‘तिरसाट’ हा प्रेमाचा नवा हळवा प्रवास आहे, ज्या प्रवासात प्रेक्षकरूपी प्रत्येक प्रवासी ‘४ सप्टेंबर २०२३’ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर भावनिक पदयात्रा करणार आहे. तिरसाटच्या निमित्ताने सुरु झालेला प्रेम मिळवण्यासाठीचा हा प्रवास दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी या चित्रपटात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून ‘नीरज सूर्यकांत’ आणि ‘तेजस्विनी शिर्के’ ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटामधील पी. शंकरन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाचा जीव असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. दिनेश किरवे यांच्या ‘क्लास वन फिल्म्स’ने ‘तिरसाट’ या चित्रपटाची निर्मिती केली असून अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहिल्यांदाच वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.
बाळ्याचं खरं प्रेम समीने नाकारल्यानंतर, ‘समीशिवाय आपले जीवन नाही’ असे वाटल्याने बाळू आपले जीवन संपवण्याचे पाऊल उचलतो परंतु बाळूचे वडील हे कृत्य थांबवण्यासाठी धावतात आणि त्याला जीवन आणि प्रेमाचे सार समजावून सांगतात. जीवनात एक यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठी तो एक उद्योजक बनतो आणि स्वतःला सिद्ध करून आपल्या आयुष्याला एक नवे वळण देतो. ‘तिरसाट’ हा चित्रपट खूपच भावनिक असून या चित्रपटातील कथानक, पात्र आणि गाणी प्रेक्षकांना नक्कीच भावतील अशीच आहेत.