वाढत्या वयाबरोबर स्त्रीचे शरीर अनेक बदलांमधून जात असते. साधारणपणे १२व्या वर्षी ते पौगंडावस्थेतून जाते, ज्याच्या परिणामी त्यांच्या शरीराला बदलांची चाहूल लागते आणि मासिक पाळी सुरू होते. या स्थित्यंतरातील दुसरे पर्व साधारणत: वयाच्या ४६व्या वर्षाच्या दरम्यान येते, जेव्हा सर्वसाधारण भारतीय महिला – पाश्चिमात्य देशांतील महिलांच्या तुलनेत पाच वर्षे आधी रजोनिवृत्तीचा काळ अनुभवतात. हा महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा असतो, जिथे मासिक पाळीचे चक्र थांबते आणि हॉट फ्लशेस, रात्री घामाघूम होणे, सांधेदुखी आणि पाठदुखी, योनीमार्ग कोरडा होणे आणि अशी कितीतरी लक्षणे दिसून येऊ लागतात.
रजोनिवृत्तीच्या काळातील परिवर्तन स्त्रीच्या शरीरावर वेगळ्या पद्धतीने परिणाम करते आणि हा बदल गुंतागूंतीचा, कधी प्रचंड परिणाम करणारा असू शकतो. मात्र हा काळ केवळ शारीरिक लक्षणांपुरता मर्यादित नसतो – तर स्त्रीच्या मानसिक स्वास्थ्यावरही त्याचा परिणाम होतो. रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीला नैराश्य, भावनांची तीव्र आंदोलने (मूड स्विंग्ज), चिडचिडेपणा, निद्रानाश (व त्यामुळे येणारा थकवा), चिंता, अवधान कमी होणे आणि विसराळूपणा यांसारख्या मानसिक आणि संज्ञानात्मक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
आयुष्यातील या टप्प्यातून मार्ग काढणे ही भावनिकदृष्ट्या खूप जड जाणारी आणि चकविणारी गोष्ट ठरू शकते. या टप्प्यावर मनावर असणारा खुद्द जगण्याचा ताण या आव्हानांमध्ये अधिकच भर टाकतो. आपल्या चाळिशीमध्ये बरेचदा महिला नोकरी करणे, मुलांचे संगोपन किंवा मोठ्या झालेल्या मुलांना कॉलेजांमध्ये पाठवणे (आणि त्यांच्याविना रिकाम्या झालेल्या घराशी नव्याने जुळवून घ्यायला शिकणे) किंवा आपल्या म्हाताऱ्या वा आजारी पालकांची काळजी घेणे अशा अनेक जबाबदाऱ्या एकाचवेळी सांभाळण्याची कसरत साधत असतात.
रजोनिवृत्तीचा काळ जवळ येऊ लागला की, काही महिलांना काही भावनिक आणि संज्ञानात्मक लक्षणे जाणवू लागतात आणि वेळीच उपाय केला नाही तर या समस्या एक समाधानकारक आयुष्य जगण्याच्या आड येऊ शकतात.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी जवळ-जवळ ७३ टक्के नोकरदार महिलांनी कामावरून वारंवार रजा घेण्याची गरज वाटत असल्याचे सांगितले आणि कामाच्या ठिकाणी लक्ष लागत नसल्याचे त्याहूनही अधिक स्त्रियांनी सांगितले. लक्षणे, विशेषत: कामाच्या ठिकाणी जाणवू लागली तर त्रासदायक ठरू शकतात आणि संभवत: महिलांना आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यापासून रोखू शकतात. यामुळे महिलांना अधिक एकाकीपण, समाजापासून तुटल्याची भावना जाणवते आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा भार येतो.
भारतातील अबॉटच्या मेडिकल अफेअर्स विभागप्रमुख डॉ. रोहिता शेट्टी म्हणाल्या, “महिलांसाठी रजोनिवृत्तीच्या काळातून मार्ग काढण्याचा अर्थ अनेक आव्हानात्मक लक्षणांचा सामना करणे असा असतो, ज्यातील काही लक्षणे त्यांच्या मानसिक स्वास्थ्याशी संबंधित असू शकतात. हा काळ खडतर असू शकतो हे खरे आहे, मात्र महिलांनी एकट्याने तो पार करण्याची गरज नाही. आपली लक्षणे सांभाळण्यासाठी कोणत्या सर्वसमावेशक उपाययोजनांची मदत होऊ शकेल हे त्यांना समजावण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांना मुक्त संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित केल्यास अधिकाधिक महिला रजोनिवृत्तीच्या काळाचा सहज स्वीकार करू शकतील आणि आपले आयुष्य अधिक आत्मविश्वासाने व्यतीत करू शकतील.”
डॉ. गीता बलसरकर, प्रा. युनिट चीफ नवरोसजी वाडिया हॉस्पिटल, सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई, म्हणाले, “रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना मानसिक आरोग्य समस्या जाणवू शकतात व त्या कोणती जीवनशैली आणि उपचारांच्या शिफारशी स्वीकारणार यासंबंधीच्या निर्णयांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेविषयी जागरुकता निर्माण करणे हे स्त्रियांना आपल्या डॉक्टरांशी वा प्रियजनांशी मोकळा संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल असते.”
तुमचा रजोनिवृत्तीचा काळ जवळ आला असेल किंवा या काळातून जाताना तुम्हाला काही आव्हाने सामोरी येत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला योग्य ती देखभाल मिळेल आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करत राहता येतील. त्याचवेळी आपले मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचाही विचार करा – आपल्या मूड्सवर देखरेख ठेवा आणि तुमची मानसिक लक्षणे तीव्र झाल्यास, ही लक्षणे तुमच्या दैनंदिन जगण्यामध्ये हस्तक्षेप करू लागल्यास व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घ्या. याशिवाय स्वत:साठी वेळ काढा.