Close

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने केली चित्रपटाची घोषणा : UT69 मधून करणार अभिनयात पदार्पण (Raj Kundra Announced His Bollywood Debut Film Ut-69)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होता. राज हा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन राज कुंद्रानं त्याच्या UT 69 या चित्रपटाची घोषणा केली आहे. राजनं हा व्हिडीओ शेअर करुन UT 69 या चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील माहिती दिली आहे.

राज कुंद्रानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो मास्क घालून एका पत्रकार परिषदेमध्ये बसला असल्याचे दिसत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये फराह खान (Farah Khan) आणि मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हे देखील दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसते की एक व्यक्ती फराहला प्रश्न विचारतो, 'मॅम, तुम्ही हा चित्रपट का बनवला आहे?' यावर मुनव्वर 'पैसे के लिए" असं म्हणतो. त्यानंतर फराह चिडते आणि म्हणते की, "मी हा चित्रपट बनवलेला नाही."

व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती फराह आणि मुनव्वर यांना प्रश्न विचारतो की, "हा चित्रपट कोणी बनवला आहे?" त्यानंतर फराह आणि  मुनव्वर हे दोघेही राजकडे बोट दाखवतात. त्यानंतर एक व्यक्ती प्रश्न विचारतो, 'या चित्रपटामध्ये कोणता अभिनेता काम करणार?' त्यानंतर पुन्हा फराह आणि  मुनव्वर हे दोघेही राजकडे बोट दाखवतात.  त्यानंतर राज चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती देतो.

राज कुंद्रानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे, " थँक्यु फराह आणि मुनव्वर. ‘इनसाइड’ स्टोरीची वेळ आली आहे! UT69 हा 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे." राज कुंद्रानं शेअर केलेल्या व्हिडीओच्या शेवटी 'सत्य घटनेवर आधारित' असं लिहिलेलं दिसत आहे. UT 69 या चित्रपटात राज कुंद्रासोबत आणखी कोणते कलाकार काम करणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Share this article