Close

सर्व माध्यमातून काम करूनही रंगभूमीवर निष्ठा असलेला कलावंत : जयंत सावरकर (Jayant Savarkar’s Loyalty Was Always Stage, Although He Worked In All Mediums)

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर, त्यांचा एक व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे. अतुल परचुरे सोबत सावरकरांनी गाजवलेली, पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली मधील अंतू बर्वा ही व्यक्तीरेखा त्यात दिसते. पु.लं. नी चितारलेला बेरकी, फटकळ, भावुक बर्वा अशी ही सावरकरांची भूमिका पाहून डोळे पाणावतात…

जयंत सावरकरांचा अभिनय असाच अष्टपैलू होता. त्यांनी रंगभूमीवरून आपली कारकीर्द सुरू केली. अन्‌ चित्रपट – टी.व्ही. मालिका मध्ये बऱ्याच भूमिका केल्या. परंतु, त्यांची रंगभूमीवर निष्ठा कायम राहिली. सम्राट सिंह या आचार्य अत्रे लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित व्यावसायिक नाटकातून जयंतराव आले. अन्‌ पुढे तुझे आहे तुजपाशी, एकच प्याला, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, प्रेमा तुझा रंग कसा, सूर्यास्त अशा असंख्य नाटकातून विविधरंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळविले. त्यांच्या भूमिकांमुळे विष्णुदास पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे कोंदण लाभले. त्याचप्रमाणे १९९७ साली ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि रंगभूमीचा पाईक म्हणून त्यांचे जीवन कृतार्थ झाले.

शंभराहून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या आयुष्यात आर्थिक चढउतार आले. ते सर्व पचवून जयंत सावरकर सदैव हसतमुख राहिले. कोण जाणे हसतच त्यांनी मृत्युला कवटाळले असावे…

Share this article