Close

झाले मोकळे आकाश (Short Story: Zale Mokale Akash)

  • मोहना मार्डीकर
  • स्वरांच्या भोवर्‍यात शब्दांचा भुंगा भिरभिरू लागला, तेव्हा कुणीतरी साद घालतं आहे असा भास व्हायला लागला. कथाकथनासाठी ओठ स्फुरू लागले. कशाची ही परिणती? मला जाणीव झाली की जिला ‘स्पेस’ म्हणतात ती मला सापडली होती. माझं आकाश मला मोकळं झालं होतं.

महिला मंडळाचा हॉल गच्च भरला होता. वासंतिक उत्सवानिमित्त चैत्राचं हळदीकुंकू आणि त्यापूर्वी एक कथाकथन स्पर्धा आयोजित केली होती. सेक्रेटरीची सर्वाधिक लगबग सुरू होती. तिने प्रत्येकीकडे एकेक काम सोपवून दिलं होतं. हळदीकुंकू, अत्तर, गुलाबपाणी एका तबकात ठेवलं होतं. कथाकथन स्पर्धेचा बक्षीस समारंभ झाल्यावर हळदीकुंकू आणि आंब्याची डाळ व पन्हं द्यायचं असं ठरलं होतं. स्पर्धेच्या परीक्षक दोन नामांकित कथा लेखिका होत्या. अध्यक्षीण बाईंच्या हस्तेच बक्षीस समारंभ करायचं ठरलं होतं, पण त्यांचाच अजून पत्ता नव्हता. बायकांची हलकी हलकी कुजबुज सुरू असताना एकदम कुणीतरी मोठ्याने म्हटलं, “आल्या एकदाच्या गाडगीळबाई. चहा, आता तरी कार्यक्रम सुरू होईल.” हॉलबाहेर दारापाशीच गाडगीळबाई दिसल्या आणि सेक्रेटरी निशा जोशीचा जीव भांड्यात पडला. गाडगीळबाई हुश्श करत स्टेजवर येऊन बसल्या. त्यांची नजर स्टेजच्या डाव्या बाजूला बसलेल्या स्पर्धक स्त्रियांकडे गेली आणि पहिल्या रांगेत शेवटच्या खुर्चीवर बसलेल्या
एका भगिनीने त्यांचं लक्ष वेधलं. अरे ही तर अवंतिका! एकेकाळची आपली जिवलग मैत्रीण!
बक्षीस समारंभ संपल्यावर त्यांनी अवंतिकेला थांबवून घेतलं आणि ‘आपण दोघी बरोबरच जाऊ’, असं म्हणून तिला आपल्यासोबत गाडीत घेतलं. खूप वर्षांनी भेट झाल्यामुळे अवंतिकानेही जास्त आढेवेढे घेतले नाहीत. कथाकथन
स्पर्धेत पहिला नंबर आल्यामुळे अवंतिका खुशीत होती. गार्गी गाडगीळ आता मोठ्ठी लेखिका झाल्याचं तिला माहीत होतं. तिच्या कथा, कादंबर्‍या ती वाचत असे. अधूनमधून वृत्तपत्रातून तिचं नाव झळकलं की तिच्या जुन्या आठवणी जागृत व्हायच्या. “तुला वेळ असेल तर चल ना माझ्याकडे”, असं गार्गीने म्हणताच अवंतिका कबूल झाली. घराचे विचार तिने बाजूला सारले.
घरी येताच गार्गीने पंखा लावला, पाण्याचे दोन ग्लास भरून आणले आणि दोघी हॉलमध्ये सोफ्यावर ऐसपैस बसल्या. गार्गीने आधी अवंतिकाचं अभिनंदन केलं आणि मग म्हणाली, “अवंतिका, लग्नाआधी अबोल, लाजाळूचं पान असलेली तू इतकी बदलशील असं कधी वाटलं नव्हतं. आपले दोघींचेही मराठी साहित्य, संस्कृत, तत्त्वज्ञान हेच विषय असल्यामुळे तुझी साहित्याची, वाचनाची आवड तर माहीत होतीच, पण कधी काळी पुढे तू लेखिकाही होशील आणि कथाकथन करशील असं मात्र वाटलं नव्हतं. अगदी छुपा रुस्तम निघालीस हं!”
