हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ या वेब सीरिजने २०२० मध्ये धुमाकूळ घातला होता. प्रतीक गांधीची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये ‘बिग बुल’ हर्षद मेहताची कथा दाखवण्यात आली होती आणि त्याला जगभरातून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता तीन वर्षांनंतर हंसल मेहता एका नव्या स्कॅमची कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ या आगामी सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘स्कॅम २००३’ हा भारतातील सर्वात मोठा स्टॅम्प पेपर घोटाळा म्हणून ओळखला जातो. या सीरिजची संपूर्ण कथा अब्दुल करीम तेलगीवर आधारित असणार आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचे कथानक पत्रकार आणि वृत्तनिवेदक संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या हिंदी पुस्तकातून घेण्यात आले आहे.
१ मिनिट २६ सेकंदांचा हा टीझर पहिल्या क्षणापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. मनोज वाजपेयी यांच्या दमदार व्हॉइस ओव्हरने या टीझरची सुरुवात होते. त्यात अब्दुल करीम तेलगीने कशा पद्धतीने खोटेपणा आणि फसवणुकीच्या जोरावर त्याचं साम्राज्य निर्माण केलं, याची झलक पाहायला मिळते. “मुझे पैसे कमाने का कोई शौक नहीं है. क्यूंकी पैसा कमाया नहीं बनाया जाता है”, हा तेलगीच्या तोंडातील संवाद त्याच्या फसवणुकीच्या फंड्याला उघड करतो.
कर्नाटकातील खानापूर इथं जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगीचा फळविक्रेत्यापासून ते सर्वांत मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड बनण्यापर्यंतचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. तेलगी स्टँप घोटाळ्याने संपूर्ण देश हादरलं होतं. तेलगीने देशातील १२ राज्यांमध्ये १७६ कार्यालयांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचं बनावट स्टँप विक्रीचं साम्राज्य राजरोस उभं केलं होतं.
‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही सीरिज २ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होईल. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. सीरिजमघ्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार साकारणार आहेत.
तेलगी घोटाळा-
अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या भावांनी नाशिकच्या प्रींटिंग प्रेसमधून जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक छापले होते. हे बनावट स्टँप देशभरात विकून त्याने कोट्यवधी रुपये जमवल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. २००३ मध्ये तेलगीला अटक करण्यात आली होती. २० हजार कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात तेलगीला २००७ मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला ३० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इतकंच नाही तर त्याच्यावर २०२ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. २०२० मध्ये त्याचा बेंगळुरुतील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.