-कल्पना कोठारे
घड्याळाचा काटा बाराच्या पुढे सरकत चाललेला पाहून एक लतीफ खुर्चीत बसून कामाला लागला, दुसरा लतीफ मात्र मस्त ए.सी. कारमध्ये विठ्ठलच्या मांडीवर बसून घराकडे परतत होता.
‘ओ! नो!’ वसुधा चरफडत स्वतःशीच बोलली. आजही तिची बोरिवली फास्ट लोकल थोडक्यात चुकली. अंधेरीच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवर बोरिवली फास्ट गाडी येत असल्याची घोषणा लाऊडस्पीकरने केली. तेव्हा ती जिना चढून पुलावर पोचली होती. परंतु नुकत्याच चर्चगेटहून आलेल्या अंधेरी गाडीतील जमावाने ती ढकलली गेली. तिला बोरिवली ट्रेनच्या लेडीज डब्यापर्यंत पोहताच आले नाही. डोळ्यादेखत फास्ट ट्रेन चुकली. लहान मुलाच्या हातातील आईस्क्रीम टपकन् खाली पडून हाती नुसती काडी शिल्लक उरावी-तसेच काहिसे वसुला वाटत राहिले. नाईलाजाने ती परत फिरून दोन नंबरवरील नुकत्याच रिकाम्या झालेल्या अंधेरी स्लो गाडीकडे चालू लागली.
खिडकीतून राधा तिला हात करीत होती. राधाने राखून ठेवलेल्या सीटवर बसता बसता वसुने नाराजी व्यक्त केलीच. “शी! बाई थोडक्यासाठी चुकली गं फास्ट ट्रेन. आता परत ‘लेट लतीफ’ म्हणून सगळे चिडवणार. शिवाय बॉसही डोळे वटारणार. या महिन्यातला हा तिसरा लेट मार्क!”
“जाऊ दे ग! इतकी काय घाबरतेस? सहा महिने होऊन गेले न, तुला जॉईन होऊन?” राधा आस्थेने म्हणाली. “राधा तुला ठाऊक नाही ग, सध्या आमचा बॉस ‘तो’ नाहीये, ‘ती’ आहे. पूर्वीचे आमचे जॉली पारसीबाबा कुठे अन् ही नव्याने आलेली त्यांची मुलगी कुठे? खडूस आहे ग
अगदी बया!”
“अगं हळू बोल कुणी ऐकलं तर?”
“ह्यॅ इकडे कोण ऐकणाराय? ती बया राहते कुलाब्याला. शोफर ड्रिव्हन कारने ती येते. तिला हे लोकल्स धावत पकडणे वगैरे काय समजणार? भर पावसातही गाड्या लेट असतात ही सबब ती ऐकूनच घेत नाही. उशिरा यायचं असेल तर रजेसारखा अर्ज टाकावा लागतो.”
“अगदी महिषासुरमर्दिनीच दिसते तुझी बॉस!”
“हो पण आमची महिषासुरमर्दिनी पूर्ण पाश्चात्य पेहरावात असते बरं का? एक रागीट नजर सोडली तर बाकी सारं गोड असतं हं दिसायला. म्हणजे पर्स, शूज सगळं मॅचिंग. कधी स्कर्ट ब्लाऊज वर जॅकेट, टाय किंवा बो, तर कधी मस्त टेलर्स शर्ट पॅन्ट! अग आमच्याकडे एक राम नावाचा मुलगा आहे नं तो मॅडम न म्हणता ‘सणफ’च म्हणतो बॉसला” ‘सणफ’ म्हणजे?”
“अग म्हणजे फणसच्या उलट. बाहेरून गोड आतून काटेरी!”
“पुरे ग तुझं मॅडम पुराण. पण हा राम कोण?” “नो वे भुवया वर नेऊ नकोस उगीच. मी म्हणजे काय, तू
आहे का?”
“खरंच कुठवर आलेत तुमचे कांदे पोहे?” मागील भेेटीतच राधाने वसुला सांगितले होते की तिने आई बाबांना कांदेपोह्यांच्या कार्यक्रमासाठी ग्रीन सिग्नल दिला होता. राधाच्या कांदेपोहे कार्यक्रमांचे एकेक किस्से ऐकता ऐकता ट्रेन चर्नी रोड स्टेशनजवळ कधी आली ते दोघींनाही कळले नाही.
“चल् बाय, भेटूया अशाच.”
“अगं अशाच का? रविवारी ये न घरी. मस्त वर्सोवा बीचवर जाऊ या फिरायला. जेवायलाच येतेस का?” “जेवायला नको ग.”
“मग दुपारी चारला जमेल की कांदेपोहे आहेत परत या रविवारी?”
