अभिनेत्री रवीना टंडन अनेकदा सोशल मीडियावर तिची मतं मोकळेपणे मांडताना दिसते. विविध घडामोडी, व्हायरल फोटो, व्हिडीओ यांवर व्यक्त होऊन तिचा दृष्टीकोन नेटकऱ्यांसमोर मांडते. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराबाहेरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये केदारनाथ मंदिरासमोर एक मुलगी मुलाला प्रपोज करताना दिसतेय. गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन ती जाहीरपणे प्रेम व्यक्त करते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून प्रचंड टीका झाली होती. आता त्यावरच रवीनाने तिचं मत मांडलं आहे.
मंदिरासमोर प्रपोज करतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समितीने त्यावर टीका केली होती. इतकंच नव्हे तर पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित जोडप्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. या पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत रवीनाने त्या जोडप्याची बाजू घेतली आहे. सध्या तिचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.
रवीनाने केदारनाथ मंदिरासमोरील प्रपोजलचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘आपले देव प्रेम आणि भक्तांना आशीर्वाद देण्याच्या विरोधात कधीपासून झाले? या भक्तांना फक्त त्या क्षणांना पवित्र बनवायचं होतं. कदाचित प्रपोज करायची पाश्चिमात्य पद्धत आणि संस्कृतीच सुरक्षित आहे. गुलाब, मेणबत्त्या, चॉकलेट्स आणि अंगठी. खरंच दु:खदायक आहे हे. ज्या दोन लोकांना एकत्र यायचं होतं, त्यांना फक्त देवाकडून आशीर्वाद घ्यायचा होता आणि त्यांच्याच विरोधात कारवाई केली जात आहे.’
रवीनाच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘देवासमोर तुम्ही लग्नसुद्धा करू शकता. पण या लोकांनी हे सर्व फक्त व्हिडीओ बनवण्यासाठी केलं, आशीर्वादासाठी नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘जर मंदिरात लग्न करू शकतो तर मग प्रपोज का नाही करू शकत’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला.
याआधीही रवीनाने केदारनाथ इथल्या एका व्हिडीओबाबत ट्विट केलं होतं. या व्हिडीओमध्ये एका घोड्याला बळजबरीने गांजाची सिगारेट पाजताना दोन तरुण दिसत होते. या गंभीर घटनेवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यावर ट्विट करत रवीनानेही संबंधित तरुणांच्या अटकेची मागणी केली होती. ‘आपल्या पवित्र ठिकाणी घोड्यांवर सततच्या होणाऱ्या अत्याचाराला आपण थांबवू शकतो का? अशा निरपराध प्राण्यांवर अत्याचार करून ही लोकं कोणती प्रार्थना करत आहेत, कोणते कर्म मिळवत आहेत? हा केदारनाथचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या लोकांना अटक करता येईल का’, असा सवाल तिने केला होता.