मुळ्याचा पराठा
साहित्य : 1 कप गव्हाचं पीठ, 2 टीस्पून तेल, 1 उकडून सोललेला बटाटा, अर्धा टीस्पून जिरं, पाव टीस्पून हळद, 1 मोठा पांढरा मुळा किसलेला, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव टीस्पून ओवा, आवश्यकतेनुसार बटर, स्वादानुसार मीठ.
कृती : गव्हाचं पीठ, उकडलेला बटाटा, तेल, जिरं, हळद आणि मीठ यांचं एकजीव मिश्रण तयार करा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कणीक मळून घ्या. ही कणीक 15 मिनिटं झाकून ठेवा. एका मोठ्या भांड्यात किसलेला मुळा आणि थोडं मीठ घेऊन एकत्र करून ठेवा. साधारण 15 मिनिटांत मुळ्याला पाणी सुटेल. हे पाणी पिळून वेगळं करा. आता मुळ्याच्या चोथ्यात धणे-जिरे पूड, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, ओवा आणि स्वादानुसार मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करा.
आता कोरडं पीठ लावून कणकेची जाडसर पोळी लाटून त्यात सारण भरा. पोळी सर्व बाजूने बंद करून, पुन्हा गोळा करा आणि कोरडं पीठ लावून जाडसर पराठा लाटा. हा पराठा गरम तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूने बटर सोडून शेकून घ्या. गरमागरम मुळ्याचा पराठा लोणचं किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
टीप : सारण तयार केलं की, लगेच पराठे बनवायला घ्या.