“गार्गी, मला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं की, मी कधी कथा, कादंबर्‍या लिहीन. तुला आठवतं, आपण कॉलेजमध्ये फ्री पिरियडमध्ये गप्पा मारीत बसायचो… तेव्हा मी पाहिलेल्या सिनेमाची कथा किंवा एखादी घटना तुम्हाला सांगायचे, तर तू म्हणायचीस की, मला कथा चांगल्या रंगवून सांगता येतात. आठवतं ना? पुढे बी.ए. झाल्यावर माझं लग्न झालं आणि आपण सगळ्या पांगलो. तू मात्र मराठीत एम.ए. झालीस, सुवर्णपदक मिळवलंस. पुढे पी.एच.डी. केलंस आणि विद्यापीठात लेक्चरर म्हणून रुजू झालीस. इथपर्यंत मला तुझी वार्ता कळली होती. पण पुढे एकदम तुझे कथा, कादंबर्‍यांचे लिखाण वाचून मला तू मोठ्ठी लेखिका झाली आहेस एवढंच कळलं. आता सांग, तू कशी आहेस? तुझा संसार तर सुखात चालला आहे, हे दिसतंच आहे” अवंतिका बोलायची थांबली.
“अवंतिका, अगं माझं सगळं आयुष्य सरळ आहे. त्यात फारसे चढउतार नाहीत. साहित्याची मला खूप आवड होती, हे तर तुला माहीतच आहे. कॉलेजमध्ये एम.ए.ला असताना मी एका कथा स्पर्धेत भाग घेतला होता. वाचनाची आवड खूप नि त्यात अभ्यासाने भाषेवर संस्कार झाले होतेच, तिला वळण पडलं. त्यामुळे कथा स्पर्धेत मी पहिली आल्यावर मी कथा, कादंबरी या तंत्र-मंत्राचा अभ्यास केला, त्यावरची पुस्तकं वाचली. पी.एच.डी., नोकरी याबरोबरच लिखाणही सुरू ठेवलं. लग्नानंतर मला माझे यजमान आणि सासरच्या सर्व मंडळींनी अतिशय प्रोत्साहन दिलं. त्यामुळे नोकरी आणि संसार सांभाळूनही लिखाण करू शकले. आज माझी पन्नासच्या जवळपास पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. माझ्या नशिबाइतकेच सर्व मोठ्यांचे आशीर्वाद आणि पाठिंबा यामुळेच हे शक्य झालं, दुसरं काय! पण तुझं सांग. तुझ्यामध्ये खूपच अनपेक्षित बदल झाला आहे, हे नक्की.” गार्गी म्हणाली.
“गार्गी, माणसाला अनुभवानेच शहाणपण येतं. खावं, प्यावं, वाचावं, फिरावं, टी.व्ही. पाहावा आणि सुखाने संसार करावा, अशी माझी विचारसरणी होती. म्हणून मी खूप शिकायचं, अभ्यास करायचा, परीक्षा द्यायच्या किंवा नोकरी करायची या गोष्टींचा कधी विचारच केला नाही. आईबाबांनी आणलेल्या चांगल्या स्थळाला स्वीकारीत लग्न करून संसारात पडले.” अवंतिका सांगत होती.
“अगं, मग त्याने काय बिघडलं? तुझ्या संसारात तू सुखी आहेस ना?” गार्गीने तिला मध्येच टोकलं.
“सुखी आहे गं. चांगला समजूतदार नवरा आहे, दोन हुशार मुलं आहेत. पण एक काळ स्त्रीचा असा येतो की, तिची अस्मिता जागृत होते. दैनंदिन जीवनाला चक्रासारखं फिरत राहायचा तिला कंटाळा येतो. आपलं स्वतःचं एक स्वतंत्र विश्‍व असावं, त्या विश्‍वात आपण देहभान विसरून हरवून जावं आणि एक आगळा निखळ आनंद मिळावा, असं तिला वाटू लागतं. सोमवार ते शनिवार, आठवडाभर नवरा आणि मुलं ऑफिसला जातात. मुलं आता मोठी झाली आहेत. त्यांना इंजिनिअर झाल्यावर लगेच चांगल्या नोकर्‍या मिळाल्या. सर्वांचे डबे करणं, येणार्‍या जाणार्‍यांची उस्तवारी करणं, नोकराचाकरांकडून कामं करून घेणं, त्यांच्या व मुलांच्या वेळा सांभाळणं… या सर्वांनी जीव अगदी मेटाकुटीला यायचा. सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत किंवा उशिरापर्यंत या सर्वांची कामं वीज-फोनची बिलं, बँका, भाजी, किराणा… अगदी बाहेरची सगळी कामं. त्यात कॉम्प्युटरपासून दूर म्हणून तेही जमत नाही. आपण धड ना नवीन पिढीच्या ना धड जुन्या पिढीच्या. पूर्वीच्या काळी स्त्रियांचं विश्‍व म्हणजे फक्त संसार एके संसार… चूल नि मूल. त्यात त्या सुखी असायच्या. पण शिक्षणामुळे आपलं वैचारिक विश्‍व जास्त