Close

मिस् कॉल (Short Story: Miss Call)

  • दीप्ती मित्तल
    पारूल, तुझ्या लक्षात येतंय का? गेल्या काही महिन्यांपासून माथुर सर तुझ्यावर जास्तच मेहेरबान आहेत. म्हणजे बघ, इतर कुणी एका दिवसाची रजा मागितली तरी ते डाफरतात. अन् तुला मात्र आठवडाभराची रजा न कुरकुरता सहजच मंजूर केली! तुझ्या असाइनमेंट्सही त्यांनी इतरांमध्ये वाटून टाकल्या…
    आठवडाभराची रजा संपवून पारूल ऑफिसमध्ये आली होती. तिला पाहताच मुग्धा चकित होऊन बोलली, “काय गं, कधी आलीस? तुझ्या मामेबहिणीचं लग्न थाटात झालं नं?… तुला बघून खूप बरं वाटलं गं! तुझ्याशिवाय ऑफिसात अगदी बोअर झाले होते मी. कामात लक्ष तर लागतच नव्हतं, पण कॅन्टीनमध्येही जावंसं वाटत नव्हतं!…”
    “हो, का? खूप बोललीस. हे घे…
    आमच्या गावाची खास मिठाई, बालुशाही… ऑफिसमधल्या लोकांची नजर चुकवून हे दोन पीस खास तुझ्यासाठी राखून ठेवलेत. घे खाऊन पटकन…” मुग्धाला बालुशाहीचा घास भरवतच पारूल बोलली.
    या अकाऊन्टन्सी फर्ममध्ये आल्या दिवसापासून पारूलचं मुग्धाशी मेतकूट जमलं होतं. त्यांचं एकमेकांशी इतकं पटत होतं की, जणू त्या बालपणीच्या मैत्रिणीच होत्या. तसं पाहिलं तर, दोघींच्या राहणीमानात, स्वभावात बराच फरक होता. मुग्धा मुंबईत वाढलेली
    मॉडर्न आणि बोलायला फटकळ तरुणी
    होती, तर पारूल ही लहान शहरातून नोकरीसाठी आलेली, साधीभोळी, शिस्तीनं जगणारी होती. तिच्या लेखी भावना, संवेदना यांना जास्त महत्त्व होतं. तिच्या अत्यंत भोळ्या स्वभावामुळे मुग्धा कधी कधी तिची अति काळजी घेत असे. तेव्हा पारूल तिला गमतीनं म्हणे, “माझा दादा तो-”
    “चल आता, पटापट लग्नाचा इतिवृत्तांत दे बघू. लग्न एकदम थाटात झालं ना? तिथे तुला कोणी मागणी घातली की नाही?” पारूलने तिच्याकडे जरा घुश्शातच पाहिलं.
    “अगं वेडाबाई, लग्नघरी नजरानजर होते, मागणी घालण्याचे चान्सेस् जरा जास्तच असतात-” मुग्धा अगदी गंमत करण्याच्या मूडमध्ये होती.
    “लग्न थाटातच झालं बरं! मामाला आपल्या मुलीसाठी पाहिजे होता, तस्साच मुलगा मिळाला. आईच्या माहेरचे सगळे नातेवाईक भेटले. खूप मज्जा आली… तुला खरं सांगू मुग्धा, मी जेव्हा कधी आमच्या गावी जाते ना, तेव्हा तेव्हा आपलं हे एवढं मोठ्ठं दिल्ली शहर, गावापेक्षा लहानच असल्याचं जाणवतं… इथे सर्व सुखसोयी हात जोडून उभ्या आहेत, पण जीवन मात्र शुष्क, संवेदनाहीन, निर्जीव वाटतं. तर तिथे गावात नात्यागोत्यातील मायेची ऊब, माणसामाणसात जिवंतपणा आणते. आता बघ नं, घरात लग्न आलेलं… अन् त्याची कामं एकट्या मामाच्या अंगावर पडली होती. पण शेजार्‍यापाजारांनी, मोहल्ल्यातील लोकांनी त्याचा खूपसा भार कमी करून, आपल्याच घरचं कार्य असल्यासारख्या जबाबदार्‍या उचलल्या नि त्याचा भार कमी केला. इथे शहरात, हाकेच्या अंतरावर जवळचे नातेवाईक राहत असले, तरी एकमेकांपासून अंतर ठेवून वागतात. तर तिथे गावात परकी माणसंही नातेवाईक होऊन जवळ येतात…”
    “पारूल मॅडम, माथुर सरांनी तुम्हाला बोलावलं आहे-” शिपायाने निरोप देत त्यांच्या संभाषणात खंड पाडला.
    “आलेच. मुग्धा, बाकीच्या गोष्टी लंच टाइममध्ये करू. आता जरा कामाला लागते. पेंडिंग वर्क बरंच आहे.” असं म्हणून पारूल साहेबांकडे निघाली.

