दिल चाहता है, चक दे इंडिया, मर्दानी यांसारखे चित्रपट आणि 'मेड इन हेवन' या वेबसीरिजमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणारे प्रसिद्ध अभिनेता रियो कपाडिया यांचे निधन झाले आहे. काल गुरूवार, १४ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध वेबसीरिज ‘मेड इन हेवन’ मध्ये महत्वाची भूमिका निभावणारे, प्रसिद्ध अभिनेते रियो कपाडिया (Rio kapadia) यांचं निधन झालं आहे. एका गंभीर आजाराशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर अखेर काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर (bollywood) शोककळा पसरली आहे. आज मुंबईतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
‘मेड इन हेवन’ वेबसीरिजमध्ये त्यांनी मृणाल ठाकूरच्या वडिलांची भूमिका निभावली होती. आपल्या लेकीला होणाऱ्या त्रासानंतर तिच्यापाठी खंबीरपणे उभे राहणारे, तिच्या प्रत्येक निर्णयात साथ देणारे एक प्रेमळ वडील त्यांनी यामध्ये रंगवले होते. त्यांच्या या भूमिकेचे बरेच कौतुकही झाले. तर त्यापूर्वीही रियो कपाडिया यांनी विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आमिर खान, शाहरूख खान, अभिषेक बच्चन तसेच राणी मुखर्जी या कलाकांरासोबतही त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. महाभारत या प्रसिद्ध मालिकेतील त्यांची पांडू ही व्यक्तिरेखा अविस्मरणीय ठरली होती. ‘हॅपी न्यू ईअर’, मर्दानी’, ‘प्रधानमंत्री’, ‘हम हैं राही कार के’, ‘श्री’, ‘एक अनहोनी’, ‘मुंबई मेरी जान’ तसेच’दिल चाहता है’ याशिवाय’चक दे इंडिया’ चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूडला धक्का बसला आहे. रियो यांचे मित्र फैजल मलिक यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.