Close

दैव जाणिले कुणी (Short Story: Daiv Janile Kuni)

  • संगीता वाईकर
    हळूहळू सुगंधाला तेज येऊ लागले. गर्भाचे तेज तिला आगळेच सौंदर्य देऊन गेले. शेखरही तिला जिवापाड जपू लागला आणि गर्भात असलेल्या त्या बाळजीवाचे कोडकौतुक जन्माअगोदरच सुरू झाले. प्रसंगच तसा आनंददायी होता. हळू सरणारे दिवस आता लगबग करू लागले आणि नऊ महिने पूर्ण होताच बर्‍याच कठीण शस्त्रक्रियेने सुगंधाने गोंडस बाळास जन्म दिला.
    ‘वंशाला दिवा हवाच’ या अट्टहासामुळे मालतीताईंनी आपला लेक शेखर आणि सून सुगंधा यांना जगणे कठीण करून ठेवले. लग्नाला 12 वर्षे झाली पण मुलगी नकोच, हा हट्ट असल्याने त्यांनी एक दोन वेळा नाही तर तब्बल सहा वेळा गर्भपात करण्यास सुगंधाला भाग पाडले. आणि सततच्या गर्भपाताने सुगंधाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. आता सासूबाईंच्या हट्टाला ती देखील कंटाळली. जगण्याची उमेदही हळूहळू कमी होऊ लागली. तिच्या जिवलग मैत्रिणीला तिचे हाल बघवेना. तेव्हा तिने एकदा सुगंधाला नवसाला पावणार्‍या गणपतीच्या दर्शनाला नेले. त्या निसर्गरम्य परिसरात तिचे मन प्रफुल्लित झाले आणि साक्षात परमेश्‍वराने तिला आशीर्वाद दिला. अखेर भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा तो जगन्नियंताच तर आहे. त्याने सुगंधाच्या मनातील इच्छा ओळखली आणि तिची होणारी परवडही जाणली. सुगंधा आणि शेखर सुशिक्षित असली तरी आपली समाज रचनाच अशी आहे. मुलगा-मुलगी हा भेद कितीही समाज सुधारणा झाली तरी तसाच राहणार आहे, हे सत्य त्यांना उमगले होते. घराण्याचा वंश पुढे न्यायचा तर मुलगाच हवा. कारण, मुलगी म्हणजे परक्याचे धन आणि ती लग्न होऊन दुसर्‍या घरी गेली तरी त्याच घराण्याचे नाव पुढे नेणार. त्यांचाच वंश पुढे वाढवणार, या संकल्पना प्रत्येकाच्या मनात अगदी खोलवर रुजत आहेत. श्री गजाननाचा प्रसाद घेऊन सुगंधा घरी आली. तिने हळूच शेखरच्या कानात नवस बोलल्याचे सांगितले आणि सर्व काही त्याच्यावर सोपवले.
    शेखर-सुगंधा खरंच गुणी होती. आपल्या प्रत्येक कामात चोख होती. आईवर नितांत श्रद्धा व मनापासून प्रेम करणारी मुलं. पण एक सल मात्र गेली अनेक वर्षे त्यांच्या मनात टोचत होती, ती म्हणजे मुलगा हवा. उच्चपदावर असलेला शेखर मनातून मात्र हरला होता. पण सुगंधा मात्र एक ना एक दिवस आपल्या मनासारखे होईल, म्हणून उमेदीत जगत होती आणि एक दिवस मात्र तिला श्री गजाननाने साक्षात दर्शन दिले आणि मनापासून आशीर्वाद दिले. यावेळी आपल्या मनातली इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण होईल म्हणून ती अतिशय सुखावली. काही दिवसातच तिला स्वतःमध्ये काही तरी बदल होत असल्याचे जाणवू लागले आणि ती नकळत हरवली. मनातून मोहरली. तनामनाने आनंदली. नवा कोवळा अंकुर तिच्या कुशीत विसावला होता.