आज पारूलच्या डब्यात छान पदार्थ होते. ते पाहून “वाः, क्या बात है”, असे उद्गार मुग्धाच्या तोंडून आपसूकच निघाले.
“काय गं, मघाशी साहेबांनी कशाला बोलावलं होतं? काही खास काम होतं का?” लंच सुरू करत मुग्धाने विचारलं.
“नाही गं. काम काहीच नव्हतं. सुट्टी आनंदात घालवलीस का, वगैरे विचारपूस करत होते. पेंडिंग कामाचं काही टेन्शन घेऊ नकोस, असं म्हणाले. माझ्या पश्‍चात त्यांनी सर्व असाइनमेंट्स सर्व लोकांमध्ये वाटून टाकल्या होत्या. तेव्हा आता माझ्याकडे काहीच काम पेंडिंग नाही, हे कळलं.” पारूल तणावमुक्त होती. पण तिच्या बोलण्याने मुग्धा मात्र विचारात पडली.
“पारूल, तुझ्या लक्षात येतंय का? गेल्या काही महिन्यांपासून माथुर सर तुझ्यावर जास्तच मेहेरबान आहेत.”
“म्हणजे? तुला काय म्हणायचंय?”
“म्हणजे बघ, इतर कुणी एका
दिवसाची रजा मागितली तरी ते डाफरतात. अन् तुला मात्र आठवडाभराची रजा न कुरकुरता सहजच मंजूर केली! तुझ्या असाइनमेंट्सही त्यांनी इतरांमध्ये वाटून टाकल्या…”
“तुला काय म्हणायचंय ते जरा स्पष्टपणे बोल.”
“मग आता स्पष्टच सांगते. माझ्या कानात धोक्याची घंटा वाजतेय. या माथुर सरांपासून जरा सांभाळूनच राहिलेलं बरं.”
“भलतंसलतं काही बोलू नकोस.” जेवण बाजूला ठेवून पारूल फुत्कारली.
“अगं, खरंच बोलतेय मी. तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंय मी. असल्या लोकांना मी चांगलंच ओळखून आहे. तुझ्या भोळेपणाचा ते फायदा घेताहेत…”
“मुग्धा, तुझ्या जिभेला काही हाड? अगं, ते माझ्यापेक्षा वयाने केवढे तरी मोठे आहेत.”
“या मोठ्या वयाच्या लोकांचं खरं रूप काय आहे, ते तुला नाही कळणार…”
“फार बोललीस… ते माझी काळजी करतात, मला सपोर्ट करतात, हे मला ठाऊक आहे. पण तुला वाटतं, तशा अर्थानं नव्हे… मला तर त्यांच्या वागण्यात वडिलांसारखी, मोठ्या भावासारखी काळजी दिसतेय. अन् त्यांची चांगली फॅमिली आहे… माझ्या बायकोला तू एकदा भेट, असंही ते कित्येकदा बोलले आहेत. त्यांचा हेतू मला तरी प्रामाणिक वाटतो…”
“माय डिअर फ्रेण्ड. जो माणूस चांगला असतो ना, तो सगळ्यांशी चांगला वागत असतो. माणसागणिक त्याची वर्तणूक बदलत नाही. इथे तर त्यांचा चांगुलपणा फक्त तुझ्या बाबतीतच दिसून येतोय. हे बघ, अशा वातावरणातच मी वाढलेय. उडत्या पक्षाची पिसं मी मोजत असते. कळलं…”
आता मात्र पारूल मुग्धावर चांगलीच उखडली. ती म्हणाली, “मुग्धा, हा तुझा प्रॉब्लेम नाही. तुमच्या शहरातील वातावरणाचा परिणाम आहे. एखादा माणूस कोणत्याही स्वार्थाशिवाय एखाद्याशी चांगला वागू शकतो किंवा एखाद्याची मदत करू शकतो, ही बाब तुमच्या पचनी पडणारी नाही. असं काही घडलं तर तुमच्या सडक्या डोक्यात शंका येऊ लागते. तू माझ्यासोबत माझ्या बहिणीच्या लग्नाला आली असतीस ना, तर तुला अख्खं गावंच मतलबी वाटलं असतं…”
“बरं बाई, तुझंच खरं. मला जे जाणवलं, ते मी तुला बोलले. देव करो नि तू म्हणतेस तसंच असो. तरी पण… अन् हे बघ, हे तुझ्या मामाचं सरळ मार्गी गाव नव्हे. तेव्हा बी केअरफुल…” विषय जास्तच ताणला जातोय, हे पाहून मुग्धानं शस्त्र खाली टाकलं.


