स्टार प्रवाहच्या दुर्वा आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता हर्षद अतकरी पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहच्या कुन्या राजाची गं तू रानी या नव्या मालिकेत हर्षद हरहुन्नरी अशा पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. दुर्वा मालिकेतील केशव आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम या त्याने साकारलेल्या पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. आजही त्याला प्रेक्षक केशव आणि शुभम या नावांनी हाक मारतात. कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेतील तो साकारत असलेलं कबीर हे पात्र अतिशय वेगळं आहे. त्यामुळे हर्षद आता कबीरच्या रुपात प्रेक्षकांना दररोज भेटणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबत हर्षदचं जुनं नातं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी तो प्रचंड उत्सुक आहे.
कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतील या भूमिकेविषयी सांगताना हर्षद म्हणाला, ‘कबीर हे पात्र मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आहे. कबीर हा तळागाळात जाऊन काम करणारा पत्रकार आहे. मालिकेचं कथानकही खूप छान आहे. कामावर प्रचंड प्रेम करणारा असा हा कबीर साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिका संपल्यानंतर पुन्हा कधी भेटीला येणार याची सतत विचारणा होत होती. योग्य वेळी ही सुवर्णसंधी चालून आली आणि मी तातडीने या भूमिकेसाठी होकार दिला. माझ्या याआधीच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम कुन्या राजाची गं तू मालिकेतील कबीरवर करतील याची खात्री आहे.