सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकारणात उलथापालथ होताना दिसत आहे. हे एकंदरच गरमागरमीचे वातावरण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘मी पुन्हा येईन’ची आठवण करून देत आहे. साधारण एक वर्षांपूर्वी प्लॅनेट मराठीवर ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व सत्तानाट्य दाखवणाऱ्या या बेवसीरिजला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यातील संवादही भरपूर गाजले. राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळत आहेत.
आता ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे आणि निमित्त आहे सध्या सुरू असलेले राजकारण. सद्यस्थितीवर आधारित जोक्स, मिम्स सर्वत्र झळकत असतानाच या सिरिजमधील काही व्हिडीओज, संवादाचे मिम्सही सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे लोकांना ही सिरिज पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ही वेबसीरिज सद्य स्थितीशी कशी साधर्म्य साधणारी आहे, यातील प्रत्येक कलाकार आपल्याला कोणाची ओळख करून देतो याबद्दलचे अनेक मिम्स सध्या सर्वत्र शेअर होत आहेत. परिणामी, तापलेल्या राजकीय वातावरणात प्रेक्षकांचे मनोरंजनही होत आहे.
या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, रूचिता जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.