दिवसामागून दिवस जात होते. माथुर सरांची मेहरनजर पारूलवर जास्तच दिसत होती. लहानसहान कामासाठी ते पारूलला आपल्या केबिनमध्ये बोलवत. तिच्याशी हसतखेळत गप्पा मारत. दिवसेंदिवस त्यांचा वाढत चाललेला आगाऊपणा मुग्धाला त्रस्त करत होता. आपल्या भोळ्याभाबड्या मैत्रिणीवर काही बला येऊ नये, असं तिला मनापासून वाटत होतं…
आज माथुर सर रजेवर होते. त्यामुळे ऑफिसचं वातावरण मोकळं वाटत होतं.
“पारूल, आज लंचनंतर आपण ऑफिसमधून सटकूया. एक छानसा पिक्चर बघूया”, उत्तेजित स्वरात मुग्धानं प्रस्ताव ठेवला.
“नको यार, आज हे काम पूर्ण करून सरांना द्यायचं आहे.”
“अगं, पण ते तर रजेवर आहेत…”
“हो, पण त्यांनी संध्याकाळी घरी बोलावलं आहे. माझी तब्येत ठीक नाही, म्हणून ऑफिसला येऊ शकत नाही, असं त्यांनी फोनवरून कळवलं होतं. पण आपल्याला हे काम आजच पूर्ण केलं पाहिजे, म्हणून तू घरी ये, असं त्यांनी सांगितलंय गं.” पारूलचं बोलणं ऐकून मुग्धाच्या मनात धोक्याची घंटा जोरजोरात वाजू लागली.
“हे बघ पारूल, मी पण तुझी सहकारीच
आहे. आपण एकत्रच काम करतोय. आजची डेडलाइन असलेलं एकही काम मला तरी माहीत नाही. तेव्हा साहेबांच्या घरी जाण्याची काहीही गरज नाही.”
“अगं बाई, ते काही घरात एकटेच राहत नाहीत. मग मी कशाला घाबरू? त्यांची बायको-मुलं, दोन नोकर… तेही असतीलच
ना घरी! साहेब तर म्हणत होते की, या निमित्ताने मला त्यांच्या घरच्या माणसांनाही भेटता येईल.”
“तुला योग्य वाटत असेल, तर तू जा त्यांच्याकडे. फक्त माझी एकच गोष्ट ऐक. माझा मोबाईल नंबर स्पीड डायलवर सेव्ह कर. देव न करो, पण माझी शंका खरी ठरली, तर फक्त एक मिस् कॉल मला दे.”
“त्याची काही गरज पडेल असं मला तरी वाटत नाही. तरी पण तुझ्या समाधानासाठी हे मी नक्की करते.”


आपलं काम आटोपून पारूल संध्याकाळी सातच्या सुमारास माथुर सरांच्या घरी पोहचली. डोअरबेल वाजवताच खुद्द माथुर सरांनीच दरवाजा उघडला. त्यांना बघून पारूल अवाकच झाली. ते अजिबात आजारी वाटत नव्हते. उलट एकदम ताजेतवाने दिसत होते. त्यांनी कपडेही छान घातले होते.
“कम इनसाइड. आरामात बस. फील कम्फर्टेबल…” माथुर सरांच्या चेहर्‍यावर वेगळेच भाव दिसत होते. त्यांच्या नजरेनं पारूल अस्वस्थ झाली. तेव्हा लॅण्ड लाइनचा फोन वाजला.
“बस, मी आलोच…” असं म्हणत ते फोन घ्यायला आत गेले. पारूलने इकडे तिकडे नजर फिरवली. तिच्या लक्षात आलं की, लिव्हिंग रूममध्ये प्रकाश जरा मंदच होता. मंद स्वरात संगीतही सुरू होतं. एका कोपर्‍यात बार होता. त्याच्या डेस्कवर एक रिकामा ग्लास तिला दिसला. बोलताना त्यांचा स्वर जरा बहकलेला होता… त्यांनी ड्रिंक तर घेतलं नसेल ना?… तिला शंका आली. घरही शांत वाटत होतं. तिथं कुणाचीही चाहूल नव्हती…
“हे बँकवाले आपली लोन स्कीम समजावण्यासाठी संध्याकाळी कशाला फोन करतात, तेच कळत नाही.
ते जाऊ दे, तुला घर शोधण्यात काही अडचण तर आली नाही ना?”
“नाही… नाही… पण सर, घरात कोणी दिसत नाही. मॅडम घरात नाहीत का?” पारूलने प्रश्‍न केला.
“अगं, तिला अर्जंट काम निघालं. म्हणून ती मुलांना घेऊन माहेरी गेलीय…” तिची नजर चुकवत माथुर बोलले.
“ओह! आय सी… सर, या कामाच्या फायली मी आणल्या आहेत”, पारूल बॅगेतून फाईल्स काढत म्हणाली.