    दिसामासाने सुगंधाचे रूप उजळत होते. तेव्हा मालतीताईंना कोण आनंद झाला. त्यांनी परीक्षण करण्याचे मनात आणले आणि त्याचा रिपोर्टही मुलगाच आहे, असा निश्‍चित झाला. मग काय, मालतीताईंना तर सुगंधाला कुठे ठेऊ नि कुठे नको असे झाले. तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये याचा आटोकाट प्रयत्न त्या करू लागल्या. तिला काय हवे नको, ते सर्व लाड पुरवू लागल्या. त्यांच्यात
    जणू काही नव्या शक्तीचा संचार झाला. सुगंधा आता आपल्या घराण्याचे नाव पुढे नेईल, वंशाला दिवा देईल आणि आपल्या जन्माचे सार्थक होईल, या विश्‍वासाने त्यांना आभाळ ठेंगणे झाले.
    हळूहळू सुगंधाला तेज येऊ लागले. गर्भाचे तेज तिला आगळेच सौंदर्य देऊन गेले. शेखरही तिला जिवापाड जपू लागला आणि गर्भात असलेल्या त्या बाळजीवाचे कोडकौतुक जन्माअगोदरच सुरू झाले. प्रसंगच तसा आनंददायी होता. हळू सरणारे दिवस आता लगबग करू लागले आणि नऊ महिने पूर्ण होताच बर्‍याच कठीण शस्त्रक्रियेने सुगंधाने गोंडस बाळास जन्म दिला. शेखर, सुगंधा आणि मालतीताईंना अतिशय आनंद झाला. काही दिवसांनी अगदी थाटात त्याचे बारसेही केले. त्यांना त्याच्या कोडकौतुकासाठी दिवसही पुरेना. बघता बघता पाच वर्षाचा झालेला रोहन आपल्या हट्टी स्वभावाने घर अगदी डोक्यावर घेत असे. जे मनात येईल ते लगेच मिळायला हवे हा त्याचा हट्ट तिघांनाही डोईजड होत होता. काही दिवसातच त्याच्या लाडाचे वाईट परिणाम दिसू लागले. मनाप्रमाणे झाले नाही तर आदळआपट, तोडफोड करण्यासही मागेपुढे पाहायचा नाही. आता मात्र मालतीताईंना रोहन म्हणजे डोक्याला ताप झाला होता. सर्व लाड पुरवणारी आजी, तिला कसेही करून त्रास द्यायचाच हेच जणू त्याने ठरवले. आता वयोमानाप्रमाणे मालतीताई थकल्या होत्या. धावपळ करणे त्यांना जमेना. एके दिवशी रोहनबरोबर खेळताना खेळण्यातील एक जड वस्तू त्याने आजीकडे रागातच भिरकावली. ती त्यांच्या डोक्यात लागली व त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. अतिशय कठीण शस्त्रक्रिया झाली. पण त्यानंतर काही दिवसातच त्यांचा अंत झाला. असेच होता होता वर्षामागून वर्षे गेली. रोहन शाळेत जाऊ लागला. तेथेही त्याचे वागणे उथळ प्रवृत्तीचेच होते. कुणाचं काहीच न ऐकणं, शिक्षकांनाही न घाबरणं, मारामारी करणं, भांडणं यामुळे सुगंधा आणि शेखर खरंच कंटाळले होते.
    बघता बघता शालेय शिक्षण पूर्ण झाले व तो कॉलेजात दाखल झाला. तिथेही त्याचे मित्रमंडळ तसेच वाया गेलेले होते. तरी अभ्यासात बरा असल्याने वर्षामागून वर्षे पुढे जात होती. आता तरी त्याचे वागणे बदलेल म्हणून आईबाबा वाट बघत होते. शेखरच्या ओळखीने त्याला चांगली नोकरीदेखील मिळाली होती. मग काय पैसा हाती आला आणि रोहनचे वागणेच बदलून गेले. आत्तापर्यंत वडिलांनी कमावलेला पैसा, घरदार सर्व माझेच आहे, मीच एकमेव वारसदार आहे, या थाटात तो वागू लागला. आहे हे सर्व त्याचेच आहे असे वाटून तीदेखील त्याला काही म्हणत नव्हती. यापुढे तो अधिकच उर्मटपणे वागू लागला. हळूहळू मधाळ बोलण्याने त्याने त्यांची संपत्ती आणि घरही आपल्याच नावे करून घेतले. पण आईबाबांना याचा थांगपत्ताही लागला नाही. एक दिवस मात्र त्याने आपणास परदेशात एक