सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती मध्ये हॉट सीटवर येणाऱ्या स्पर्धकांची कहाणी नेहमीच मोठी प्रेरणादायक असते. ती त्यांच्या संघर्षाची, आकांक्षांची आणि स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या परिश्रमाची कहाणी असते. प्रेक्षकांना हे स्पर्धक भारताचे अस्सल प्रतिनिधी वाटतात. या शो ने आपल्या १५ व्या सत्रात समस्त देशात वाहत असलेल्या ‘बदलावा’च्या लहरीचे स्वागत केले आहे. यांचे प्रतिबिंब हॉटसीट वर बसणाऱ्या स्पर्धकांमध्ये देखील दिसते आहे. ज्ञानाच्या शक्तीने आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आशा उराशी घेऊन हे स्पर्धक येत आहेत.
हॉटसीट वर पोहोचलेल्या, पुण्याच्या आनंद राजू कुरापती या तरुणाची मासिक मिळकत केवळ 8-10 हजार रु. आहे, पण कौन बनेगा करोडपती मध्ये त्याने साडे बारा लाख रु. जिंकले. आपल्या ज्ञानाच्या बळावर शिकून स्वतःला सुसज्ज करण्याच्या त्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळेच हे शक्य होऊ शकले. अत्यंत समर्पित आणि कर्तव्यदक्ष मुलगा म्हणून आपल्या वडिलांचा पॅरलिसिस बरा करण्याचे आणि आपल्या कुटुंबाला गरीबीमधून बाहेर काढण्याचे आनंदचे पहिल्यापासूनचे स्वप्न होते. सिम्बायोसिस पुणे येथे शिकत असलेल्या आनंदला पुढे UPSC इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस / इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (UPSC IES / ISS) परीक्षा देऊन विविध सर्वेक्षणांमध्ये विशेष प्राविण्य मिळवून इंडियन स्टॅटिस्टिकल ऑफिसर बनण्याची इच्छा आहे.
आनंदच्या बालपणीच्या हलाखीचे वर्णन ऐकून होस्ट अमिताभ बच्चन हेलावून गेले. आर्थिक टंचाईमुळे आनंदला लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली, शिवाय वडिलांची प्रकृती देखील ढासळत चालली होती. त्याची आई कुटुंबाच्या निर्वाहासाठी बिडी वळण्याचे काम करत असे. आनंदने शिवणकाम करून एका पॅन्टसाठी 8 रु. याप्रमाणे कमवून उदरनिर्वाह केला. आकर्षक खेळ खेळल्यानंतर आनंद जेव्हा हॉटसीट सोडून गेला, तेव्हा तो केवळ साडे बारा लाख रु. जिंकला नाही, तर आयुष्यातला पहिला चेक (3.20 लाख रु.) स्वतःसोबत घरी घेऊन गेला.
KBC मध्ये सहभागी होण्याबद्दल आणि चांगले यश मिळवण्याबद्दल आनंद म्हणतो, “माझ्या कुटुंबाला असा आनंद मिळाला आहे, जो त्याने आजवर कधीच अनुभवला नव्हता. कष्ट तर नेहमीच आमचे सोबती होते. बक्षिसाच्या रकमेचा मला माझ्या कुटुंबाला हातभार लावण्यास आणि माझ्या शिक्षणासाठी उपयोग होईल. माझी क्षमता दाखवण्याची ही संधी मला दिल्याबद्दल मी KBC चा ऋणी आहे. श्री. बच्चन यांनी दाखवलेला दयाळूपणा आणि सहानुभूती माझ्यासाठी अनमोल आहेत. माझ्या माणसांना माझा अभिमान वाटावा अशी कामगिरी माझ्या हातून घडावी हीच माझी इच्छा आहे.