Close

पावसाळ्यातील आजारांपासून बचाव कसा कराल? (How To Fight With Diseases In Monsoon?)

पावसाळा आला की साथीचे आजार पसरण्याचा धोका दरवर्षी निर्माण होतो. यामुळे पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेणं थोडं अधिक गरजेचं होतं. योग्य ती काळजी घेतली, पावसाळी आजारांबद्दलची नीट माहिती असली तर या साथीच्या आजारांपासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करणं सहज शक्य होतं. पावसाळ्यामध्ये आपली आणि आपल्या कुटुंबियांची प्रकृती चांगली राहावी, यासाठी काय करायला हवं, हे डॉ. हनी सावला, इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय, मुंबई सेंट्रल या लेखातून सांगत आहे.

पावसाळ्यातील आजारांना प्रतिबंध घालणे

कॉलरा (cholera), टॉयफाईड (typhoid) आणि हेपेटायटीस ए (hepatitis A) या आजारांच्या साथी पावसाळ्यात पसरतात. या आजारांचा संसर्ग होऊ नये यासाठी आपण जे पाणी पितो ते स्वच्छ असावे याची खात्री केली पाहिजे. पिण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी उकळलेले, गाळलेले पाणी वापरावे.  आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात कच्च्या गोष्टी खाणे टाळावे. तसेच रस्त्यावरचे, उघड्यावरील खाणेही टाळावे. पावसाळ्यात ताजे शिजवलेले अन्न खावे.

स्वच्छता राखा

स्वच्छता राखल्याने पावसाळ्यात होणारा जंतुसंसर्ग टाळता येतो. पाणी आणि साबणाने सतत हात धुवत राहावे. खासकरून जेवण करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात धुणे अत्यंत गरजेचे आहे. जर साबण नसेल तर हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. आपला परिसर स्वच्छ असावा, परिसरात घाण, कचरा साठलेला नसावा याची आपण काळजी घ्यायला हवी.

डासांचा प्रतिबंध

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे डासांमुळे पसरणारे आजार होतात. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत, जिथे पाणी जमा होतं तिथं डासांची पैदास होत असते. याला प्रतिबंध घालण्यासाठी आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. डास चावू नये यासाठी बाजारात मिळणारी क्रीम लावावीत किंवा इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. जेवढे शक्य आहेत तेवढे शरीर झाकणारे कपडे घालावेत. मच्छरदाणीचा वापर केल्याने डास चावण्याचे प्रमाण कमी करता येते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणे

आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण आजारांचा मुकाबला समर्थपणे करू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळे, भाज्या आणि धान्याचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. समतोल आहार घ्यावा, भरपूर पाणी पीत राहावे आणि पुरेशी झोप घ्यावी. नियमित व्यायाम करणे आणि ताणावर नियंत्रण ठेवणे याचाही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो.

खाताना काळजी घ्यावी

पावसाळ्यात खाण्या-पिण्याचे पदार्थ दूषित होण्याचा मोठा धोका असतो.  यामुळे पावसाळ्यात खाता-पिताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. पावसाळ्यात कच्च्या गोष्टी खाणे टाळावे. शिजवलेले अन्न खावे. रस्त्यावर मिळणारी कापलेली फळे शक्यतो खाऊ नयेत. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात.

तत्काळ वैदकीय मदत घ्या

तापाची कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून प्रकृती तपासून घेतली पाहिजे. पटकन वैद्यकीय मदत घेतल्यास आजार बळावण्याची शक्यता कमी होते आणि आपल्याला होणारा त्रासही टळतो. डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य ती औषधे वेळेवर घेणे यात अजिबात हयगय करू नका.

****************************

Share this article