बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची दिवाळी सध्या जोरात साजरी होत आहे. कारण त्याचा नुकताच रिलीज झालेला टायगर ३ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केलेली पाहायला मिळते. अवघ्या २ दिवसांत या सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये एंट्री केली आहे.
सलमान खानचे मागील काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नव्हते. पण आता टायगर ३ ने ही सर्व कसर भरुन काढली आहे. या चित्रपटाच्या यशाबद्दल दोन दिवसांपूर्वी सिनेमागृहात फटाके देखील फोडल्याचे पहायला मिळाले. अशातच सलमान खानचा आणखी एक जबरा फॅन सापडला आहे. सलमान खानच्या " टायगर ३" या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी एक हैद्राबादचा फॅन चक्क हैद्राबाद ते मुंबई पायी प्रवास करत आहे. नवीन असे या फॅन चे नाव असून तो हैद्राबादवरून पायी मुंबईकडे निघाला आहे.
मूळचा हैद्राबाद येथील असणारा नवीन हा पेंटिंगची कामे करतो. लहानपणापासून तो सलमान खानाचा मोठा चाहता आहे. तो सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटासाठी देवाकडे प्रार्थना करतो. मात्र यावेळी सलमान खानाच्या टायगर ३ या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी तो चक्क हैद्राबाद वरून मुंबईकडे पायी प्रवास करत निघाला आहे. नवीन हा ६ नोव्हेंबर रोजी हैद्राबाद येथून मुंबईकडे पायी निघाला आहे. त्याने त्यांच्या खांद्यावर टायगर ३ सिनेमाचा बोर्ड लावला आहे. सलमानच्या सिनेमाला चांगली ओपनिंग मिळावी यासाठी तो पायी मुंबईकडे निघाला आहे. मुंबईत गेल्यावर तो सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार असून त्यानंतर सलमान खानची देखील भेट घेणार असल्याचे त्याने सांगितले. आतापर्यंत त्याने ६६४किमीचा प्रवास पार केला आहे. पुढच्या दोन दिवसात तो मुंबईत पोहचेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.