फरहान अख्तरचा 'जी ले जरा' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. फरहान अख्तर याने २०२१मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांना कास्ट करण्यात आले होते. मात्र, अलीकडेच या चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या हॉलिवूड कारकिर्दीला वेळ द्यायचा असल्याचे कारण पुढे करत 'जी ले जरा' चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्याचे रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. प्रियांकानंतर कतरिना कैफनेही फरहान अख्तरचा चित्रपट नाकारल्याचा दावा केला होता, पण नंतर ही बातमी खोटी ठरली. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी प्रियांकाच्या ऐवजी अभिनेत्री अनुष्का शर्माशी या भूमिकेसाठी संपर्क साधला होता. पण अनुष्कानेही 'जी ले जरा'ची ऑफर नाकारली आहे.
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माने तारखा जुळत नसल्यामुळे हा चित्रपट नाकारला आहे. या रिपोर्टमध्ये असे देखील म्हटले गेले आहे की, अनुष्का स्वतः या चित्रपटाचा भाग होण्यासाठी उत्सुक होती. परंतु निर्माते ज्या तारखांसाठी विचारणा करत होते, त्या दिवसांमध्ये अनुष्का आधीच व्यस्त होती. तर, दुसरीकडे या चित्रपटाच्या टीमला आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याशी जुळणाऱ्या तारखाच हव्या होत्या. मात्र, आता दोन्ही अभिनेत्री देखील या चित्रपटातून काढता पाय घेतील की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.
कास्टिंग प्रॉब्लेममुळे फरहान अख्तर याने देखील सध्या चित्रपट थांबवल्याचे बोलले जात आहे. आता तो आमिर खानसोबतच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यांचा हा आगामी चित्रपट स्पॅनिश स्पोर्ट्स कॉमेडीचा रिमेक आहे. यानंतर, फरहान अख्तर रणवीर सिंहसोबत 'डॉन ३'मध्ये देखील दिसणार आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच 'चकदा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे. तिचा हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट यावर्षी १६ डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अनुष्काने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.