रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पदुकोण देखील असणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. दीपिका 'सिंघम अगेन'चा एक भाग आहे. स्वतः रोहित शेट्टीने अभिनेत्रीची स्वागत करणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दीपिका अतिशय धोकादायक स्टाइलमध्ये पोलिसांचा गणवेश परिधान करुन पोझ देताना दिसते.
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, रोहित शेट्टी आणि दिपिकाने चाहत्यांना त्यांच्या आगामी सिनेमातील महिला पोलिस ऑफिसरची ओळख करून दिली. रोहित शेट्टीने चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करून दीपिका पदुकोणचे पोलीस विश्वात स्वागत केले आहे. तर दीपिकानेही सिनेमात तिचे नाव काय असेल याची पोस्ट शेअर केली आहे. पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण एका गुन्हेगाराच्या तोंडावर बंदूक पकडून आहे. अभिनेत्रीचे गुढ हसणे प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी पुरेसे आहे.
'सिंघम अगेन'चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करून रोहित शेट्टीने दीपिका पदुकोणचे मोकळ्या मनाने स्वागत केले आहे. रोहित शेट्टीने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, 'स्त्री ही सीतेचे तसेच दुर्गेचे रूप आहे. आमच्या पोलीस विश्वातील सर्वात क्रूर आणि हिंसक अधिकाऱ्याला भेटा. शक्ती शेट्टी, मेरी लेडी सिंघम, दीपिका पदुकोण. दीपिका पदुकोणच्या फर्स्ट लूक पोस्टरने रिलीज होताच इंटरनेटवर तुफान गोंधळ माजवला आहे. तसंच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते अधिक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.
'सिंघम अगेन'ची स्टारकास्ट रिलीज
रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात अजय देवगण बाजीराव सिंघम या प्रामाणिक पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी करीना सिंघमच्या पत्नीची भूमिका पुन्हा साकारणार आहे. याशिवाय रणवीर सिंग आणि अक्षय कुमारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.