“नाही नाही नक्की येते चार वाजता. फोन करीनच त्याआधी ओके? बाऽय.” राधा गाडीतून उतरल्यावर वसुही चर्चगेटला उतरण्याकरिता दाराजवळ येऊन उभी राहिली.
वारंवार घड्याळाकडे बघणेही वसुला आता नकोसे वाटत होते. ऑफिस गाठेपर्यंत नक्कीच साडेअकरा वाजणार होते. झपाझप जिना उतरून, चढून वसुने अंडग्राऊंड क्रॉसिंग पार केले. पारसी विहिरीनंतरच्या सिग्नलला ‘क्रॉस नाऊ’ ची वाट पाहत ती थांबली. इतक्यात गाड्यांच्या ब्रेक्स्चे कर्णकटू आवाज झाले. रस्त्यावरून आडव्या जाणार्या गाड्यांपैकी एका कारने जबरदस्त ब्रेक मारला होता. ‘कुंई, कुंई, कुंई’ करीत एक छोटेसे केसाळ काळे कुत्रे पळत वसुच्या दिशेने आले. नकळत वसुने पिल्लू उचलून घेतले. थांबलेले ट्रॅफिक पूर्ववत चालू झाले. पिल्लाला कुठे लागलेले दिसत तरी दिसत नव्हते. त्याचे तपकिरी डोळे मात्र खूपच भेदरलेले वाटत होते. एखाद्या लहान बाळासारखे! कुत्र्याचा मालक म्हणून कोणीच समोर येईना. ट्रॅफिक पोलिसही दिसत नव्हता. इकडे तिकडे बघून अखेर वसु दोन पावले मागे गेली व तिने पिल्लाला
पारसी विहिरीलगतच्या जमिनीवर अलगद सोडून दिले. मनगटावरील घड्याळाचे काटे जणू तिच्याकडे डोळे वटारून बघत होते. गोडुल्या, घार्या डोळ्यांना नजरेनेच ‘बाय्’ करून वसु परत ऑफिसच्या दिशेने झपाझप चालू लागली. सुदैवाने आता सिग्नलही ‘पुढे चला’ म्हणत होता. सी.टी.ओ. बिल्डींंगच्या पायर्यांशी तिला परत थबकावे लागले.
पायातील निघालेले व्हेल्क्रोज लावायला ती ओणवी झाली. तिची नजर सहज मागे वळली तो काय आश्चर्य! ते काळे, केसाळ कुत्रे चक्क तिच्या मागोमाग तुरू तुरू येत होते.
‘ओ माय गॉड! या ब्लॅक ब्यूटीचं करायचं तरी काय?
हे सिग्नल्स झाल्यापासून पोलिसांचाही पत्ता नसतो.’
वसुधाच्या विचारांची साखळी तिच्या पायांइतकीच भराभर चालू होती.
हुतात्मा चौकाचे सिग्नल्स पार करून तिने ऑफिसचा फुटपाथ गाठला. पिल्लू तिच्यामागे येतच राहिले. ऑफिस गाठण्याच्या गडबडीत प्रत्येक जण होता. कुणाचेही त्या पिल्लाकडे लक्ष नव्हते. वसु मात्र त्या पिल्लाचे घारे आर्जवी डोळे, त्याचा कुंई कुंई स्वर, मऊ मऊ स्पर्श हे सारे सोबत घेऊन चालत होती. ऑफिस बिल्डींग आली. नेहमीप्रमाणे लिफ्टबाहेर लाईन होती. वसुचे ऑफिस पहिल्या मजल्यावर असल्याने ती दगडी पायर्या चढू लागली. पिल्लू तिच्यामागे होतेच! एक डोळा मनगटी घड्याळावर तर दुसरा त्या अनाहुतावर. अखेर तिने निर्णय घेतला व झटकन पिल्लाला उचलून खांद्यावरील शबनमवजा बॅगेत टाकले. ऑफिसचा काचेचा दरवाजा ढकलला. शिरता क्षणीच विठ्ठल शिपायाच्या ताब्यात ती पिल्लू देणार होती.
‘हाय रे दैवा आधीच उशीर झालाय अन् विठ्ठलही दिसत नाहीये. करू तरी काय याचं?’ फटाके फुटत जावे तसे प्रश्नामागून प्रश्न वसुला सतावत होते. साडेअकरा वाजायला आले होते. म्हणजे एक तास उशीर झाला होता. “लेट लतीफ आला रे”. जोगळेकर ओरडला. सगळ्यांची डोकी वसुकडे वळून पाहू लागली. “अरे एक नाही दोन लेट लतीफ दिसताहेत.” कुणीतरी म्हणालं आणि सगळेजण हसू लागले. दुरून मीनाक्षी खुणेनेच वसुला ‘हे काय?’ म्हणून विचारत होती. मीनाक्षीचे टेबल पार शेवटच्या कोपर्यात होते. तिच्याजवळच वसुधाचे टेबल होते. विठ्ठलचा पत्ताच नव्हता. बहुधा तो मॅडमच्या केबिनमध्ये असावा. वसुधा जोगळेकरच्या टेबलाशी येऊन पोचली. तिने कुत्र्याला टेबलवर ठेवले.
