रेवती चिडखोर नव्हती पण तिची पण फार ओढाताण होत होती, घर आणि ऑफिस मध्ये. तोल नकळत सुटतोच अशा वेळी.
रेवतीने गाडी पार्क केली. ऑफिसच्या कामाच्या रगाड्यात ती थकून गेली होती. त्यातून कुक रजेवर. डेडलाईन गळ्याशी असताना, असं घरचं पाहायला घरी निघून येणं तिच्या बॉसला काही आवडत नव्हतं. नीलची पण परीक्षा होती. त्यात राकेशच्या ऑफिसमध्ये काहीतरी पॉलिटिक्स चालू होतं. तो रात्रीची काही न काही स्टोरी सांगत राही आणि रेवतीचा थकून डोळा लागत असे. कालच त्यावरून राकेश चिडला होता. तुला माझी काळजीच नाहीय. वगैरे वगैरे पर्यंत तो आला. रेवती चिडखोर नव्हती पण तिची पण फार ओढाताण होत होती, घर आणि ऑफिस मध्ये. तोल नकळत सुटतोच अशा वेळी.
नील बागेत खेळत होता.
रेवती : नील, नील चल लवकर वर. उद्याच्या पेपरची तुझी तयारी बघू.
नील धावत आला आणि आईला मिठी मारली.
रेवती : चल पटापट अभ्यास उरकू. जेवण पण बनवायचंय.
वर येऊन चावीने दार उघडते तर राकेश आधीच घरी आलेला.
रेवती : काय रे आज घरी कसा?
राकेश : हाफ डे ने आलो. डोकं दुखतंय.
रेवती : खाल्लीस का मग क्रोसिन? नील, तू बुक्स आण आधी उद्याच्या पेपरचे. राकेश खूप डोकं दुखतंय का रे? आलाच आहेस लवकर तर नीलचा अभ्यास घे ना.
राकेश : किती क्रूर बोलतेस तू. माझी हालत काय आहे, तू सांगतेस काय!
रेवती : ओ के! ओ के! आता चिडू नकोस. ते तुझे ऑफिसचे प्रॉब्लेम्स ऑफिसमधेच ठेव. काल भांडलोय ते काही कमी नाहीय.
रेवती स्वयंपाक बनवता बनवता नीलचं पुस्तक ओट्यावर ठेवून त्याला प्रश्न विचारत होती. तरी उद्या शेवटचाच पेपर होता. तितक्यात राकेश आत आला.
राकेश : रेवती मी जॉब सोडतोय.
रेवती भांबावते आणि तिच्या हाताला चटका बसतो.
रेवती: आई ग, अरे काय बोलतोयस काय तू. नवीन घराचे इ एम आय आहेत आपले. नीलचं करिअर आहे.
राकेश : अरे हा जॉब सोडला तर काय कायमचं घरी बसणार आहे मी? नीलच्या करिअरपर्यंत कुठे पोचलीस?
रेवती : अरे आत्ताही फी कमी नाहीय त्याची. माझ्या एकटीच्या सॅलरीत सगळे खर्च कसे चालणार आहेत?
राकेश डोकं धरतो.
राकेश : मला नाही सहन होत हे इतकं पॉलिटिक्स.
रेवती त्याच्या जवळ जाते. दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडते.
रेवती : हे बघ राकेश. सगळ्या जॉब मध्ये काही ना काही उणिवा असणारच ना. मी कुठे म्हणतेय इथेच राहा, इंटरव्ह्यू दे, बदल जॉब.
राकेश तिचे हात झटकतो आणि तावातावाने निघून जातो.
तितक्यात तिचा फोन वाजतो. ऑफिस मधून असतो. ती फोन घेते. तितक्यात दारावरची बेल वाजते. ती फोनवर ऑफिस मधल्या सहकार्याची क्वेरी सॉल्व्ह करत करत दार उघडते. तिचे सासरे आत येतात आणि स्थानापन्न होतात. थोड्या वेळात तिचा कॉल पण संपतो.
सासरे : सुनबाई भाजीत सकाळी मीठ पुढे झालं होतं, हा काय सासर्याला बी. पी. ने मारायचा प्लॅन आहे काय?
रेवती किचनमध्ये सुस्कारा सोडते. यांचं खोचक बोलणं म्हणजे तिचं सगळ्यात मोठं आव्हान होतं.
रेवतीला रात्री झोप येत नव्हती. त्यात राकेशने नोकरी सोडायची बोलून टेन्शन दिलेलं. ऑफिसचा व्याप, रात्रभर रेवती या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिली. मग उठून बसली. विचारांचं चक्र थांबतच नव्हतं. आणि सकाळी सहाचा गजर वाजला.
