काल सर्वत्र जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा केला गेला. त्या निमित्ताने ‘खतरों के खिलाडी’ फेम अभिनेत्री सना मकबूल खानने आपले अनुभव कथन करत यकृताचे आरोग्य राखण्याचे महत्त्व विशद केले. यकृताच्या आजाराशी आपण कशी झुंज दिली, हे सनाने सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तरुणांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत सांगितले. विविध चित्रपट आणि मालिकांची अभिनेत्री सना, सध्या कलर्स टी.व्ही. वरील डॉ. आलियाची भूमिका करत आहे.
सना खानला २०१९ साली यकृताच्या लक्षणीय फायब्रोसिसह ऑटोइम्युन हिपॅटायटिस झाल्याचे आढळून आले, त्याबद्दल तिने सांगितले की, “या रोगाबाबत मी डॉ. आकाश शुक्ला आणि एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या टीमची आभारी आहे. त्यांनी मला शारीरिक व मानसिकरित्या या आजाराशी लढायला मदत केली. या संदर्भात मला सांगायचे आहे की, विशेषतः तरुणांनी त्यांचे आरोग्य कधीही गृहित धरू नये. लवकर निदान व वेळेवर उपचारासाठी जागरूकता महत्त्वाची आहे.”
या आजारानंतर निरोगी व फिट होऊन सनाने २०२१च्या खतरों के खिलाडी मध्ये भाग घेतला व तिने या कार्यक्रमात ७ वा क्रमांक मिळवला.
हॉस्पिटलने आयोजित केलेल्या कार्यशाळेविषयी बोलताना सर एचएन रिलायन्स रुग्णालयाचे हिपॅटोलॉजी डायरेक्टर डॉ. आकाश शुक्ला म्हणाले, “जागतिक हिपॅटायटिस दिवसाच्या निमित्ताने आम्ही यकृताच्या आजाराच्या कारणांबद्दल जनजागृती करत आहोत. यकृताच्या दुखापतीचे एक सामान्य कारण अल्कोहोल असले तरी यकृतावर परिणाम करणारा हा एकमेव घटक नाही. सिरोसिस सह बहुतेक यकृत रोग बरे केले जाऊ शकतात. विशेषतः प्रारंभिक अवस्थेत निदान झाल्यास.”
एका अभ्यासानुसार, जागतिक स्तरावर, यकृताच्या आजारांमुळे दरवर्षी सुमारे २० लाख लोक मृत्यू पावतात. भारतामध्ये हा आजार साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने पसरत आहे. प्रत्येक ५ प्रौढांपैकी १ जण बाधित होत आहे. सदर कार्यशाळेत रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तरंग ग्यानचंदानी यांनी मार्गदर्शन केले व “आपण सर्वांनी एकजुटीने केवळ हिपॅटायटिसच नव्हे तर यकृताच्या सर्व प्रकारच्या आजारांशी लढण्याची शपथ घेऊया,” असे सांगितले.