“अहो काय हे वसुधा मॅडम?”
“हे, हे माझं नाहीये. नंतर सांगते मी सगळं. सध्या तुमच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये लपवता का याला प्लीज? माझ्या टेबलला ड्रॉवर नाहिये हो. नाहीतर…”
“अहो पण मी काय सांगू मॅडम आल्यावर?”
“म्हणजे अजून मॅडम आलेल्या नाहीत?” तरीच वसुधाच्या भोवती आता घोळकाच जमला होता.
“हाऊ क्युट! पण ऑफिसला कशाला आणायचं?”
“बेबीसिटर मिळाली नसेल. पण क्रेश असतात नं कुत्र्यांचेही?” प्रश्नांच्या अक्षदा पडतच होत्या पण अजून मॅडम यायच्याच आहेत हे कळल्यामुळे वसुच्या काळजीचे ताणलेले रबर एकदम सैलावले होते. तरीही जोगळेकरांच्या परवागनीशिवायच तिने त्यांच्या टेबलावरील पाण्याचा ग्लास घटाघटा संपवला. तेव्हा कुठे तिला जरा बरे वाटले.
‘आला विठ्ठल आला, म्हणजे मॅडम येत असणार’ कुणीतरी म्हणताच सर्वजण आपापल्या एनक्लेव्हज्मध्ये बंदिस्त झाले. वसुधाने धावत जाऊन विठ्ठलला भराभर सूचना केल्या. त्याच्या हातातील मॅडमचा पी.सी. घेऊन ती मॅडमच्या केबिनमध्ये शिरली. विठ्ठल पिल्लाला कडेवर घेऊन पँट्रीकडे वळला. वसु केबिनबाहेर येऊन स्वतःच्या जागेकडे जात असतानाच. शाळेतील प्रार्थनेप्रमाणे ‘गुडमॉर्निंग मॅडम’चा एकसुरी गजर झाला. मॅडमनी प्रत्युत्तर म्हणून फक्त हात हलविला. कारण आज त्या मोबाईल कानाशी धरून पारशी मिश्रित इंग्रजीत कुणाशी तरी संभाषण करीत होत्या. वसुला वाटले आज मॅडमचे काहीतरी बिनसले असावे. कारण आज त्यांचे नेहमीसारखे परफेक्ट मॅचिंग नव्हते. बिस्किट कलरच्या स्कर्ट ब्लाऊजवरचे जॅकेट विसंगत रंगातील होते. शूज मॅचिंग होते परंतु पर्स ब्राऊन न घेता काळी का बरे होती? पांढर्या झालरीच्या कॉलरमधून मॅडमची मान मात्र नेहमीसारखीच एखाद्या कळीच्या देठासारखी मोहक गुलाबी होती. गोर्यापान चेहर्याला लालचुटूक लिपस्टिक शोभत होती. भुवया मात्र काळजीने झाकोळलेल्या वाटत होत्या. कळीला तुरमण असावे तसा मॅडमचा हेअरडू वाटत होता. कळी केबिनमध्ये अदृश्य झाली तशा एन्क्लेव्हज्मधील झुकलेल्या माना वर झाल्या. सगळ्यांचीच नजर जणू वसुधाला विचारत होती, पुढे काय?
“प्रॉमिस! मी बघते त्या लतीफचं काय करायचं ते- डोन्ट यू वरी पपा. नेव्हर माइंड पपा! हूं छू ना. आय विल् सी टू इट!” मॅडमचे मोबाइलवरचे हे संभाषण सगळ्यांच्याच कानी पडले होते. मॅडमचे नेमके काय बिनसले असावे सकाळी, सकाळी? नेमके कसले प्रॉमिस देत होत्या त्या फोनवर? आता मॅडमची कॉफी घेऊन गणेश केबिनमध्ये जाईल तेव्हा कदाचित त्याच्याकरवी सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे मिळतील. गणेश हा विठ्ठलच्या हाताशी काम करीत असे. विठ्ठल हा जुना जाणता शिपाई सर्वांना सांभाळून घेत असे. गणेश मात्र अल्लड वयामुळे एखाद्या लेट लतीफचे नाव पटकन मॅडमना सांगून टाके. गणेशने काही गोंधळ घालू नये म्हणून मीनाक्षीच्या प्रश्नांची उत्तरे न देताच टेबलवर पर्स ठेऊन वसुधा पँट्रीकडे वळली.
