'कमांडर’ या अंकाच्या हॉलीवुड चित्रपट विशेषांकात गाजलेल्या हॉलिवुड चित्रपटांची अतिशय रंजक माहिती आहे, त्यामुळे हा अंक वाचनीय तसंच दर्जेदार' असल्याचं ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी म्हटलं आहे.
या दिवाळी अंकाचं प्रकाशन नुकतंच बोरिवली इथे एका छोटेखानी समारंभात नलावडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अंकाचे मानद संपादक डॉ. राजू पाटोदकर, ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर, बोरिवली नाट्य परिषद शाखेच्या कार्यकारिणी सदस्य सुप्रिया चव्हाण, एचडीएफसी बँकेचे पुणे येथील उपाध्यक्ष विजय गोरासिया, सहसंपादक नयना रहाळकर, लेखक मल्हार दामले, अंकाचं मुखपृष्ठ साकारणारे कौस्तुभ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
"अंकाचं २७ वर्षांचं सातत्य आणि चित्रपट विषयक बहुमोल अशी माहिती हे देखील आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे", असंही श्री नलावडे यावेळी म्हणाले. 'श्वास' या चित्रपटाने ऑस्कर हॉलीवुड वारी केली होती तेव्हाचे अनुभवही श्री नलावडे यांनी सांगितले.
'गेल्या २७ वर्षांपासून मुख्य संपादक प्रा. डॉ. संजय पाटील - देवळाणकर यांच्या मार्गदर्शनात कमांडर तयार होत आहे. दरवर्षी एखादा विशिष्ट विषय घेऊन त्यावर संपूर्ण अंक प्रकाशित करणं हे 'कमांडर'चं खास वैशिष्ट्य. या वर्षी एक नवीन प्रयोग म्हणून जागतिक पातळीवर गाजलेले, लोकप्रिय ठरलेले चित्रपट अर्थातच ‘Hollywood चित्रपट विशेषांक’ 'कमांडर'ने प्रकाशित केला आहे. गेल्या शतकातील उत्तमोत्तम अशा हॉलीवुडच्या चित्रपटांची मराठीतून माहिती देऊन अंक सजवण्यात आला' असल्याची माहिती सहसंपादक नयना रहाळकर यांनी दिली.