- मीनू त्रिपाठी
आपल्या चिरंजीवाच्या बाबतीत रश्मीला वाटणारी ही काळजी स्वाभाविकच होती. तो पुण्याला एम.बी.ए. करायला गेला होता. पण गेल्या कित्येक दिवसांत त्याचा एकही फोन आला नव्हता. त्याचं सगळं व्यवस्थित चाललं आहे, हेही त्याच्या मित्राने… सुधाकरने सांगितलं, म्हणून कळलं होतं. तरीही आपल्या पोरानं आई-बाबांना इतक्या दिवसांत एकही फोन करू नये, हे योग्य नव्हतंच.
“सध्याच्या पिढीला काय झालंय तेच कळत नाही. किती स्वार्थी आणि आत्मकेंद्री झालीय ही मंडळी. आम्ही नेहमीच पूर्ण कुटुंबाचा विचार केला. पण आत्ताची पिढी फक्त स्वतःपुरतंच बघते”, रश्मी सकाळपासून रागाने धुसफुसत होती. वीरेन्द्र काहीही न बोलता पेपरात डोकं खुपसून बसला होता.
आपल्या चिरंजीवाच्या बाबतीत
रश्मीला वाटणारी ही काळजी स्वाभाविकच होती. तो पुण्याला एम.बी.ए. करायला गेला होता. पण गेल्या कित्येक दिवसांत त्याचा एकही फोन आला नव्हता. त्याचं सगळं व्यवस्थित चाललं आहे, हेही त्याच्या मित्राने… सुधाकरने सांगितलं, म्हणून कळलं होतं. तरीही आपल्या पोरानं आई-बाबांना
इतक्या दिवसांत एकही फोन करू नये, हे योग्य नव्हतंच. एकतर सुधाकर पटकन फोन घेत नाही. काही विचारलं तर इकडच्या तिकडच्या गोष्टी करून फोन बंद करतो. विशेष म्हणजे, जेव्हा जेव्हा या मुलांना फोन केला, तेव्हा रचित बाहेरच असायचा. याला योगायोग म्हणायचा की आणखी काही?… काळजीने रश्मीला रात्ररात्र झोप यायची नाही.
“पुण्यामध्ये एखाद्या मुलीच्या प्रेमात तर पडला नसेल? आपला मुलगा तसा भोळाभाबडाच आहे. खरंच प्रेमाचं लफडं असलं, तर काय करायचं?…” रश्मीच्या प्रश्नांवर वीरेन्द्र तिची समजूत घालायचा.
“रश्मी, तू उगाच काळजी करतेस बघ. असं काही नसेल गं. माझा रचितवर पूर्ण विश्वास आहे. तो अभ्यासात मग्न असेल. म्हणून वेळ मिळत नसेल त्याला. अन् सुधाकरकडून त्याची ख्याली-खुशाली कळतेच ना.”
वीरेन्द्रच्या या उत्तराने रश्मीचं काही समाधान होत नव्हतं. ती विचारात पडली. कारण गेल्याच महिन्यात रचित आला होता, तेव्हा त्याला आपल्या करिअरची काळजी वाटत होती. मात्र अभ्यासात त्याचा उत्साह कायम होता. रश्मीनं आपल्या लाडक्या लेकाची चांगली सरबराई ठेवली होती. त्याचं खाणंपिणं आणि अभ्यासाबाबत ती नेहमीच जागरूक असायची. त्यावरून ती वीरेन्द्रलाही बोल लावायची. घरी येणार्या पै-पाहुण्यांमुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होतो, हे तिला फार खटकायचं. रचित तसा खूप शांत स्वभावाचा मुलगा होता. आईवडिलांशी कधी त्याचे वादविवाद झाले नाहीत. दोन-तीन दिवसांआड तो त्यांना फोन करायचाच. पण आता गेल्या पंचवीस दिवसांत त्याचा एकही फोन आला नव्हता. नक्कीच त्याच्या स्वभावात खरंच खूप बदल झाला होता. त्याच्या वागणुकीतील हा बदल वीरेन्द्रलाही चांगलाच खटकला होता.
“आधी आईबाबा, नंतर सासू-सासरे आणि पुढे मुलांसमोर दबून राहायचं, अशा परिस्थितीत आपली पिढी सापडली आहे नं वीरेन्द्र”, रश्मी कुरकुरत होती.
“सासू-सासर्यांसमोर म्हणजे…?” वाक्य अर्धवट सोडून वीरेन्द्र थोड्या त्राग्यानेच रश्मीकडे पाहत राहिला. जणू त्याच्या मनात कळ आली. रश्मीही आपलं म्हणणं योग्यच असल्याच्या आविर्भावात म्हणाली, “नाही तर काय? होता होईस्तोवर आपण आईबाबांची सेवा केलीच की नाही? आपल्यालाही संसार करायचा होता. रचितच्या बाबतीतही आपलं कर्तव्य होतंच. नाहीतर तो हवं ते मिळवू शकला असता का?”
