- विनायक शिंदे
कधी नव्हती ती अचानक डाव्या डोळ्याची पापणी लवायला लागली. पुरुषाच्या डाव्या डोळ्याची पापणी लवणे म्हणजे
पुढे येणार्या वाईट संकटाची चाहूल असते, अशी त्याची आजी म्हणायची. अवेळी असल्या कुशंकेची आपल्या मनात आलेली शंका आठवून त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले.
करकरीत तिन्ही सांजा झाल्या होत्या. सूर्य क्षितिजावर डोंगराआडून अस्ताला चालला होता. संधिप्रकाशात रक्तवर्णी रंगाने आकाश गडद झाले होते. चारा शोधण्यासाठी सूर्योदयाला आकाशातून निघालेली पाखरांची रांग आता कितीतरी वेगाने आपल्या घरट्याकडे परतीच्या प्रवासाला निघाली होती. जंगले, दर्याखोरी, चढउतार यातून व्यवस्थितपणे मार्ग काढीत सिमेंटचा करडा रस्ता क्षितिजाला पोचलेला होता. त्याच रस्त्यावरून रामदास आपला ट्रक भन्नाट वेगाने दामटीत होता. त्याचे घर अजून कित्येक मैल दूर होते. त्याला अधूनमधून डोळ्यासमोर सारजाची, त्याच्या पत्नीची छबी दिसत होती. तिचे दिवस भरत आले होते. इतक्या आडगावात तू जाऊ नकोस. पहिलेच बाळंतपण आहे. आयत्यावेळी काही बाका प्रसंग आला तर ना तिकडे हॉस्पिटल - ना तिकडे डॉक्टर. ‘तसे काही होणार नाही. तुमच्या मनात असल्या वाईट शंका आणू नका. पहिले बाळंतपण हे आईच्या घरी माहेरी करायचे असते.’ हा आठ-दहा दिवसांपूर्वी झालेला संवाद या घनदाट शांततेत त्याला जसाच्या तसा ऐकू येत होता. त्याच्या मनात नसती धाकधूक लागून त्याच्या जिवाची घालमेल होत होती. त्या सुनसान रस्त्यावर आता चिटपाखरूही दिसत नव्हते. फक्त त्याच्या भरधाव चाललेल्या ट्रकच्या चाकांचा आवाज येत होता. हळूहळू हवेत गारठा जाणवायला लागला. काळोख आपले काळोखे पाश आवळायला लागला होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या गर्द सावल्या आपल्या ट्रकला गिळायला येताहेत असं वाटायला लागले. त्याला खाकी विडी ओढायची तलफ आली. पण तेवढाही वेळ थांबण्याची त्याची आता बिलकूल तयारी नव्हती. बाहेरच्या काचेत त्याने उगीचच डोकावून पाहिले. तेव्हा त्याला आपला मूळचा गोरापान चेहरा भेसूर झाला आहे असे वाटले. कधी नव्हती ती अचानक डाव्या डोळ्याची पापणी लवायला लागली. पुरुषाच्या डाव्या डोळ्याची पापणी लवणे म्हणजे पुढे येणार्या वाईट संकटाची चाहूल असते, अशी त्याची आजी म्हणायची. कदाचित सारजाच्या तब्येतीत काही बिघाड तर झाला नसेल? अवेळी असल्या कुशंकेची मनात आलेली शंका आठवून त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असे काही नसते. त्याने स्वतःला आवरले. तेवढ्यात त्याच्या ट्रकपुढे कुणाची तरी सावली हलली. त्याने कचकन ब्रेक दाबला. अंधूक प्रकाशात अंगभर कावळे पांघरलेला एक जर्जर भिकारी कसाबसा पाय ओढीत रस्ता पार करीत होता. एवढ्या सुनसान जंगलात हा एकाकी भिकारी आला कोठून? जवळपास मनुष्यवस्तीचा मागमूसही दिसत नव्हता. ‘म्हातारबा, माझ्या गाडीखाली जीव देऊन मला पापाचा धनी करतोस की काय?’ तो चढ्या आवाजात म्हणाला. तसा माफीचा नमस्कार करून घाईघाईने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जीर्ण अवस्थेत असलेल्या घराच्या पाठीमागे तो गेला. येतील तसल्या चार दोन शिव्या तोंडातल्या तोंडात घोळवीत त्याने ट्रक स्टार्ट केला. दहा-पंधरा पावलावर आलेले वळण लीलया ओलांडून तो पुढे गेला आणि त्याला काहीतरी आठवले. अचानक रस्ता ओलांडणार्या त्या भिकार्याचा चेहरा त्याला आठवला. लांबुडका चेहरा. उंच जाडे बेढब नाक, दाट भुवया आणि बाहेरच्या बाजूला ओथंबलेले डोळे… या माणसाला आपण अगदी लहानपणी सातवी आठवीत असताना कुठे तरी पाहिलेले आहे. कोण बरे असेल तो? त्याने क्षणभर आठवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एकदम आठवले. तसा तो हादरला. अरे हे तर शंकरराव- आपल्या मोठ्या ताईचे सासरे! फार प्रेमळ होता म्हातारा. कशावरून तरी त्याच्या इंदू ताईचे त्याच्याशी कडाक्याचे भांडण झाले आणि तो कोणालाही न सांगता तडकाफडकी घरातून निघून गेला. गेला तो कायमचा! घरच्यांनी खूप वाट पाहिली पण तो परतला नाही. पोलीस कंप्लेण्ट, म्युनिसिपल हॉस्पिटल, सिद्धिविनायक, शिर्डी, पंढरपूर अशा दूरदूरच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मुलाने- ताईच्या नवर्याने शोध घेतला. पण कुठेच त्याचे वडील त्याला दिसले नाहीत. हळू हळू सर्वजण त्याला विसरले. त्याच्या येण्याची आशा मावळली. पुढे बराच काळ लोटला. नंतर तो सासरा मेला की जिवंत आहे याची त्यांच्या मुलाने व इतर नातेवाईकांनीही चौकशी केली नाही. त्या गोष्टीला बराच कालावधी लोटला होता. जवळजवळ पाच सहा वर्षांच्या अंतराने मेहुणे व ताई या जगातून निघून गेले होते. त्यांचे दोन मुलगे मोठे होऊन चांगल्या नोकरीधंद्याला लागून त्यांची लग्नकार्ये होऊन त्यांना मुलंबाळं झाली होती. नंतर त्याने त्यांच्या घरी जाणे कायमचे सोडले होते. त्याला वाटले ट्रक परत पाठीमागे वळवून त्या म्हातार्याला हुडकून काढावे. नंतर विचार आला की, शेवटच्या अवस्थेत पोहोचलेल्या या म्हातार्याचे आता कितीसे आयुष्य उरले आहे? या भिकारी अवस्थेत त्याला कोण ओळखणार? आणि समजा ओळखले तरी आधुनिकतेचे वारे लागलेल्या त्या घरात त्याला कोण स्वीकारणार? जाऊ दे, म्हातार्याला ओळखणारेच कोणी उरले नाही तर त्याच्या नातवंडांना त्याच्या जिवंत असण्याचे काय अप्रूप वाटणार? गाडीवरून त्याचा ताबा सुटतोय की काय म्हणून तो सावरून ताठ बसला आणि त्याने कुठेतरी वाहत जाणार्या मनाला आवर घातला. क्रॉफर्ड मार्केटध्ये तो सर्व सामान उतरून निघाला तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. तो तिथेच रेंगाळतोय असे वाटल्यावर गनी शेटने त्याला टोकले, ‘क्या भाय रामू, आज रत्नागिरी जानेका इरादा है की नाही?’ त्यावर तो बापुडवाणा चेहरा करीत म्हणाला, ‘गनीशेट, एक हजार रुपयांची निकड होती तेवढे द्या. पगाराला पेड करतो.’
