‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडेनं नुकतेच सोशल मीडियावर तिचा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्यासह कुटुंबीय आणि सिद्धार्थही दिसत आहे. सिद्धार्थ आणि तितीक्षा यांनी याआधीही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या वाढदिवसाच्या फोटोंवरील कॅप्शनमुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तितीक्षाने तिच्या पोस्टमध्ये ’33.. हा परफेक्ट वाढदिवस होता. मी ज्या लोकांवर प्रेम करते त्यांच्यासोबत मिळून हा वाढदिवस साजरा केला आणि जी लोकं माझ्यावर प्रेम करतात, त्यांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तुम्हा सर्वांनी माझा दिवस खूप खास केला’, असं लिहिलं आहे.
मराठी मालिका, चित्रपट यामुळे तितीक्षा घराघरांत परिचयाची झालेली आहे. सिद्धार्थ आणि तितीक्षा यांची जोडी प्रेक्षकांच्या सुरुवातीपासूनच आवडती आहे. त्यांनी झी मराठीवरील 'तू अशी जवळी राहा' मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. २०१८ साली आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. त्यामधील मनवा आणि राजवीर या भूमिकांमध्ये तितीक्षा आणि सिद्धार्थ पाहायला मिळाले होते.
त्यानंतर आता तर दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार होणार असल्याच्या चर्चा ऐकून चाहत्यांनाही खूप आनंद होत आहे. सिद्धार्थ आणि तितीक्षा एकमेकांना डेट करत असून लवकरच ते लग्नही करणार असल्याचे सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे एकत्र फोटोही व्हायरल होत आहेत.
अलिकडेच तितीक्षाने क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ‘शाब्बाश मिठू’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तर सिद्धार्थ बोडकेनं ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तो अजय देवगण, तब्बू यांच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटातही झळकला.
‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तितीक्षाने सिद्धार्थसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. ‘यासाठी मी तुला खूप मेहनत घेताना पाहिलं आहे. तू केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. तू चमकलास. तुझ्या लहानातल्या लहान कामगिरीवर मला नेहमीच अभिमान वाटतो आणि तुला मिळालेलं हे काम खूप मोठं आहे. त्यावर कसं व्यक्त व्हावं हेच मला सुचत नाहीये’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या.
सिद्धार्थ आणि तितीक्षाला त्यांच्या या नव्याने फुलणाऱ्या नात्यासाठी अनेक शुभेच्छा!