“ते कामाचं राहू दे गं. आधी मला सांग
तू काय घेणार?” माथुर सर तिच्या जवळ
येत म्हणाले.
पारूल गडबडली… आपल्या आदरणीय माथुर सरांच्या नजरेत काही वेगळीच चमक दिसत असल्याचं तिला पहिल्यांदाच जाणवलं.
“सर, तुमची तब्येत कशी आहे?” दूर सरकत पारूलने विचारलं.
“तू येताच बरा झालो बघ!” माथुर सरांच्या बोलण्यातला गर्भित अर्थ लक्षात येताच पारूल अंतर्बाह्य थरारली. तेवढ्यात पुन्हा फोनची
घंटी वाजली.
“च्यायला, या फोनच्या… आता त्याला डिस्कनेक्ट करूनच येतो.” चिडून बोलत माथुर सर वेगाने आत गेले. ती संधी साधून पारूलने मुग्धाला मिस् कॉल दिला.
माथुर सर परतले. अन् डोअरबेल वाजली. आता तर ते खूपच चिडले.
“आता या वेळेला कोण तडमडलं आहे? लोकांना काळवेळ काही समजत नाही, बघ…”
“सर, तुम्ही बसा ना. मी बघते”, पारूल उठून उभी राहिली.
“नको नको… तू बस. जो कुणी असेल त्याला मीच बघतो”, असं म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. अन् ते थक्कच झाले.
फुलांचा बुके घेऊन मुग्धा समोर उभी होती. तिच्यासोबत एक धडधाकट तरुण होता.
“गुड इव्हनिंग सर, मी आपल्या भावासोबत याच बाजूला आले होते. तेव्हा म्हटलं आपल्या तब्येतीची चौकशी करावी.”
मुग्धाला पाहून माथुर सरांच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला. आपले सर्व इरादे मातीत मिळाल्याची त्यांना कल्पना आली.
“आपली तब्येत आता कशी आहे सर?” तिने विचारलं.
“मी ठीक आहे. पण तू उगाच तसदी घेतलीस… हे बघ, आता मी जरा बिझी आहे. एक अर्जंट काम…”
“आय नो सर. आपल्या या अर्जंट कामाबद्दल पारूल बोलली होती”, बोलता बोलता त्यांना बाजूला सारून मुग्धा घरात शिरली.
“हाय पारूल! तुझं काम आटोपलं असेल तर चल. आय कॅन ड्रॉप यू.”
“काम…” पारूल निरुत्तर झाली होती.
“नसेल आटोपलं तरी हरकत नाही. आम्ही थांबतो तुझ्यासाठी”, असं बोलत मुग्धाने सोफ्यावर बसकण मारली.
“पारूल, तू निघ आता. या फाईल्स मी बघेन सावकाश. असाही आता मी बरा आहे.” अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीने माथुर सरांना घाम फुटला होता.
“ठीक आहे सर, मी येते”, पडत्या काळाची आज्ञा घेतल्यागत पारूल उठली नि मुग्धासोबत जायला निघाली. तशी मुग्धा थांबली. अन् माथुर सरांना फुलांचा बुके देत म्हणाली, “गेट वेल सून सर. देवाच्या कृपेने तुम्हाला चांगलं आरोग्य आणि आचार लाभू दे.” माथुर सरांचा पडलेला चेहरा पाहून मुग्धाला हसू आवरत नव्हतं. सरांच्या घराबाहेर येताच पारूलनं मुग्धाला मिठीच मारली.
“मोठ्या संकटातून वाचवलंस बघ. देव तुझं आणि त्या लॅण्ड लाइनवर फोन करणार्‍यांचं खरंच भलं करोत. त्या फोनमुळे मला विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि मुख्य म्हणजे तुला मिस् कॉल देण्याची संधी मिळाली.”
“थँक्यू. आणि कळलं का, ते फोन करणारीही मीच होते.”
“काय म्हणतेस? अन् हे तुझ्यासोबत कोण आहेत?”
“हे, आमच्या सोसायटीचे जीम प्रशिक्षक. फॉर द सेफर साइड… मी यांनाही सोबत घेऊन आले…”
“अगं, पण तू इतक्या लगेच कशी आलीस?” पारूल आश्‍चर्याच्या धक्क्यातून सावरत म्हणाली.
“तू आत गेल्यापासून मी बाहेरच उभी होते. तू मिस् कॉल करणार, याची मला पूर्ण खात्री होती. तुला मी म्हणाले होते ना, की मी उडत्या पक्षाची पिसं मोजते म्हणून.”
“बरं बाई, तुझंच खरं… चल तुझ्या या युक्तीबद्दल माझ्याकडून तुला स्पेशल
डिनर पार्टी!” दोघी हसत हसत हातात हात घालून निघाल्या.

Share this article