रश्मीच्या बोलण्याची गाडी भलत्याच वळणावर चाललेली पाहून वीरेन्द्र गप्प बसला. पण त्याच्या मनात आवर्तने उठलीच… रश्मी, तू आईबाबांना कधी आत्मीयता दाखवलीस तरी का? निव्वळ कर्तव्य पार पाडलंस. त्याला सेवा कशी काय म्हणतेस? पण यासाठी एका मर्यादेपर्यंत मीही जबाबदार आहे. घरात कलह नको, म्हणून त्यांना आपण कधीच एकटं सोडून दिलं.
रचितच्या लहानपणी आईबाबा सोबत होते. त्यामुळे रश्मीही निश्चिंत असायची त्याच्या बाबतीत. पण हळूहळू तिचा स्वभाव बदलत गेला. रचित जसजसा मोठा होऊ लागला, तसतशी ती त्याच्या जबाबदार्यांबाबत जरुरीपेक्षाही जास्तच जागरूक झाली. घर जणू अचानक संकोचू लागलं. आईबाबांची घरात अडगळ होऊ लागली. तेव्हा काय ते समजून, आईबाबा गावी निघून गेले. तेव्हापासून, कधीमधी फोन करून त्यांची खबरबात घेत राहिलो… पण आता इतक्या वर्षांनंतर आपल्या मुलाच्या बेजबाबदार वागण्यावरून त्याला बोल लावणार्या रश्मीनं वीरेन्द्रला डिवचलं होतं.
तो तिखटपणे बोलला, “रश्मी, तू समजतेस तेवढी आपली पिढी दयनीय नाही गं. आपणही आपलं स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगलं आहे. आता रचित आपल्या विश्वात दंग झालाय, तर तुला का खटकतंय?”
“तुम्ही पण कमाल करताय हं.
एक आई आपल्या मुलाची काळजी करणार नाही का? चिंता तर वाटणारच ना. जसा रचित करतोय, तशी तुम्ही आपल्या आईबाबांची कधी अवहेलना केली आहे का?…” रश्मीनं त्याला जाणीव करून दिली.
वीरेन्द्र विचार करू लागला… खरंच, आपणही आपल्या आईबाबांची गेल्या दीड-एक महिन्यात विचारपूस केलेली नाही. आधी रश्मीनं पुढे केलेलं रचितच्या अभ्यासाचं निमित्त आणि मग अन्य काही कारणांनी आपल्याला आपल्या वृद्ध आईबाबांचा कधी विसर पडला, ते कळलंच नाही. रश्मीनेही या जबाबदारीतून किती खुबीनं अंग काढून घेतलं होतं.
दीड वर्षांपूर्वी आईबाबा पंधरा दिवसांसाठी इथे आले होते. रचितला त्यांचा खूप लळा… त्यामुळे तो त्यांच्याच सोबत असायचा. या सगळ्याचा त्याच्या अभ्यासावर परिणाम होईल की काय, म्हणून रश्मी कटकट करत होती. आजी-आजोबा आपल्या अनुभवाचे ज्ञानामृत त्याला पाजायचे… तर ते आल्यामुळे रचितचा अभ्यास राहून जातोय, अशी रश्मीची
तक्रार असायची. खरं तर, रचितने अगदी आनंदाने त्यांना आपल्या खोलीत सामावून घेतलं होतं. त्यामुळे आता त्याला भलत्या वेळी झोपही येत नव्हती. त्याच्या खाण्यापिण्याची आजीला जास्त काळजी वाटायची.
ती न चुकता रात्री बदाम भिजत घालून, सकाळी रचितला द्यायची. आजोबा सकाळी स्वतः हाती चहाचा कप घेऊन त्याला उठवायचे. रचित आनंदात होता, पण रश्मी नाराज असायची. दुसरीकडे कुटुंबात सलोखा कायम राहावा, म्हणून वीरेन्द्र काही निर्णय मनाविरुद्ध घेत होता.
पंधरा दिवसांनी आईबाबा परत जायला निघाले, तर रचितने आपली नाराजी बोलून दाखवली होती,
“माझा रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही थांबायला हवं होतं.” त्यावर लगेच रश्मी म्हणाली होती, “अरे, आता तुला वेळ कमी पडेल. चांगल्याशा कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचंय ना. मग आत्तापासून तयारी केली पाहिजे. तुझा हा वेळ फार महत्त्वाचा आहे. अन् मला घरात फक्त अभ्यासाचं वातावरण पाहिजे आहे. कळलं!” आईबाबा ठरल्याप्रमाणे गावी निघून गेले.