‘हे बघ रामू, ईदला मी खूष होवून तुला पाचशे रुपये दिले होते. तवा आता काय बी मिलनार नाय. तुजा रखांगी शेट तुला पैसे देतो ना? मग झालं.’ तो हिरमुसला झाला तेव्हा गनीशेटने मलबार्याच्या हॉटेलातून मोठी खारी आणि चाय आग्रहाने त्याला प्यायला लावली होती. त्याच्या पोटात आता भुकेने आगडोंब उसळला होता. वाटेत एखादी टपरी नाहीतर धाबा दिसला तर मिळेल ते पोटात ढकलण्याचा त्याने निश्चय केला. अधून मधून एखादे वाहन समोरून भर्रकन निघून जात होते. एप्रिल-मे चा सिझन असला की, नेहमीच ट्रॅफीक जाम. पंढरपूरच्या वारकर्यांची लागते तशी दोन्ही बाजूने पाच पाच किलोमीटर रांग लागलेली असायची. कासवाच्या गतीने रांग पुढे सरकायची. प्रत्येक ड्रायव्हरचा चेहरा त्रासिक आणि ओठात सरकारच्या नावाने अर्वाच्य शिवी भरलेली. पण आज तसे नव्हते. रस्ता एकदम साफ दिसत होता. तेवढ्यात त्याला उजव्या बाजूला प्रकाश दिसला व पाच-सहा गावकर्यांचा घोळका दिसला. म्हणजे इथे एखादे खोपटवजा हॉटेल असणार म्हणून त्याने गाडीचा वेग वाढवला. तर ते हॉटेल, तो प्रकाश, ती माणसं पुढे पुढे जात होती. त्याने डोळे चोळले. आता दहा पावले जवळ आले म्हणून त्याने गाडीचा वेग वाढवावा तर ते आपले पुढे जात होते. त्याच्या मनात कसली तरी विचित्र शंका आली. हा मृगजळासारखा चकवा तर नाही? गाडीतळावर त्याने इतर ड्रायव्हरच्या तोंडून असल्या चमत्कारिक कहाण्या एकल्या होत्या. मध्यरात्रीला सफेद साडी नेसलेली डोक्यावर मळवट भरलेली विपुल केशसंभार मोकळा सोडलेली सुंदर स्त्री गाडीच्या हेडलाइटच्या प्रखर प्रकाशात कोणाच्या तरी गाडीपुढे आडवी आली होती. तर संपूर्ण पेट्रोलने टाकी फुल्ल केलेली, टायर आणि बॅटरी चेक केलेली कुणाची तरी गाडी नेमकी सुनसान जागेवर जंगलात बंद पडलेली, तर कुणाची गाडी रात्रभर चकव्यात सापडून फिरून तिथेच आलेली होती. असा चमत्कारिक अनुभव त्याला आजवर कधीच आला नव्हता. त्याला त्याच्या मित्राची आठवण आली. तो म्हणाला होता, ‘राम, तुला रात्रीच्या वेळी प्रवासात भुताखेताची शंका आली तर न घाबरता मारुतीरायाचे नाव घ्यायचे बजरंगबली.’ ‘जय बजरंगबलीऽ’ आपसूकच त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. आणि चमत्कार! तो प्रकाश ते हॉटेल, ती माणसे सर्व काही क्षणात अदृश्य झाले. त्याला धीर आला. इतक्यात काळोखातून मोटारसायकलच्या हेडलाइटचा प्रखर प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला. त्याला पुढचे काहीच दिसेना. तसा त्याने जोराने हॉर्न वाजवला. तेवढ्यात धडाम् धड असा मोठा आवाज झाला आणि समोरून येणारी मोटरसायकल प्रचंड वेगाने त्याच्या ट्रकवर आदळली. मोटरसायकलवर बसलेले दोन प्रवासी हवेत उंच उडाले आणि रस्त्याच्या कातळावर आपटले. त्यांनी तिथेच राम म्हटले. पाणी मागायची उसंतही त्यांना मिळाली नाही. क्षणभर काय झाले, तेच रामदासला कळले नाही. आणि जेव्हा कळले तेव्हा तो जाम घाबरला. त्याच्या ट्रकची चांगलीच नासधूस झाली होती. आता इथे जास्त वेळ थांबलो तर आपण गोत्यात येऊ ही आशंका येताच त्याने ट्रक स्टार्ट केला. त्याची छाती धडधडत होती. आपली काहीही चूक नसताना त्या दोघांचा मृत्यू ओढवला, याचेच त्याला वाईट वाटले. त्याने वाहनाचा वेग वाढवला. पाहता पाहता घाट कधी आला तेच त्याला समजले नाही. चिंचोळा रस्ता आणि खोल काळदरी… ती घटना घडून पंधरा मिनिटे झाली असतील नसतील त्याला कसली तरी विचित्र जाणीव झाली. त्याच्या दोन्ही बाजूला कोणीतरी बसले आहे असे वाटले. थंड वातावरणात त्याच्या अंगावर भीतीचा काटा उमटला. तेवढ्यात मोठमोठ्याने हसत दोन धुरकट आकृत्या प्रकट झाल्या. त्यातला एक म्हणाला, ‘आम्हाला त्या जगात पाठवून पळतोयस काय रे चोरा… तुला आमच्या जमातीत न्यायला आलोय.’ त्याही स्थितीत रामदासने ब्रेक मारून ट्रक थांबवला. त्याच्या अंगात हुडहुडी भरली होती. ट्रकचा दरवाजा उघडून भयाने कापत तो पळत सुटला आणि कसलेच भान राहिले नसल्यामुळे तो सरळ काळदरीत पडला, ते त्याचे त्यालाच कळले नाही.