यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये कंजंक्टिव्हायटिसच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, ह्या अतिशय संक्रमणशील अशा डोळ्यांच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ धोक्याचा इशारा देत आहेत. कंजंक्टिव्हायटिसला सामान्यपणे ‘पिंक आय’ (डोळे येणे) म्हणून ओळखले जाते. ह्यामध्ये डोळ्यातील पांढऱ्या भागाला तसेच पापण्यांच्या अंतर्गत पृष्ठभागाला आच्छादणाऱ्या कंजक्टिव्हा ह्या पातळ पडद्यावर दाह निर्माण होतो. हा प्रादुर्भाव समुदायातील अन्य व्यक्तींमध्ये वेगाने पसरू शकतो. त्यामुळे जागरूकता व प्रतिकाराचे उपाय त्वरित करण्याची गरज भासते.
मागील वर्षाच्या तुलनेत कंजंक्टिव्हायटिसच्या प्रमाणात चिंताजनक म्हणजेच १०-१५% वाढ झाली आहे. दररोजच्या बाह्यरुग्णांपैकी सुमारे १५% कंजंक्टिव्हायटिसची लक्षणे असलेले आहेत आणि हा प्रादुर्भाव अधिक संसर्गजन्य व संक्रमणशील वाटत आहे.
“पावसाळ्यामधील आर्द्रतेच्या प्रचलनामुळे विषाणूंच्या वाढीला बढावा मिळतो आणि कंजक्टिव्हायटीसच्या प्रसारासाठी पोषक वातावरण निर्माण होते. पाणी साचणारे भाग तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे पालन नीट केले जात नाही अशा प्रदेशांमध्ये, उदाहरणार्थ, झोपडपट्ट्या, संक्रमणाचा धोका अधिक असतो. लहान मुले, त्यांचे कुटुंबीय आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कंजंक्टिव्हायटिसची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. हा आजार झालेल्यांमध्ये 30-40% प्रमाण ह्यांचेच आहे,” असे डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या नेत्रविकारतज्ज्ञ आणि कॅटरॅक्ट सर्जन डॉ. टी. एस. सुजाता ह्यांनी सांगितले.
घरगुती उपचारांवर हवाला ठेवणाऱ्या, वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय स्वत:च्या मनाने (ओव्हर द काउंटर) औषधे घेणाऱ्या व्यक्तींना विषाणूजन्य कंजंक्टिव्हायटिसमध्ये गंभीर गुंतागुंती निर्माण होण्याचा धोका आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अशा गुंतागुंती टाळण्यासाठी कंजंक्टिव्हायटिसची सुरुवातीची लक्षणे दिसल्यावर लगेचच नेत्रविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
“कंजंक्टिव्हायटिसचा प्रसार टाळण्यासाठी सुलभ प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब अत्यावश्यक आहे. चेहरा नियमितपणे धुणे, डोळ्याला वारंवार हात न लावणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहेत. पालकांनी मुलांना नियमितपणे हात धुण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे तसेच हातरुमाल किंवा वैयक्तिक वापराच्या वस्तू अन्य मुलांसोबत वाटून घेणे टाळण्याचा सल्ला दिला पाहिजे,” असेही डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या नेत्रविकारतज्ज्ञ आणि कॅटरॅक्ट सर्जन डॉ. टी. एस. सुजाता ह्यांनी सांगितले.