सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्टार प्रवाह चॅनलवर ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका सुरू होत आहे. नातेसंबंधावर भाष्य करणाऱ्या या मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे नायक-नायिका कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातील प्रेम कसं बहरतं, याची गोष्ट या मालिकेत आहे.
प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शुभांगी गोखले म्हणाल्या, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अग्निहोत्र आणि अग्निहोत्र २ या स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये मी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. प्रेमाची गोष्टच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. आम्ही सगळे कलाकार खूप मिळून मिसळून काम करतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखनाची आघाडी अश्विनी शेंडे आणि गौरी कोडीमला उत्तमरित्या सांभाळत आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र महत्त्वाचं आहे. या मालिकेत मी मुक्ताच्या आईची म्हणजेच माधवी गोखले ही व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारं असावं असं मला वाटतं. त्यामुळे मी साकारत असलेलं पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात कसं राहिल यासाठी माझा प्रयत्न असतो.
या मालिकेत मी साकारत असलेलं पात्र शिस्तप्रिय आहे. साधेपणातलं सौंदर्य जपणारं आणि संस्कृतीशी घट्ट नाळ जपणारं. तेजश्री प्रधान आणि मी एका मराठी सिनेमात माय-लेकीची भूमिका साकारली होती. पुन्हा एकदा आम्ही दोघी मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलोय. तेजश्री उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करायला मला खूप आवडतं. अभिनयात खूप ठेहराव असणारी आणि सतत काहीतरी नवं शोधणारी तेजश्री मला खूपच भावते. हे पात्र आणि ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे अश्या शब्दात शुभांगी गोखले यांनी आपली भावना व्यक्त केली.’