विठ्ठल गणेशच्या हाती ट्रे सोपवीत होता. त्याने डोळ्याच्या खुणेनेच झाडूच्या कपाटात पपी लपविल्याचे वसुला सांगितले. गणेश ट्रे घेऊन केबिनकडे जाऊ लागला. वसुने झाडूच्या कपाटाचे दार किलकिले करून बघितले. पिल्लू मस्त झोपले होते. बिच्चारे! इवलुशा पायांनी बरेच श्रम घेतले होते. “गणेशनी पाह्यलं नाही नं ह्याला?”
“नाही हो वसु मॅडम . गणेश यायच्या आधीच मी बशीतून दूध पण पाजलं बघा त्याला. काय घाबरू नका. तशीच वेळ आली तर…” विठ्ठलचे वाक्य पूर्ण होण्याआधीच ‘बॉस मॅडम’ (विठ्ठलच्या शब्दात) पँट्रीत शिरल्या. वसुने पायानेच झाडूच्या कपाटाचे दार लोटले व कॉफी मशीनकडे वळून, थरथरत्या हाताने कप भरून तोंडाला लावला. घशाला गरम कॉफीचा चटका बसत होता. झाडूच्या कपाटाला पाठ टेकवून वसु उभी होती, परंतु आज तिचे नशीब बलवत्तर असावे. मॅडम अजूनही मोबाइलवरच बोलत होत्या. “विठ्ठल ड्रायव्हरबरोबर जरा घरी जाऊन ये. पपा लईच अपसेट झालाय्. सकाळपासून ते लतीफ गायब झालाय्. रोज माझ्या संगती गेटपर्यंत येते. आज लतीफ, लतीफ हाका मारल्या तरी आला नाय. घरात पण नाय. तू जरा बघून ये मगसून मी पुलिसला फोन करेल.” वसुधाच्या हातातील कप हिंदकळून कॉफी सांडली. तिच्या मागच्या कपाटाच्या दाराला ढुशी देऊन पिल्लू बाहेर आले.
“ओ माय डिअर लतीफ! हाऊ कम यू आर हिअर?”
“ओ माय स्वीट लतीफ् तिकडे पपा अपसेट झालाय.”
“हेला कोणी ठेवला कपबर्डमध्ये?” पिल्लूला मॅडमनी उचलून कडेवर घेतले होते. पपीची गुलाबी जीभ मॅडमचा गुलाबी
चेहरा चक्क चाटत होती. वसु कॉफी पिण्याचे नाटक करत उभीच होती.
“सांगा न वसु मॅडम, तुम्हाला पिल्लू कसा गावला ते?”
रस्ता क्रॉस करताना पिल्लू कसे थोडक्यात वाचले इथपासून सुरू झालेली सगळी कथा वसुधाने मॅडमना भरभर सांगितली. मॅडम परत परत तिला ‘थँक यू’ म्हणत होत्या. कारण हा
पपी त्यांच्या पपांचा हरवलेला लतीफच होता. “केटला परेशान झाला होता पपा. विठ्ठल हेला घरी घेऊन जा. मी फोन करते पपाला”
“डोन्ट यू वरी पपा-लतीफ् माझ्या संगतीच आहे. माइंड युवर बी.पी. प्लीज पपा.” मॅडमनी पपांना शांत केले असावे. फोनवरच त्यांनी शोफरला विठ्ठल व लतीफला घरी घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या. कथेचा नायक विठ्ठलने बशीत दिलेले दूध लप्लप् पिण्यात दंग होता. मॅडम वसुधाशी चक्क शेक हॅन्ड करीत होत्या. नेहमीच्या रागीट चेहर्यावर जणू गुलाब फुलले होते. वसुने घाबरत अखेर विचारले “मॅडम, इफ यू डोन्ट माइंड हाऊ कम तुम्ही डॉगीला लतीफ म्हणता.”
“ओ तुम्ही उशिरा येणार्याला लेट लतीफ म्हणते न? आय लाइक्ड द साउंड ऑफ इट म्हणूनशान मी पपाच्या डॉगीचं नाव लतीफ् ठेवलं.”
“थँक यू माय डिअर अगेन.” वडिलांच्या काळजीने व्यस्त झालेल्या मॅडमचा थोड्या वेळापूर्वीचा चेहरा आठवून वसु चकित होत केबिनमध्ये शिरणार्या पाठमोर्या मॅडमकडे बघत उभीच राहिली.
रविवारी वर्सोवा बीचवर राधाला खडूस बॉसची आजची प्रेमळ कथा सांगायचीच, या विचारात वसु स्वतःच्या टेबलकडे वळली. घड्याळाचा काटा बाराच्या पुढे सरकत चाललेला पाहून एक लतीफ खुर्चीत बसून कामाला लागला, दुसरा लतीफ मात्र मस्त ए.सी. कारमध्ये विठ्ठलच्या मांडीवर बसून घराकडे परतत होता.