Close

आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन (Popular Actor Director Producer Mangal Dhillon Passes Away Due To Cancer)

मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते मंगल ढिल्लन यांचं आज (रविवार) निधन झालं. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. जवळपास महिनाभरापासून ते लुधियाना इथल्या एका रुग्णालयात दाखल होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड अभिनेते यशपाल शर्मा यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी मंगल ढिल्लन यांच्या निधनाची माहिती दिली आहे. वाढदिवस अवघ्या आठवडाभरावर असताना मंगल यांची प्राणज्योत मालवली.

मंगल ढिल्लन हे पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. त्यांनी बऱ्याच पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. ते मूळचे पंजाबमधील फरीदकोट इथले होते. त्यांचा जन्म पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील वांडर जटाना गावातील एका शीख कुटुंबात झाला. चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते वडिलांसोबत उत्तरप्रदेशला गेले. तिथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा पंजाबला परतले. पदवीनंतर मंगल यांनी दिल्लीत थिएटरमध्ये काम केलं.

मंगल ढिल्लन यांना १९८६ मध्ये पहिला ब्रेक मिळाला. कथा सागर या टीव्ही मालिकेत त्यांनी काम केलं. पण त्याचवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बुनियाद’ या मालिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी किस्मत, द ग्रेट मराठा, मुजरिम हाजीर, नूरजहाँ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. टीव्ही इंडस्ट्रीत काम करत असताना त्यांना चित्रपटांचे ऑफर्स मिळू लागले होते. १९८८ मध्ये त्यांनी ‘खून भरी मांग’ या चित्रपटात पहिल्यांदा भूमिका साकारली होती. यामध्ये ते वकिलाच्या भूमिकेत झळकले होते. याशिवाय घायल महिला, दयाबान, आझाद देश के गुलाम, प्यार का देवता, अकेला, दिल तेरा आशिक, दलाल, विश्वात्मा, निशाना यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुफान सिंग’ या चित्रपटात ते शेवटचे झळकले होते.

Share this article