हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे सगळीकडे विध्वंस आणि महापूर असे दृश्य दिसत आहे. रस्त्यावर उभी असलेली वाहने आणि ट्रक पुरात वाहून गेले. मुसळधार पावसामुळे कुलू मनालीलाही पूर आला आहे. या पुरात हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. बालिका वधू फेम अभिनेता रुसलान मुमताज देखील मनालीतील पुरात अडकला असून तिथून एक व्हिडिओ शेअर करून त्याने तेथील परिस्थितीबद्दल आणि स्वतःबद्दलची माहिती दिली आहे. तो मनालीत अडकल्याची बातमी समजताच त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली.
जेव्हा उत्तर भारतात विनाशकारी पाऊस सुरू झाला तेव्हा रुसलान मुमताज देखील एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी मनालीला पोहोचला होता, मुसळधार पाऊस आणि पुराच्या दरम्यान कलाकारही तिथे अडकले. आता रुसलानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करून शहरातील परिस्थितीबाबत अपडेट दिले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता खूपच नाराज दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, स्वत:बद्दल अपडेट देण्याबरोबरच, अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की लोकांनी सध्या कोणत्याही डोंगराळ भागात जाणे टाळावे.
एका वृत्तपत्राशी बोलताना रुस्लानने सांगितले की तो आता कुठे आणि कोणत्या स्थितीत आहे. तो म्हणाला, “मी 4 जुलैला माझ्या शूटिंगसाठी इथे आलो होतो. आम्ही एका रिसॉर्टमध्ये राहत होतो आणि तिथे शूटिंगही करत होतो. पाऊस सुरू झाला होता, पण परिस्थिती इतकी बिघडेल याची आम्हाला कल्पना नव्हती. संततधार पावसामुळे 9 जुलै रोजी परिस्थिती अत्यंत बिकट होऊ लागली. पूरस्थिती होती आणि आमच्या रिसॉर्टमध्ये पाणी शिरले. यानंतर आम्हाला रिसॉर्टच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये नेण्यात आले, जे सुरक्षित होते. पण दुसऱ्याच दिवशी तेही सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्याने तेथेही पाणी शिरू लागले होते. त्यानंतर रिसॉर्टचे कर्मचारी आम्हाला टेकडीवरील एका छोट्या गावात घेऊन गेले.”
रुस्लान पुढे म्हणाला, “आम्ही सुरक्षित आहोत… आम्ही या गावातल्या एका शाळेत राहत आहोत, जी उंचावर आहे. आम्ही पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा फारसे अन्न उपलब्ध नव्हते. हे अवघड आहे, रिसॉर्ट आमची काळजी घेत आहे. मनालीतील परिस्थिती खूप भीतीदायक होती, पण हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. पाऊस पूर्णपणे थांबेल अशी आशा आहे. अर्थात, त्यानंतरही आम्हाला परत यायला थोडा वेळ लागेल, कारण भूस्खलनामुळे रस्ते खराब झाले आहेत.”
तेथील विध्वंसाचे संपूर्ण दृश्यही अभिनेत्याने आपल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. संपूर्ण परिसर पाण्यात बुडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. रस्त्यासोबतच आजूबाजूची छोटी बांधकामेही पाण्याखाली गेली आहेत. त्याचा एक फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिले, "माझ्यामागचा रस्ता आता राहिला नाही." त्याच्या पुढील पोस्टमध्ये, रुस्लानने काही मिनिटांत रस्ता कसा पाण्याखाली गेला हे दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, 'हा रस्ता आता अस्तित्वात नाही.'
यासोबतच अभिनेत्याने सर्वांना डोंगरावर न जाण्याचे आवाहनही केले आहे. परिस्थिती खूप वाईट आहे. त्याने लिहिले, “मला कधीच वाटले नव्हते की या धोकादायक ठिकाणी मी वाईटरित्या अडकून पडेन. इथे नेटवर्क नाही. घरी जायला रस्ता नाही. सर्व रस्ते बंद आहेत त्यामुळे मला चित्रीकरणही करता येत नाही. मी माझ्या डोळ्यांसमोर एक सुंदर ठिकाण भयावह बनलेले पाहिले आहे.