दिल्लीतील यंदाचे रावण दहन थोडे वेगळे असणार आहे. यावेळी रावण दहनाचा बाण एका स्त्रीच्या हातून सुटणार आहे. ती महिला म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आहे. खुद्द लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
'लव कुश रामलीला' समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी ही माहिती दिली की, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मंगळवारी, २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिल्लीतील प्रसिद्ध 'लव कुश रामलीला'मध्ये रावण दहन करणार आहे. ते म्हणाले की, लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या ५० वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखादी महिला बाण मारून रावणाचे दहन करेल. महिला आरक्षण विधेयकाला संसदेने मंजुरी दिल्याने समितीने हा निर्णय घेतल्याचे अध्यक्षांनी सांगितले.
५० वर्षात पहिल्यांदाच एक महिला रावण दहन करणार
अध्यक्षांनी 'पीटीआय-भाषा' या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'फिल्मस्टार राजकारणी यांसारखे व्हीआयपी आमच्या कार्यक्रमात दरवर्षी उपस्थित असतात. गेल्या काही वर्षांत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. चित्रपट अभिनेते अजय देवगण आणि जॉन अब्राहम देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी प्रभासने रावणाचे दहन केले होते. यावेळी, आमच्या कार्यक्रमाच्या ५० व्या वर्षी प्रथमच, एक महिला रावण दहन करणार आहे.