यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार प्रसिद्ध रंगभूमी कलाकार, ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगलीच्या वतीने देण्यात येणारा आणि नाट्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार ५ नोव्हेंबर या रंगभूमीदिनी प्रदान करण्यात येणार आहे. इ.स.१९५९ मध्ये बालगंधर्वना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला. विष्णुदास भावे गौरव पदक, २५ हजार रोख रक्कम, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यावर्षी हा मान आपले लाडके प्रशांत दामले यांना मिळणार आहे.
रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलावंतांना विष्णूदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा समारंभाचे हे ५५ वे वर्ष आहे.