Close

‘संगीत ही माझी जीवनरेखा आहे’- ‘आशा ॲट ९० : लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशा भोसले यांची भावना (‘Music Is My Lifeline ‘ – Asha Bhosale Express Her Feelings On The Occassion Of ” Asha@90 Live In Concert Program)

“संगीत ही माझी जीवनरेखा आहे. वयाच्या १० व्या वर्षी मी गायला सुरुवात केली. ८० वर्षे मी गात आहे. माझ्या या कारकिर्दीत ज्यांच्यासोबत मी काम केलं, त्या गीतकार, संगीतकार, गायक यांच्या आठवणी दाटून येत आहेत. चित्रसृष्टीचा मोठा इतिहास मला ज्ञात आहे… मै फिल्मलाईन का आखरी मुगल हूं…” अशा शब्दात श्रेष्ठतम गायिका आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आशाताईंच्या ९०व्या वाढदिवशी, ८ सप्टेंबरला त्यांचे सुपुत्र आनंद भोसले व पीएमई एन्टरटेनमेन्ट या दुबईच्या कंपनीने ‘आशा@90 : लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या संगीत जलशाचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने आशाताई बोलत्या झाल्या.

सदर कंपनीचे संस्थापक सलमान अहमद यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. ते म्हणाले, “हा ब्रॉडवे स्टाईल अडीच-तीन तासांचा कार्यक्रम असेल. त्यासाठी आशाजी एका दशकानंतर दुबईत परत येत आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरेल.”

आशाताईंसोबत सुदेश भोसले गाणार आहेत. त्यांनी आशाताईंची गुणग्राहकता, औदार्य, संवेदनशील स्वभाव याबाबतच्या सुंदर आठवणी सांगितल्या. “याही वयात दिवसभरात त्या कधीही रियाज करतात,” असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी संगीत संयोजक नितीन शंकर, संगीतकार सलीम-सुलेमान, अभिनेत्री पूनम धिल्लन व पद्‌मिनी कोल्हापुरे आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी आशाताईंवर स्तुतीसुमने उधळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे अनमोल करणार आहे.

Share this article