अभिनेता सुबोध भावेने ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ हा कार्यक्रम बिग एफएम या रेडिओवर गाजवला होता. मराठी चित्रपटातील नामवंत मराठी कलावंतांचे रंजक किस्से या कार्यक्रमातून त्याने सांगितले. आता या कार्यक्रमाचा दुसरा सीझन सुरू होत असून, त्याचा प्रिमियर पुण्यामध्ये झाला.
अस्सल संशोधनावर आधारित या दुसऱ्या आवृत्तीमध्ये सुबोध भावे मराठी चित्रपटांच्या अज्ञात कथा केवळ सांगणारच नाही, तर त्यावर आपली मते प्रदर्शित करणार आहे. शिवाय यात तो दर सोमवारी एक प्रश्न विचारील व श्रोत्यांपुढे आव्हान निर्माण करणार आहे. ‘फ्रॉम हॉर्सेस माऊथ : किती खरे किती खोटे’ हा एक मनोरंजक भाग तो सादर करणार आहे. मान्यवरांचे वाढदिवस आणि मराठी चित्रपटातील महत्त्वाचे टप्पे यांना विशेष विभाग समर्पित करण्यात आला आहे.
“या कार्यक्रमाने मला रेडिओ निवेदकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. हे एक अत्यंत रोमांचक साहस आहे. हा दुसरा सीझन श्रोत्यांना खिळवून ठेवण्यासाठी रोमांचक घटक, आकर्षक सामग्री आणि भरपूर आश्चर्यांनी भरलेला आहे,” असे या प्रसंगी सुबोध भावेने सांगितले.
पीएनजी ज्वेलर्स हे या कार्यक्रमाचे सादरकर्ता भागीदार असून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. हे वित्त भागीदार आहेत. मुंबई-पुण्यासह हा कार्यक्रम नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर या शहरात प्रक्षेपित होईल.