बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात 'आत्मपॅम्फ्लेट'चा वर्ल्ड प्रीमिअर झाला तर आशिया पॅसिफिक स्क्रिन अवॉर्ड्स आस्ट्रेलियामध्ये सत्तर देशांतील चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आहे.
अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले असून परेश मोकाशी यांनी 'आत्मपॅम्फ्लेट'चे लेखन केले आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा संपूर्ण चित्रपट परेश मोकाशी कथन करत आहेत. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. डार्क कॉमेडी असणाऱ्या या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या प्रयोगाबद्दल आणि चित्रपटाबद्दल लेखक परेश मोकाशी म्हणतात, ''आमचे मित्र आशिष बेंडे यांचे शालेय जीवन खूपच नाट्यमय होते! अगदी बायोपिक करावा असे! मात्र, खरोखरीच त्याचा चित्रपट करताना वास्तव चित्रणाबरोबर विचित्र निवेदन आणि अतिशयोक्ती विनोदाची फोडणी दिली आहे. म्हणूनच ही नेहमीची शालेय प्रेमाची गोष्ट राहात नाही. तर त्यापलीकडे जाऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरची मोठी घटना होते! पुढे तर ती त्याही पलीकडे जाते. अशी खमंग फोडणी झी स्टुडिओजला नेहमीच आवडत आली आहे! आपणही मिटक्या माराल अशी आशा आहे.''
गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय, कनुप्रिया ए. अय्यर मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत.