निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मुंबई डायरीज्’ या मालिकेचा दुसरा सीझन येत्या ६ ऑक्टोबरला प्राईम व्हिडिओ वर प्रक्षेपित होईल. हा प्रिमियर असेल. गुंतवून ठेवणाऱ्या आठ भागांच्या या मालिकेत कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे व प्रकाश बेलवडी यांच्या भूमिका आहेत.
या वैद्यकीय थरार नाट्यात दहशतवादी हल्ल्यानंतर पडसाद झेलणारे बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी, डॉक्टर, प्रशिक्षणार्थी वैयक्तिक संघर्षाला सामोरा जातात. त्यातच मुंबईच्या पुराचा विध्वंस उद्भवतो. या सगळ्या विचित्र पार्श्वभूमीवर जगण्याची झुंज असलेले ताकदीचे कथानक आहे. या आधी मुंबई डायरीज्च्या सीझनमधील २६/११चे कथानक मांडण्यात आले होते.
‘‘मुंबई डायरीज्’ हे वैद्यकीय नाट्य गहन आहे. आपले फ्रंटलाईन कर्मचारी आणि मेडिकल विश्वातील हिरो ज्या अनुभव आणि संघर्षातून गेले, त्याचा परामर्श या मालिकेत घेतला आहे.” असे निखिल अडवाणी यांनी सांगितले. या मालिकेची निर्मिती एम्मे एंटरटेनमेन्टच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजानी यांनी केली आहे.