Close

‘सुंदरी’ मालिकेचं नवीन पर्व सुरू; सुंदरी सांभाळणार आईपण आणि देशसेवा (Marathi TV Serial ‘Sundari’ Takes A New Leap: Heroine Creates Her Own Identity)

‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ ही मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक भागात कथेला एक वेगळं रुप मिळत गेल्यामुळे प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले. आता या मालिकेचं नवीन पर्व सुरु झाले आहे.

स्त्रीने जर ठरवलं ना तर ती शून्यातून देखील विश्व निर्माण करु शकते हे या मालिकेतील ‘सुंदरी’ या पात्राने सिद्ध करुन दाखवलंय. आपल्या कुटुंबासाठी जगणारी, सर्वांना सांभाळून घेणारी सुंदरी आता तिची एक स्वतंत्र अशी ओळख तयार करणार आहे. सुंदरी फक्त स्वत:च्या करिअरमध्येच एक विशेष स्थान तयार करणार नसून स्वत:च्या आयुष्यातही आईपणाची जबाबदारी पेलणार आहे. सुंदरी आता ‘कलेक्टर’ म्हणून ओळखली जाणार आणि देशसेवेसोबतच अनु आणि आदित्यच्या मुलीची आई हे नातं देखील ती जबाबदारीने पार पाडणार आहे. या दोन्ही जबाबदा-या सुंदरी कशी सांभाळेल? सुंदरीचा पुढील प्रवास एका संपूर्ण नव्या कथेने सुरु झाला आहे.

प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले असणार, जसे की, सुंदरीने लग्न केलं की नाही? अनु आणि आदित्यच्या मुलीचा सांभाळ सुंदरी का करणार? अनु आणि आदित्य नेमकं कुठे आहेत? त्यांच्या बाबतीत काय घडलंय? त्यांनी त्यांची मुलगी सुंदरीकडे का दिली असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच या नवीन पर्वात उलगडतील.

जसे मालिकेचे कथानक नवीन आहे त्याचप्रमाणे नवीन कलाकार  देखील या मालिकेचा भाग बनणार आहेत. ‘सुंदरी’ची भूमिका अभिनेत्री आरती बिराजदारच साकारणार असून अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री वनिता खरात हे दोन नवीन कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पूर्वी मालिकेचा सेट कोल्हापूर येथे होता परंतु आता मालिकेचा सेट मुंबईत आहे. नवीन कथा, नवीन कलाकार प्रेक्षकांची मालिकाप्रती उत्सुकता वाढवतील हे नक्की.

Share this article