१९ सप्टेंबर २०२२ला सुरू झालेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दार उघड बये’ ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मुक्ता आणि सारंगच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात ‘दार उघड बये’ मालिका ऑफ एअर होणार आहे.
‘दार उघड बये’ मालिकेत मुक्ता ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं मालिकेच्या शूटच्या शेवटच्या दिवसाचे काही खास क्षण दाखवले आहेत. ज्यामध्ये सर्व कलाकार मंडळी शेवटचा दिवस असला तरी तितक्याच जोमाने कामाबरोबर मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत सानियाने लिहीलं आहे की, “प्रेम, हास्य अन् अविस्मरणीय आठवणींनी भरलेलं वर्ष. या मालिकेसाठी आणि ऑफस्क्रीन कुटुंबासाठी अत्यंत कृतज्ञ आहे. आमच्या शूटच्या शेवटच्या दिवसातील काही क्षण.…. ‘दार उघड बये’ पाहत राहा दुपारी २ वाजता”
आतापर्यंत ‘दार उघड बये’ या मालिकेचे ३०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. ७ ऑक्टोबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेत सानिया व्यतिरिक्त रोशन विचारे, शरद पोंक्षे, किशोरी अंबिये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
दरम्यान, या मालिकेतील रोशन विचारे आता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सोनी मराठी’वरील नवी मालिका ‘खरंच तिचं काय चुकलं?’ यामध्ये रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री दळवी देखील पाहायला मिळणार आहे.