उत्तम नोकरी मिळाल्याचे जाहीर केले आणि तुम्हा दोघांनाही माझ्यासोबत यायचे म्हणून हट्ट धरून बसला. आईबाबांनाही खरं तर पहिल्यांदाच त्याच्या या हट्टाचा मनापासून आनंद झाला. आता तिकडेच स्थायिक होऊ म्हणून त्याने बाबांना व्हीआरएस घ्यायला लावली. एवढा मोठा बंगला ठेऊन करायचे काय म्हणून हळूहळू तो देखील विकायला काढला. खरं तर आईबाबांना हे मान्य नव्हते. पण त्याने अगदी छान पटवले. त्या बंगल्याची किंमतही फार मोठी मिळवली आणि सर्वच पैसा लबाडीने आपल्या नावे करून घेतला. एक दिवस त्यांच्या हाती विमानाची दोन तिकिटे ठेवली. खरंच दोघेही आता आपले जीवन बदलणार, परदेशात सुखात उर्वरित जीवन जगायला मिळणार या आनंदाने सुखावले. पण दैवात काही वेगळेच लिहिले होते. ते त्यांना कळलेच नाही. परदेशी जाण्याचा दिवस उजाडला. त्यांना तयार रहायला सांगितले. मुंबईच्या प्रचंड मोठ्या विमानतळावर एका कक्षात त्यांना बसवले आणि लवकरच येतो, येथेच थांबा थोडा वेळ, असं म्हणून रोहन गेला. ती दोघेही रोहन येईल, म्हणून वाट बघू लागले. एक तास, दोन तास झाले आणि बघताबघता सायंकाळ झाली. तेव्हा मात्र यांना काही तरी वेगळेच घडणार अशी चाहूल लागली. रोहन सर्व पैसाअडका घेऊन कधीच भारत सोडून फरार झाला होता. ते देखील अतिशय नियोजनबद्ध रितीने. आता मात्र शेखर-सुगंधावर आभाळच कोसळले. राहते घर, आयुष्यभर मेहनतीने कमावलेला पैसा आणि जिवापाड कोडकौतुकाने वाढवलेला मुलगा सर्वच आता मुठीतल्या वाळूप्रमाणे निसटून गेले होते.
    शेखर आणि सुगंधा विमनस्क अवस्थेतून रस्त्यावरून जात होते. प्रचंड वेगाने वाहनांची येजा सुरू होती, याचेही त्यांना भान नव्हते. एवढ्यात एक कार वेगाने त्यांच्या दिशेने येत होती. तोच एक गरीब अनाथ भिकारी तरुण मुलाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. तो धावतच गेला आणि दोघांनाही तात्काळ बाजूला घेतले, म्हणून ते वाचले. नाहीतर अघटित घडले असते. पण त्यांचा मेंदूच जणू घडलेल्या घटनेने बधिर झाला होता. त्या मुलाच्या बोलण्याने ते भानावर आले. पण डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. आता पुढचे जीवन कशाच्या आधारावर जाईल हे फक्त त्या परमेश्‍वरालाच माहीत. जगण्याचा आधारच काळाच्या ओघात हरवत होता. तेव्हाच त्या गरीब मुलाने ‘आई’ म्हणून हाक मारली. एका वाडग्यातले पाणी दिले आणि जवळच्या कागदातली भाजी-भाकरी खाऊ घातली. त्याने त्याची कहाणी सांगितली. लहानपणीच आईबापाने रस्त्यावर टाकलेले ते पोर रस्त्यावरच भीक मागून आयुष्य जगत होते. तो एका झोपडीवजा घरात राहत होता. पोटाला मिळेल तेवढे मिळवत होता. रस्त्यावर गाड्या पुसून चार पैसे मिळवत होता. त्यानेच या अनाथ, पोरक्या आईबापाला आधार दिला. त्यांना दोन घास मिळावे म्हणून तो मनापासून धडपड करू लागला. आता मात्र शेखर-सुगंधाला दैवाचा फेरा कसा आहे, हे कळून चुकले. एकमेकांच्या आधाराने आणि प्रेमाच्या उबेने तीन जीव जगण्याचा मार्ग आखत आहेत. आला दिवस ढकलत आहेत. पोटच्या पोराने तर त्यांच्या जगण्याच्या सर्वच वाटा बंद केल्या. पण अनाथ, पोरक्या मुलाने मात्र त्यांना जगण्यासाठी आशेचा किरण दाखवला, तेव्हा खरंच वाटले की,
    दैव जाणिले कुणी!

Share this article