मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणाचं दुसरं पर्व २१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे.स्टार प्रवाहच्या परिवारात नव्याने सामील झालेल्या सदस्यांसोबत यंदाचं पर्व नव्या जोशात रंगणार आहे. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या या पर्वातही असणार आहेत. दोन मालिकांच्या टीममधली सांगितिक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच पण त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती-जमतीही या मंचावर उलगडतील.
अभिनेता सिद्धार्थ जाधव या नव्या पर्वासाठी अतिशय उत्सुक असून प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा या पर्वाची वाट पहात होतो अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली. आता होऊ दे धिंगाणाने टीआरपीचे नवनवे विक्रम रचले होते. हा कार्यक्रम जेव्हा संपला तेव्हा पुन्हा कधी सुरु होणार याची प्रेक्षकांकडून सातत्याने विचारणा होत होती. नवी ऊर्जा घेऊन हा कार्यक्रम लवकरच भेटीला येतोय. या कार्यक्रमात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि एक वेगळा धिंगाणा आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावा असा हा कार्यक्रम माझ्या अत्यंत जवळचा आहे. स्टार प्रवाह वाहिनीला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून प्रेम मिळत आहे. या कुटुंबाचा भाग असल्याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे अश्या शब्दात सिद्धार्थ जाधवने आपली भावना व्यक्त केली.
त्यामुळे सिद्धार्थ जाधवची एनर्जी आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर होऊ दे धिंगाणाचं दुसरं पर्व पाहायलाच हवं.