रचितला पुण्याच्या चांगल्या
कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळालं. तिथे त्याने सुधाकर नावाच्या मित्रासोबत एक फ्लॅट भाड्याने घेतला. सुरुवातीच्या सहा महिन्यात रचित आपल्या सर्व गोष्टी आईबाबांना सांगायचा. नंतर त्याचं असं फटकून वागणं सुरू झालं. रश्मी-वीरेन्द्रला
ते काही आकळेना. आईबाबांशी
असा दुरावा त्याने का पत्करला?
तो अभ्यासात मग्न असेल, हे वीरेन्द्रचं म्हणणं रश्मीच्या पचनी पडत नव्हतं. दोन क्षण बोलायलाही वेळ मिळत नाही, एवढं काय घडतंय त्याच्या आयुष्यात, हा प्रश्न तिला पडत होता.
नवी पिढी आहे. त्यांच्याकडून काही अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे. त्यानं स्वतःला सांभाळून घ्यावं म्हणजे झालं, अशी काहीशी रश्मीनं स्वतःची समजूत करून घेतली. तशातच एके दिवशी सकाळीच रचितचा फोन आला… वीरेन्द्रने तो घेतला.
“हॅलो पप्पा, आजी आजारी पडलीय. तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. तुम्हाला फुरसत असेल, तर येऊन भेटा तिला. तसे मला कळवा, म्हणजे सुधाकर स्टेशनवर घ्यायला येईल”, असं घाईघाईत बोलून रचितने फोन ठेवला. त्याच्या स्वरातील अर्थ वीरेन्द्रला समजला, पण रश्मीला काहीच समजेना. आईबाबा तर गावाला होते. मग रचित हे काय सांगतोय? तिच्या सांगण्यावरून वीरेन्द्रने आपणहून रचितला फोन लावला. त्याच्या मोबाइलची घंटा बराच वेळ वाजत राहिली. नंतर सुधाकरने फोन उचलला.
“हॅलो ऑण्टी, रचित ठीक आहे. काळजी करू नका.” पुढे तिने खोदून विचारल्यावर सुधाकरने खुलासा केला. “मिडटर्म ब्रेकमध्ये आम्ही तुमच्या गावी गेलो होतो. तिथून परत येताना रचित, आजी-आजोबांना आपल्यासोबत पुण्याला घेऊन आला. गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून ते इथेच आहेत. काल मात्र आजीची तब्येत अचानक बिघडली. म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. तुम्हाला भेटायचंय असा आजीने हट्ट केला, तेव्हा रचितने तुम्हाला फोन केला होता.”
सुधाकरचं बोलणं ऐकल्यावर रश्मी क्षीण स्वरात म्हणाली, “अरे, आईबाबा पुण्याला आले आहेत, ही गोष्ट तुम्ही आम्हाला का सांगितली नाही?”
“तुमचं म्हणणं योग्य आहे. पण रचितनेच तुम्हाला सांगायला मनाई
केली होती”, सुधाकर हळुवार
स्वरात म्हणाला.
रश्मी सुन्न झाली. आपला मुलगा आपल्यावर नाराज आहे. पण का? अशा अनेक प्रश्नांनी डोकं वर काढलं. रश्मी व वीरेन्द्र काहीही न बोलता पुण्याला निघण्याची तयारी करू लागले. ट्रेनमध्येही दोघे एकमेकांशी बोलले नाहीत. जणू आत्मचिंतन करत होते. स्टेशनवर त्यांना घ्यायला सुधाकर आला होता. त्याच्यासोबत ते त्यांच्या फ्लॅटवर गेले. एका खोलीत आईबाबांचं सामान ठेवलं होतं. छोट्याशा तिपाईवर औषधं होती. दुसर्या खोलीत रचित आणि सुधाकरची पुस्तकं रचून ठेवलेली होती.
“ऑण्टी, तुम्ही चहा घ्याल ना?” सुधाकरने विचारताच दोघे किचनमध्ये गेले. एका डब्यात बेसनाचे लाडू दिसताच वीरेन्द्रने अभावितपणे एक लाडू तोंडात टाकला. आईच्या हातच्या लाडवाची चव अगदी तशीच होती. तासाभरातच सुधाकर त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.
कॅन्टीनमध्ये बाबा व रचित चहा घेत होते. आपल्या मम्मी-पप्पांना पाहून रचित अस्वस्थ झाला. वीरेन्द्र आणि रश्मीने नमस्कार करताच बाबांनी त्यांना मनापासून आशीर्वाद दिले. रचितच्या चेहर्यावरच्या नाराजीने बाबा काहीसे विचलित झालेले दिसले. रश्मी आश्चर्य दाखवीत बोलली, “बाबा, तुम्ही लोक इथे कधी आलात?”