बदललं आहे. प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहे, याची आपल्याला जाणीव होते. मुलं, नवरा सगळ्यांनी आपल्या आयुष्याची वर्तुळं आखून घेतली आहेत. आपणच फक्त भिंगरीसारखं भिरभिरतो आहोत, या जाणिवेने मी अस्वस्थ झाले. मला वाटतं, ही वेळ आपल्या वयाच्या माझ्यासारख्या गृहिणींना नेहमीच येत असावी. यांची दौर्‍याची नोकरी असल्यामुळे माझा रविवार तर, फार एकटेपणाच्या गर्तेत ढकलतो. मुलं आपापल्या मित्रमंडळींत रमतात, मी मात्र कंटाळून जाते. ‘मॅन इज अ सोशल अ‍ॅनिमल’ असं म्हटलं जातं, ते काही खोटं नाही. मग मीही माझी कंपनी शोधायला काय हरकत आहे, या विचाराने संध्याकाळी जरा फ्रेश होऊन जवळच्या पार्कमध्ये गेले. बागेतली मोठी झाडं वार्‍याने डोलत होती. छोटी फुलझाडं बहरलेली होती. हवा छान असल्यामुळे मन प्रसन्न झालं. लहान मुलं झुले आणि घसरगुंडीवर खेळताना पाहून मन आनंदाने भरून गेलं. एक मोकळा बाक पाहून तिथे बसले, तर एका मैत्रिणीने हाक मारली. तिच्याबरोबर आणखी तिघी-चौघीजणी होत्या. त्या सगळ्यांशी तिने ओळख करून दिली. त्यांनी आपला एक साहित्यिक ग्रुप बनवला होता. संध्याकाळी रोज त्या पार्कांत जमायच्या आणि आपण काय वाचलं, काय आवडलं, काय लिहिलं ते रोज एक एक करून सांगायच्या. आपल्या संसारातल्या मानसिक ताणतणावांनाही इथे वाट मोकळी करून दिली जायची. कुणी काही कथा लिहिली असेल, तर ती सांगायची. या उपक्रमात मीही आवडीने सामील झाले. त्यासाठी काहीतरी निवडक नवीन वाचावं, कथा लिहावी याची मला स्फूर्ती यायला लागली आणि अशातूनच माझं कथालेखन आणि कथाकथन बहरायला लागलं. त्याबरोबरच नवीन आचारविचारांची देवाण-घेवाण होऊ लागली. कधी नाटक, कधी सिनेमा, तर कधी एखादी ट्रिप आम्ही काढत असू. सणवार, समारंभ, रेसिपीज या सर्वांचा आनंद आम्ही शेअर करायचो. मी प्रसन्न दिसते हे पाहून घरात यांना आणि मुलांना खूप आश्‍चर्य वाटायचं आणि आनंदही व्हायचा. माझी कामं आटोपून मी लिखाण, वाचन करू लागले. मलाच माझ्यातला हा बदल जाणवत होता. आपली जबाबदारी, कर्तव्य पार पाडूनही आपण काहीतरी,
स्वतःला आनंद देणारी निर्मिती करू शकतो याबद्दलचा आत्मविश्‍वास वाढला आणि निर्मितीची ओढ वाटू लागली.”
अवंतिका रंगून भारावून बोलण्यात रमली होती आणि गार्गी ऐकण्यात दंग होती. तिचा जीवनपट आणि मनाचं हळवं विश्‍व उलगडत होती. तिच्या मनातलं आकाश मोकळं होत होतं. गार्गीला तिची अवस्था कळत होती.
“माझं मन मोरपिसासारखं हलकं होतं आहे, गार्गी” अवंतिका म्हणत होती.
“पूर्वीची सुंदर भावगीतं म्हणणारी मी आता पुन्हा तीच भावगीतं नव्याने गुणगुणू लागले. स्वरांच्या भोवर्‍यात शब्दांचा भुंगा भिरभिरू लागला, तेव्हा कुणीतरी साद घालतं आहे असा भास व्हायला लागला. कथाकथनासाठी ओठ स्फुरू लागले. कशाची ही परिणती? मला जाणीव झाली की जिला ‘स्पेस’ म्हणतात ती मला सापडली होती. माझं आकाश मला मोकळं झालं होतं. माझ्यातल्या ‘संसारी स्त्री’ला, एका गृहिणीला मी संसाराच्या चक्रातून बाहेर काढलं होतं. माझी साहित्याची आवड अशी कथाकथनाला पूरक ठरली आणि मला जीवनातला आनंद सापडला. ‘संसार एके संसार’ न करता स्त्रीला करता येण्याजोग्या बर्‍याच काही गोष्टी असतात, ज्या निर्मितीचा, असोशीचा परीघ मोठा करतात. याला ‘स्पेस’ म्हणत असावेत. आपल्यातल्या अस्मितेची, ‘मी’पणाची जाणीव करून देणारं स्वतंत्र अस्तित्व ही ‘स्पेस’ करून देत असावी.”
गार्गी अवंतिकेकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते, त्या धारेत गार्गीही सामील झाली.

Share this article