवसांमध्येच विवाहबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. गेले काही दिवस ते दोघे चांगलेच चर्चेत आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून ते घराघरांत पोहचले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच दोघांनी गुपचूप साखरपुडा करीत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला होता. आता लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. आता दोघांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.
अमृताने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाची डिजिटल निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. अमृता आणि प्रसादची ही लग्नपत्रिका ‘बिग बॉस’च्या थीमवर आधारित आहे. तसेच या पत्रिकेत अमृताने केलेल्या कवितेचाही समावेश आहे. अमृता आणि प्रसादच्या लग्नाची ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
येत्या शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी अमृता आणि प्रसाद लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांच्या घरी लग्नाची जय्यत तयारीही सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. नुकतेच दोघांच्या ‘ग्रहमख’ कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एका ओपन रिसॉर्टमध्ये प्रसाद आणि अमृताचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. निसर्गरम्य वातावरणात आणि साध्या व सुंदर पद्धतीने लग्न करण्याची दोघांची इच्छा आहे. मात्र, अद्याप लग्नस्थळाचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.