“अगं, असं झालं की, रचित आपल्या मित्रांबरोबर गावी आला होता. अन् आम्हाला हट्टाने इथे घेऊन आला. मी आणि याच्या आजीने नकार दिला, पण त्याने ऐकलंच नाही. मग आम्ही विचार केला की, एक-दोन दिवस याच्याकडे राहू… अन् मग चार-पाच दिवस तुमच्याकडे येऊन गावी परतू. हे तुम्हाला कळव, असं मी त्याला सांगितलंही होतं, पण कालच मला सुधाकरकडून कळलं की, रचितचं महिनाभरात तुमच्याशी काही संभाषणच झालेलं नाही. अन् बघ ना, आम्हाला पण याने गावी परत जाऊ दिलं नाही.”
रश्मीच्या चेहर्यावर पराजयाचे भाव प्रकटले. ती फणकार्याने बोलली, “रचित, तू एवढा बेजबाबदार कसा रे? तुला आपल्या अभ्यासाची तर
नाहीच, पण आईबाबांचीही काहीच फिकीर नाही.”
रचितच्या भावनांचा स्फोट झाला. “मम्मी, बस्स झालं तुझं बोलणं. आजी-आजोबांमुळे माझा अभ्यास होत नाही, असं तुला वाटतं… पण प्रत्यक्षात तसं काहीच नाही. ते माझ्यासोबत राहिल्याचा मला कधीच त्रास झाला नाही. आणि ते आल्याचं मी तुला सांगितलं असतं ना, तर तू काहीतरी निमित्त काढून त्यांना कधीच गावी पाठवून दिलं असतंस. हे लोक म्हातारपणी आपले दिवस कसे काढत असतील, हे जाणून घेणं तुम्हा दोघांचंही कर्तव्य होतं. ज्या वयात आराम करायचा, जवळच्या माणसांसोबत राहायचं, त्या वयात हे दोघं जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत… अन् पप्पा, तुम्ही तरी तुमच्या आईबाबांना असं एकटं वार्यावर कसं सोडलंत हो? तुम्ही मम्मीचं मन कधीच वळवू शकला नाहीत?”
रश्मी पांढरी फटफटीत पडली होती. आजोबांनी डोळे वटारून रचितचा खांदा दाबला नि त्याला शांत करीत म्हणाले, “बस्स कर, रचित. जास्त बोलू नकोस.” तेवढ्यात नर्सने येऊन सांगितलं, “आजी शुद्धीवर आल्या आहेत. तुम्ही त्यांना भेटू शकता.”
आजोबांना घेऊन रचित आजीच्या वॉर्डकडे घाईतच निघून गेला. रश्मी आणि वीरेन्द्रला, त्यांच्या पोटच्या गोळ्याने जीवनाचा आरसा दाखवला होता. त्यात त्यांना आपण खुजे झालो असल्याचं स्पष्ट दिसत होतं. भावना, संवेदना कोणाला नव्हत्या? रचितला की आपल्याला?
वीरेन्द्र आणि रश्मी शून्यवत झाले होते. त्याच अवस्थेत ते वॉर्डामध्ये पोहचले… त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. सलाईन लावलेल्या अशक्त हाताने आजी रचितच्या डोक्यावरून हात फिरवत होती. तिच्या निस्तेज डोळ्यात आपल्या नातवासाठी आशीर्वाद आणि मायेचा पूर आलेला दिसत होता. रश्मी तिच्या पायावर कोसळली, “मला क्षमा करा आई…” ती गदगदलेल्या स्वरात बोलली. आईबाबांनी तिच्या डोक्यावर थोपटत तिचं सांत्वन केलं. आपल्या मम्मी-पप्पांच्या डोळ्यांतून वाहत असलेल्या पश्चात्तापाच्या धारा पाहून रचितच्या मनातला संतापही शांत झाला.
“सॉरी मम्मी-पप्पा, मी तुमच्याशी असं वागायला नको होतं. पण मी तरी काय करणार? तुम्ही आजी-आजोबांची जी उपेक्षा केली, ती मला सहन झाली नाही. मला माफ करा.”
रश्मीने त्याला जवळ घेतलं. आजी-आजोबांच्या डोळ्यात समाधान झळकलं. वीरेन्द्र आपल्या मुलाकडे गर्वाने पाहू लागला. त्याने आपल्या आजी-आजोबांना आधार तर दिलाच, पण आपल्या मम्मी-पप्पांनाही पापाच्या दलदलीतून बाहेर काढलं. शिवाय त्याने हेही सिद्ध करून दाखवलं की, नवी पिढी बोलण्यापेक्षा करण्यावर जास्त भर देते. ती भावुक आहे, संवेदनशील आहे आणि जीवनमूल्यांबाबत जागरूकही आहे. नव्या पिढीतील ही मुलं स्वतःला तर जपतातच, पण वाट चुकलेल्यांनाही योग्य दिशा दाखवतात.