टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी पाळणा हलला आहे. त्यांची पत्नी संजना गणेशनने आज म्हणजेच सोमवारी सकाळी मुलाला जन्म दिला आहे. याच कारणामुळे बुमराहने आशिया कप-2023 क्रिकेट स्पर्धा मध्येच सोडली आणि श्रीलंकेतून मायदेशी परतला होता.
बुमराहने सोमवारी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. त्याने लिहिले, 'आमचे छोटे कुटुंब आता वाढले आहे. आमची अंतःकरणे आम्ही केलेल्या कल्पनेपेक्षा भरलेली आहेत. आज सकाळी आम्ही आमच्या मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले, आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय जे काही घेऊन येईल त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. जसप्रीत आणि संजनाच्या मुलाचे नाव अंगद आहे. बुमराहने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली. बुमराह नुकताच मैदानात परतला होता. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने टीम इंडियाची कमान सांभाळली होती. त्यानंतर तो आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेला रवाना झाला. बुमराहने रविवारी अचानक कोलंबोहून मुंबईला जाणारे फ्लाइट पकडले. त्यासाठी त्याने वैयक्तिक कारणे सांगितली. आता सर्व काही चाहत्यांना स्पष्ट झाले आहे.