‘मी रात्रभर झोपलेच नाही. यालाच डिप्रेशन म्हणतात का, की अजून काही’
तिने स्वतःच्या हाताने चेहरा झाकून घेतला, सगळे विचार बंद केले आणि एक निर्णय घेऊन टाकला. ती स्वयंपाक घरात गेलीच नाही. फोन बंद करून ड्रॉवर मध्ये टाकला, आवरलं आणि जीन्स टी शर्ट घालून पर्स खांद्यावर अडकवून निघाली. ‘बस झालं.’
ती रस्त्यावरून चालत होती तेव्हा पूर्वेला लाली फुटली. तांबडा लाल मोहक सूर्य हळूहळू वर येत होता. तिचं मन प्रसन्न होऊ लागलं. ती त्या प्रकाशात लाल रंगात न्हाऊन नवी होऊ लागली. रस्त्याच्या कडेला वडा सांबार वगैरे विकणारी बाई नुकतीच गाडी लावत होती. रेवती त्या गाडीकडे गेली. गरम गरम वडे आणि चविष्ट सांबार डोळे बंद करून तिने मनापासून त्याचा स्वाद अनुभवला. गार्डनच्या जवळ आल्यावर त्या गार्डनने तिला खेचूनच नेलं. फुलांच्या ताटव्याच्या बाजूच्या हिरवळीत ती मस्त बसली. हवेत पहाटेचा मंद गारवा होता. मुंबईसारख्या शहरात हेही नसे थोडके. ती डोळे बंद करून हिरवळीवर पडली. तिच्या डोळ्यासमोर कॉलेजच्या वेळची दृश्य यायला लागली. ‘किती मोकळे आणि बिनधास्त होतो आपण.’ तिने तेव्हाचा मोकळेपणा आणि बिनधास्तपणा पुन्हा मनात अनुभवला, तितक्यात तिला आठवला उचंबळणारा समुद्र तिचा आवडता. ती फुलून उठली आणि स्टेशनच्या दिशेने चालायला लागली.
बरेच दिवस सकाळचं मोकळं स्टेशन नव्हतं बघितलेलं. हळूहळू जागृत होत असलेलं स्टेशन बघत असताना तिला जाणवलं, बरंच काही बदललंय. आठवणीतल्या स्टेशनशी या स्टेशनची ती तुलना करू लागली तितक्यात तिला रस्त्यात शाळेजवळ बसलेला चिंचवाला दिसला. ‘वाह गोड आंबट चिंच’ तिच्या तोंडाला पाणी सुटलं. तिने चिंच विकत घेतली. डोळे मिचकावून जिभेवर घोळवून चिंच खाताना तिला खूप मज्जा आली. ट्रेनचं तिकीट काढून ती ट्रेनमध्ये चढली. अजून गाडी माणसांनी भरून ओतायला लागलेली नव्हती. ती खांबाला लटकत हवा खात राहिली.
‘हल्ली तर बंद गाडीतूनच फिरतो कृत्रिम थंडीत’ गाडीतून उतरून समुद्राकडे चालत जाताना तिच्यात वेगळीच ऊर्जा आली. रिकाम्या किनार्यावर वर वर जाणारा सूर्य बघत ती लाटांवर हिंदोळत राहिली अनंत काळासाठी. उन्ह चढल्यावर थंडगार कुल्फी खाऊन ती जेवायला निघाली.
‘काय खायचं बरं? आजकाल नीलच्या मस्तीपुढे शांत बसून काही खाल्लही नाहीय मनसोक्त.’
तिचं आवडतं चायनीज खायला ती रेस्टॉरंट मध्ये गेली शांतपणे प्रत्येक घासाची चव घेत घेत ती पोटभर जेवली. तिला वाटलं, असंच रात्रीपर्यंत फिरावं पण जबाबदारी हाका मारत होती. ‘घरी सगळे फोन करून थकले असतील. ऑफिसमधले तर अजून मनापासून आपली आठवण काढत असतील, नीलची परीक्षा, राकेश टेन्शनमध्ये बुडवेलच, मी अशी घरी पोचल्यावर काय सिन होईल ते विचार पण करायला नको आणि उद्या ऑफिस मध्ये तर’ ती स्वतःशीच हसली परत घरट्याकडे निघाली. गाठीला ‘मी माझी माझ्यासाठी’ चे मोकळे मनसोक्त क्षण बांधून..
– शीतल मुळीक